बुधवार, १३ मे, २०२६

नाडे घोरिप

 




          नाडे घोरिप  (लेखक- प्रा. श्रीराम काळे)

                       कसरतीची कामं करीत गावोगाव फिरणाऱ्या डोंबारी/कोल्हाटी ह्यांना कोकणात नाडे घोरीप म्हणतात. त्यांच्या खेळात अधांतरी ताणलेल्या दोरीवर कसरती करणं हा अनिवार्य भाग असायचा. ही दोरी ताणण्यासाठी आठदहा फुटी बांबूचे दोन तुकडे मध्ये तीन चार हात अंतर सोडून फतरके रोवून माथ्यापासून दोन हात अंतरावर ते एकमेकाना बांधीत. अशी दोन फतकाटणी उभी करून त्यावरून ताणलेली दोरी जमिनीत ठोकलेल्या खुंटीला बांधलेली असे. त्याला नाडा म्हणत. साधारणपणे दसरा झाल्यानंतर त्यांची फिरती सुरू व्हायची. त्यांच्या फिरतीचा मार्ग नी मुक्कामाचे गाव ठरलेले असत. प्रत्येक गावात मध्यवर्ती मैदानात, चावडी जवळ खेळ करायच्या त्यांच्या जागाही ठरलेल्या असत. अशी बरीच कु टुंबं फिरतीवर सुटलेली असली तरी एका गावात एकामागून एक दोन तीन कु टुंबं आली असं कधीच झालं नाही. बहुधा त्यानी आपापसात समजुतीने कोणी कुठच्या गावात जायचं ते ठरलेलं असावं. सगळ्याच गावानी त्यांची वार्षिक नसे. काही गावात दोन किंवा तीन वर्षांनंतर ते पुन्हा जायचे. गावात मुक्काम असेतो दुवक्त डोंबाऱ्याचे कु टुंबीय आसपासच्या वाड्यांमध्ये घरोघर फिरून अन्न मागून आणत असत, नी लोक त्याना काही ना काही अन्न घालीत.

              आमच्या गावात भावकादेवीच्या मंदरा मागे शेतमळ्यांमध्ये त्यांचे खेळ होत. मी राजापूर तालुक्यात नाणार गावात नोकरीला असताना तिथे चिंचेच्या महाकाय वृक्षाजवळ नाडे घोरपी खेळ करीत म्हणून त्या चिंचेला घोरीप चिंच म्हणत. नाडे घोरपी गावात आले की ढोलकं वाजवीत गावभर फिरून खेळाची वर्दी देत. त्यांचा खेळ होत त्याला घोरपी असं म्हणत. लोकं ‘उद्या घोरपी हा’ किंवा ‘दोपारी कोलाटी इलेहत’ अशी बातमी एकमेकाना सांगत असत.

               गावच्या उत्सवात कीर्तनामध्ये एकदा कामतेकर बुवानी लाख्या कोल्हाट्याच्या मुलीवर फिदा झालेल्या राजपुत्राची गोष्ट सांगितली होती. एका डोंबारणीचा खेळ पहाताना त्या राज्यातला राजपुत्र तिच्या सौंदर्यावर फिदा होतो. तो तिच्या बापाकडे तिला मागणी घालतो. पण तिचा बाप लाख्या त्याच्या सत्ता संपत्तीच्या मोहाला बळी न पडता त्याला उपजिवीके चं साधन असलेली आपली घोरपी विद्या अवगत केलीस तरच मी तुला माझी मुलगी देईन अशी अट घालतो. पुढे तो राजपुत्र घोरपी विद्या शिकतो. लोकांसमोर खेळ सादर करून आपलं कसब प्रमाणितही करतो. पण अट पुरी केल्यावर मात्र त्याला उपरती होते. आपण एका य:कश्चित डोंबारणीच्या प्राप्तीसाठी हे दु:साहस करून मोठी चूक केली असा पचचात्ताप होतो नी डोंबारणीचा त्याग करून तो निघून जातो, अशी ती कथा असते.

                        त्यावेळी मराठी शाळा दुवक्त भरत. घोरपी असेल त्या दिवशी अडीज वाजता दुपारची शाळा भरली की हजेरी घेतल्यावर शाळा सोडीत असत. मग आनंदाने आरोळ्या मारीत आम्ही नाडे घोरीप होई त्या ठिकाणी जात असू. तीन वाजेतो लोकं जमत असत नी गर्दीचा अंदाज घेवून ढोलकं वाजवीत खेळ सुरू व्हायचा. एका डोंबारी कु टुंबात नवरा बायको त्यांची मुलं क्वचित एखादा तरूण भाऊ नी म्हातारा म्हातारी असत. आरंभी लहान पोरांचे खेळ होत, छत्रीच्या जुन्या कापडाला वरच्या टोकाला शिंगचोच्या-धनेशाची चोच बांधून त्यामागे डोक्या सारखा चपट आकार करून त्यावर चुन्याने डोळे रे खलेले असत. दोन बाजूना शिंगचोच्याची पिसं शिवलेली असत. ती खोळ पांघरून एक कोणीतरी गरूड होई (कोकणातले लोक शिंगचोच्याला गरूड म्हणतात.). त्याचं नी दुसऱ्या पोराचं भांडण होई नी मग दोघांची कु स्ती चांगलीच रंगत असे. त्यावेळी गरूड झालेली पोरगी गरूडा सारखे प्यांऽऽक प्यांऽऽक असे आवाज काढून दाखवी. कु स्ती खेळताना गरूड घायाळ झाला की डोंबारी मध्ये पडत “ह्यां काम लई वंगाळ क्येलास.... पुन्नारुपी गडु राला मारशील तर मी तुला मारील ” म्हणून दटावी. त्याची नजर चुकवीत पोरगा पुन्हा पुन्हा गरुडाला झट्या मारीत राही नी गरूड मोठमोठ्याने ओरडत राही नी मेल्याचे सोंग करी.

               मग वेगळा खेळ सुरू होई. एक पोर वीतभर चिळकटाचा तुकडा रशीने गळ्यात टांगून छातीवर थोपवीत, हवेत उंच उडवून पडणारा दगड त्यावर फोडून दाखवीत असे. त्याला चिडवीत घोरीपवाला म्हणे, “ह्यां काम लय सलप्या (सोपं) ह्या तुज्या कामावर कोन मुतणार पण नाय ....दुसरा कायतरी चांगला ख्येळ करून दाकव. ” पोरगा हवेत कोलांट्या उड्या मारी, माना हालवीत डोंबारी म्हणे “ह्याबी काम सलप्या” मग एकजण हातात लोखंडी कडं धरून राही नी पोरगा धावत येऊन त्या कड्यातून सूर मारी नी लोकं टाळ्या वाजवीत. आता डोंबारी ढोलकी वाजवून “हां ह्याब्येस” म्हणे. पोरगा मग पेटत्या कड्यातून सूर मारी. लोखंडी कडं घालून पोरगा ओणवा राही नी राहिलेल्या कचचोळ्या िटीतून दुसरा मुलगा किंवा मुलगी आरपार जाई. काही वेळा बोकड आणून दोन पायावर चालवून दाखवीत. समोरून धावत येणाऱ्या बोकडाच्या दिशेने मोठा दगड फेकता की बोकड त्याला टक्कर मारून तो दगड फोडी. बोटाएवढ्या जाड सळीच्या एका टोकाला दुधारी फण केलेला असे. डोंबाऱ्याची बायको किंवा भाऊ त्या सळीच टोक जमिनीला टेकवून फणाच्या पात्याचं टोक गळ्याला टेकवून जोर देवून सळी वाकवून दाखवीत.

               डोंबारीण एका लांबकाठी खांद्यावर उभी करी नी पोरगा त्यावर चढून दाखवी. मग ती काठी हनुवटीवर तोलून, कधी कपाळपट्टीवर तोलून धरी नी मुलगा त्यावर चढे. काठी हातापायाच्या पंज्यात पकडून शरीराची कमान करून दाखवी. बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकेल अशा अनेक शानती दाखवल्या जात. काही वेळा थक्क झालेले प्रेक्षक भाना हरपून टाळ्या वाजवायचंही विसरत, अशावेळी डोंबारी उड्या मारीत टाळ्या वाजवी नी मग भानावर आलेले प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत. या कसरतींना हमखास बक्षीस मिळत असे. नी नोट देणाराना त्यांचं नाव विचारून त्यांच्या नावाची पुकारणी डोंबारी करायचा. यात मोठेपणा वाटणारे लोक एकाची पुकारणी सरू असताना नोट पुढे ना करता जरा वेळ थांबून डोंबाऱ्याला खुण करून जवळ बोलावून घेत. अधून मधून प्रेक्षक एखाद्या खेळावर खुष होवूर रुपया दोन रुपये पुढे करीत, डोंबारी नोट घेवून त्याला नावा विचारी नी नोट हवेत फडकावीत लक्षुमण घाडी लक्षुमण घाडी असा त्या माणसाच्या नावाचा पुकारा करीत हातातली थाटली थडाथडा छाती पोटावर आदळीत उड्या मारून दाखवी.

                आता नाड्यावरचा खेळ सुरू होई. डोंबारीण किंवा तिची मुलगी दोरावर चढून हातात तोल सावरण्यासाठी हलकी पोकळ काठी घेवून चालून दाखवी. पायाचे आंगठे नी बोट यात दोर घट्ट पकडून हेलकावे घेवून दाखवी. त्यावेळी ढोल वाजवायची गत अंगावर काटा उभा राहील अशी भीषण असे. या खेळाच्या वेळी डोंबारी चार पाच वर्षापाठी आपली पोरगी किंवा बहीण खाली पडून कशी दगावली हे सांगून बिक्षसी मागायचा. क्वचित कोणी पोरगा किंवा डोंबारीण दोरीवर उलट सुलट कमान उड्या मारून दाखवायचे. काहीवेळा दोरीवर स्टूल ठेवून त्यावर वेगवेगळ्या अवघड कसरती करून दाखवायचे. काहीवेळा  दोरीवर  अ‍ॅल्युमिनीयमची थाटली ठेवून  त्यात बसून घसरून दाखवीत असत .

                          सगळ्या खेळात ढोलकं वाजवणं नी कोलांट्या उड्या मारीत बघ्याना हसव्णं या खेरीज मुख्य डोंबाऱ्याने कोणताही कसरतीचा खेळ दाखवलेला नसायचा. त्याचा एकच पण सर्वात वरकडी थरारक खेळ अगदी शेवटी असे. त्याच्या पाला जवळ असलेल्या आकाशावेरी उंच गेलेल्या चिंचेच्या नाहीतर अष्टाच्या झाडाला अगदी शेंड्यात दोरी बांधून दुसरं टोक जमिनीवर खुंटी ठोकून तिला ताणून बांधलेलं असायच. तिकडे निर्देश करीत डोंबारी म्हणे, “मायबाप, आता हा शेवटचा ख्येळ बगा. आता मी ह्या झाडावर चडनार आनी ह्ये रशीवर पालथा ऱ्हावून विमानावाणी खाली येनार. हा खेळ लई धोकेबाज.....ह्यातून जगलो तर खुशी म्हनून शेला पागोटं बांधा.... नी नाही जगलो तर हात सोडून शेर मापटं माज्या पोराबाळांच्या पदरात घाला नी त्येंना जगवा.”

                 आता त्याची बाईल ढोलकं वाजवू लागे नी डोंबारी खुंटीला बांधलेली दोरी सोडवून ती पुन्हा नीट ताणून बांधी. मग ॲल्युमिनीयमची थाटली घेऊन डोंबारी झाडावर चढे. दोरीच्या शेवटाला पोचल्यावर थाळी वाजवीत बघ्याना साद घाली, “मायबाप, एकडाव माज्यासाटी जोरदार टाळ्या वाजवा. आता माजा कसब नीट बगित ऱ्हावा, ह्ये रशीवरून माजा विमान खाली येनार..... देवान वाचवला तर धरणीवर नाहीतर वर इंद्रदेवाच्या पायाशी सगात.......” मग हातातली थाटली दोरीवर ठेवून ती पोटाखाली येईल अशी दक्षता घेत पालथा झोपे. जय बजरंग बली....जय खंडेराया असा गजर रशीवर कापड्याची घडी ठेवून एका हाताने पुढच्या बाजूला नी दुसरा हात मागे नेवून मागच्या बाजूला रशीवर पकड घेई नी इशारत करी. आता ढोलक्याचा अंगावर शहारे आणणारा तो विशिष्ट आवाज सुरू होई नी डोंबारी घसरत जमिनीकडे येऊ लागे. बघे श्वास रोखून डोळ्यात प्राण आणून एकटक बघीत असत. डोंबारी वाव दोन दोन वाव मंद गतीने येई नी अकस्मात जय खंडेराय म्हणत प्रचंड वेगाने घसरू लागे. निमिषाधात जमिनीपासून वाव दोन वाव अंतर उरल्यावर छलांग मारून जमिनीवर उभा रहात असे. हे सगळं असं काय विद्युत् वेगाने होई की प्रेक्षक चकित होऊन आ वाशीत बघतच रहात.

            कमरेत झुकून सलाम करीत डोंबाऱ्याने टाळ्या वाजवल्यावर मग मात्र टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा. आता खिशांतला पै पैसा अखेर पर्यंत राखून ठेवलेले लोक खिशात हात घालून तो बाहेर काढीत नी डोंबाऱ्याच्या थाळीत टाकीत. दुसरे दिवशी डोंबाऱ्याचे कु टुंबीय वाडी वाडीवार फिरून पै पैसा, शेर मापटं लोक खुशीने काय देतील ते पदरात घेई. गावचे सरपंच, खोत, धनिक, तालेवार यांच्या घरी डोबारी स्वतः जात असे. हे लोक हात सोडून पैशाच्या नाहीतर धान्याच्या रूपाने बक्षिसी करीत. गाव फिरून तळावर वापस आल्यावर काचकी बोचकी गुंडाळून नाडेघोरपी पुढच्या मुक्कामाकडे कूच करीत असे.

             मी हायस्कूलला मुख्याध्यापक असताना त्या गावात नाडे घोरीप आलं. मी त्यांचे खेळ बघण्यासाठी शाळा लौकर सोडली. तसेच आम्हा स्टाफ ने १०१ रुपयांचं पाकीटही बक्षिसादाखल घेवून आम्ही सव्व स्टाफ मेंबर खेळ बघायला गेलो. मी सव्व संस्था पदाधिकाऱ्यांनाही आग्रहपूर्वक यायचा निरोप दिला होता. खेळ व्हायचा होता त्या मैदाना जवळ आमचे एक मेंबर रहायचे. त्यांनी आम्हाला बसण्यासाठी एका बाजूला बाकडी, खुर्च्या मांडून घेतल्या होत्या. खेळ संपले आणि डोंबाऱ्याला द्यायचं बक्षिसाचं पाकीट अध्यक्षांकडे दिलं. त्यांनी आणि अन्य संस्थामेंबर्सनी त्यात आणखी भर घातली. आमच्या सारख्या उच्चभ्रू माणसांनी त्याच्या कलेची कदर केली म्हणून तो अगदी भारावून गेला होता. घरी परत जाताना स्टाफमेंबर्सपैकी कोणीतरी दत्तदास घाग बुवांच्या “लाखा कोलाटी” आख्यानावर आलेल्या कॅसेटचा संदर्भ दिला. त्यांच्या संग्रही ती कॅसेट होती. मला तत्क्षणी मी पूर्वी ऐकलेलं कीर्तन आठवलं. ती कथा माझ्या मनात कायम घर करूनच राहिलेली होती. लाखा आणि राजपुत्र यांच्या संदर्भात काही प्रश्न माझ्या मनात रुंजी घालीत राहिलेले होते. कदाचित घाग बुवांच्या आख्यानात मला काही वेगळा अन्वयार्थ सापडेल म्हणून मी त्याच पावली त्यांच्या कडून ती कॅसेट नेवून ऐकली. मी पूर्वी ऐकलेल्या बुवांनी सांगितली होती त्यापेक्षा जरा वेगळ्या धाटणीने घाग बुवांच्या आख्यानात कथेची मांडणी होती. पण त्या कीर्तनातही मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.

               राजपुत्राने लाख्याच्या मुलीला मागणी घातल्यावर लाख्याने त्या राजपुत्राला घोरपी विद्या शिकायची विचित्र अट कां बरं घातली असेल? सामर्थ्यशाली राजपुत्राने सत्ताबळाने किंवा डोंबाऱ्याला धनलोभ दाखवून त्याच्या कन्येची प्राप्ती करणं शक्य असूनही ते न करता जीवावर उदार होवून डोंबाऱ्याच्या अटीला बळी कां पडावं? अत्यंत निधाराने घोरिप विद्या अवगत करून ती अवघड अट पुरी केल्यावर मात्र राजपुत्राला आपण चूक केली असं कां वाटलं? राजपुत्राला उपरती झाल्यावर लाख्याच्या कन्येचा मोह सोडून निघून जाण्याच निर्णय त्याने का घेतला? तो निघून जात असता त्याला अडवून आपल्या कन्येचा स्वीकार करायला भाग पाडणं लाख्याला शक्य होतं नी ते रास्तही होतं. त्यात डोंबाऱ्याच्या मुलीचं हितच होतं. कोणत्याही पित्याने तेच केलं असतं. पण लाख्या निर्विकल्पपणे राजपुत्राला कां जाऊ देतो? बुवांच्या कथेत मला या कथांची सयुक्तिक उत्तरं मिळाली नव्हती. पुढे खूप वर्षांनी जी.ए. कुळकर्णींची विदुषक कथा मी वाचली. ती काही पहिलीच वेळ नव्हती. मी असंख्यवेळा ती वाचलेली होती. पण यावेळेला ती वाचल्यावर मात्र अकस्मातपणे लाख्या नी राजपुत्र यांच्या निर्णयामागची कारण मीमांसा माझी मलाच आपोआप उलगडत गेली.

                 मी विचार करायला लागलो की, राज्याचा वारसदार असलेल्या राजपुत्राची राणी होवून आपली लेक ऐश्वर्यात लोळणार हे त्या लाख्याला कसे काय सुचले नाही? सर्वसामान्य लोक तर वैभव, सत्ता, संपत्तीच्या मोहापायी पाचवे- सहावेपणावरही आपल्या लेकी बाळी राजाला देत असत. असा तो काळ. राजा म्हातारा असला तरी आपली चिमुकली राजस- बाळीसुद्धा त्याला अगदी बिनदिक्कत देत. इथे तर तरणाबांड राजपुत्र मागणी घालायला आलेला असतो. पण साकल्याने विचार करता समाज चक्राचा एक घटक या नात्याने आपली पारंपरिक कला कौशल्य, घोरपी विद्या टिकवणं, संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याचं भान लाख्या कोल्हाट्याला होतं. आपली ज्ञाती विद्या आत्मसात केलेली आपली कन्या वैभवाच्या, सत्तेच्या लालसेने राजपुत्राला दिली तर महान समाज परंपरेचा, संकेताचा भंग आपल्याकडून होईल हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. सत्ता संपत्तीच्या मोहापायी घोरीप विद्या शिकलेली कन्या राजपुत्राला देवून तिने आत्मसात केलेल्या कसबाचा ऱ्हास होवू देणं अयोग्य आहे. असा पायंडा निदान आपण तरी पाडायचा नाही हाही लाख्याचा हेतू होता.

                      सौंदर्याच्या बळावर एक डोंबारीण सम्राज्ञी पदापर्यंत पोहोचलीच तरी साम्राज्ञी पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात ती कितपत यशस्वी होईल याची शाश्वती दुनियादारी केलेल्या लाख्याला वाटत नव्हती. सौंदर्याच्या क्षणिक मोहाला बळी पडून ज्ञाती- कुल कशाचाही विचार न करता राजपुत्र डोंबारणीचा स्वीकार करू इच्छित होता. पण त्याची इच्छापूर्ती झाल्यावर, सौंदर्यवतीच्या प्राप्तीचा उन्माद ओसरल्यावर राजपुत्राला ती नकोशी वाटू शकते, नी तसं झालं तर कन्येच्या आयुष्याची क्षणात राख रांगोळी होवू शकते, नी ही भवितव्यता आपण बदलू शकणार नाही आणि स्वीकारूही शकणार नाही हे तो पुरते ओळखून होता. म्हणून लेकीला राणी बनविण्याऐवजी तिचं भविष्य सुरक्षित राखण्यासाठी राजपुत्रालाच डोंबारी बनवायचा व्यवहार्य पर्याय त्याने मोठ्या धूर्तपणे निवडला. मात्र हे करतानाही कदाचित आपली ही शंका खोटी ठरेल. कारण राजपद प्राप्त झाल्यावर, ते अंगवळणी पडलं की त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या निभवण्यात निसर्ग क्रमाने ती निष्णात होईलही..... ते काही फार अवघड आहे असं नाही. कारण पाण्यात पडल्यावर पोहोता येतं, हा निसर्गनियम आहे. सत्ता आली की त्या व्यक्तीचं कर्तृत्व आपोआप बहरू लागतं. असं असता कन्येचं भवितव्य बदलून टाकणारी, डोंबारी ज्ञातीच्या पाचवीला पुजलेली वणवण आणि दैन्य क्षणात दूर करणारी, वैभवाच्या शिखरावर नेणारी, हाताशी आलेली ही दैवदुर्लभ सुवर्ण संधी नको त्या दळभद्री शंकेच्या आहारी जावून घालवून बसणं हा आपला करंटेपणा आहे. कन्येला तिच्या सौंदर्य सामर्थ्याच्या स्वबळावर राजवैभवाची प्राप्ती होवू घातलेली असताना भलत्याच शंका कुशंका काढून आपण तिच्यावर अन्याय करत आहोत असा एक विचारही त्याचा मनाला स्पर्शून गेला.

              अशी द्विधा अवस्था निर्माण झाल्यावर धूर्त राजकारणी मुत्सद्दीपणे निर्णय प्रलंबित ठेवून थोडा अवधी घेतात. राजकुमाराला अट घालण्यात लाख्याचाही तोच कुटिल हेतू होता. कदाचित सुखांगी राजपुत्र अटीला घाबरून त्याने माघार घेतली तर सुंठी वाचून खोकला गेला असता. कदाचित त्याने ही अट पूर्ण करण्याची तयारी दर्शवली असती तरीही हे कार्य त्याची सत्वपरीक्षा घेणारे आहे याची लाख्याला पूर्ण कल्पना होती. त्याच्या ज्ञातीत मूल लहान असल्यापासून ही विद्या शिकवली जाते कारण बालवयात विविध अवयव वळविण्याची, ना कळतेपणी जीवावर उदार होवून वाटेल ते दु:साहस बेदरकारपणे करण्याची सवय जडवणे सोपे असते. या ठिकाणी राजपुत्र पूर्ण वाढ झालेला निबर, शिवाय कष्टाची, अंगमेहनतीची सवय नसणारा. तो कालत्रयी घोरपी विद्या शिकू शकणार नाही. विशिष्ट मुदतीत अट पुरी झाली नाही तर त्याचा अडसर आपोआप दूर होईल असा दूरदर्शी विचार लाख्याने केलेला होता हे नक्की. त्याच बरोबर राजकुमाराची मागणी ही एक प्रकारची आपत्ती आहे असेच लाख्याला वाटत होते. हा भविष्यात आपल्या कह्यात राहणार नाही हे लाख्या ओळखून होता. म्हणून राजवैभवाचा मोह त्याला भुरळ पाडू शकला नाही. फक्त थेट नकार देऊन राजक्षोभाला बळी पडणे टाळण्यासाठी त्याने घातलेली अट ही एक कुटील खेळी होती.

                      एक जबाबदार सुसंस्कारी राजपुत्र जिगरबाजपणे डोंबाऱ्याची अट हे आव्हान समजून घोरिप विद्या अवगत करतो. आपली कला कसब डोंबाऱ्याला दाखवीत असताना जीवावर बेतणारा एक क्षण येतो. राजपुत्र आपल्या कसबाने त्यातून सुरक्षित बाहेर पडल्यावर मात्र त्याला उपरती होते. एका य:कश्चित डोंबारणीसाठी आपल्या सारख्या वैभवसंपन्न राजपुत्राने जीवाची बाजी लावावी हे कितपत योग्य असा प्रश्न त्याला पडतो. सौंदर्याच्या मोहाने कामातुर होवून आपल्या सारख्या सुसंस्कारीत राजपुत्राने सारासार विवेक बुद्धीही गहाण टाकावी याचा त्याला पचचात्ताप होतो. नाड्यावरून खाली उतरल्यावर तो बाणेदारपणे डोंबाऱ्याला सांगतो की, “तु घातलेली अट मी पूर्ण केली आहे. क्षणिक मोहाला बळी पडून माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. पण आता मी ताळ्यावर आलो आहे... तुझ्या मुलीबद्दलची मला वाटणारी ओढ आता संपली... तू आपल्या लेकीसाठी घोरपी विद्येत निष्णात असलेला एखादा स्वजातीय तरुण शोध. मी ईष्येला बळी पडून कसबी डोंबारी बनून दाखवलं. पण तुझी मुलगी माझी अर्धांगिनी बनून मी ज्या साम्राज्याचा स्वामी बनणार आहे, तो राजशकट चालवण्याच्या कामी मला साथ देण्यात कितपत समर्थ ठरेल याबद्दल माझ्या मनात संदेह आहे.

      तू आपल्या मनातला संदेह दूर करण्यासाठी माझी कठोर अग्नि परीक्षाच घेतलीस. पण मी ते करणार नाही. माझ्या मनातला संदेह दूर करण्यासाठी मी तिची परीक्षा घेवून तिला त्रास देणार नाही. कदाचित ती आपला वकुब सिद्ध करू शकली नाही तर कायम भळभळणारी जखम तिला आयुष्यभरासाठी दिल्याचं दुःख मला सलत राहील. तू दिलेले अशक्य वाटणारे आव्हान स्वीकारून मी त्यावर मात केली. कारण राज्यकर्त्याला उपजत प्राप्त होणारे कोणतेही आव्हान स्वीकारण्याचे धाडस निसर्गत:च मला लाभलेले आहे. तुझी अट मी निधाराने स्वीकारली नी विजिगीषू महत्त्वाकांक्षेने अपार कष्ट सोसून ती पूर्णही केली. 

          राजघराण्यात जन्माला आलेल्या कुणालाही त्यात काही मोठेसे अप्रूप वाटणार नाही. कारण राजभोग हा केवळ ऐश्वर्य आणि सुखविलासी जीवनक्रम नाही. उपभोगाच्या प्रत्येक क्षणी असीम त्यागासाठी आणि प्राणाची बाजी लावायला सिद्ध राहण्याचा निरीच्छपणा राजपुरुषाकडे असावाच लागतो. इच्छा प्रबल असेल तर सामर्थ्यवान माणूस कोणतेही आव्हान पेलू शकतो. या न्यायाने तुझे आव्हान मी स्वीकारले. त्यामागे एका सौंदर्यवतीची प्राप्ती ही प्रेरणा होती. तुझ्या कन्येच्या मनात राजपुत्राची प्राप्ती ही इच्छाच असणे संभवत नाही. माझा स्वीकार ती सत्ता, वैभव, ऐश्वर्य किंवा कदाचित अपरिहार्यता म्हणून करीलही. पण या गोष्टी विजिगीषू प्रेरणा नाही बनू शकत. तात्पर्य मला माझी अर्धांगिनी म्हणून एखाद्या राजकुलातली उपजत राजस गुण प्राप्त असणारी सुसंस्कारी राजकन्याच मिळविली पाहिजे. दुसरे म्हणजे तुझी घोरिप विद्या मी शिकलो असलो तरी मला उपजीविकेसाठी नाडे घोरपाचे खेळ करीत गावोगाव भटकंती करण्याची जरुरी नाही.           

         कदाचित मला घोरिप विद्या अवगत करण्याची अट घालताना ती प्राप्त केल्यावर तिचीच साधना करून तुझ्या अंकित राहून मी उर्वरित आयुष्य कंठीन अशी तुझी सुप्त इच्छा असेल तर ती मी कालत्रयी पूर्ण करणार नाही. माझ्या हाती अनिबंध सत्ता संपती भविष्यात आली तरी माझा श्वशुर म्हणून तुझ्या चरितार्थाची तरतूद हे मी आद्य कर्तव्य म्हणून स्वीकारणार नाही. तशी रुढी किंवा धर्मसंकेतही नाही. किंबहुना कन्यादान केल्यावर कन्येवरचा तुझा हक्कच संपला. मी घोरपी विद्या आत्मसात केली याचा अर्थ तुझी जीवनशैली स्वीकारली असा नाही. आव्हान संपल्यावर त्यातला फोलपणा माझ्या पूर्णपणे ध्यानात आला आहे. तुझ्या कन्येचे सौंदर्य हे एकमेवाद्वितीय आहे असे नाही आणि तिचे सौंदर्य हा काही सुंदरतेचा एकमेव मापदंड नाही. हे उशिरानि कां असेना मला उमजले आहे. एका वैभव संपन्न राजघराण्याचा वारस म्हणून अभिषिक्त सम्राट होऊन राज सिंहासनावर विराजमान होणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. स्त्री सौंदर्याच्या मोहापायी मला निहित कर्तव्याचा विसर पडला होता. पण आता मी भानावर आलो आहे.” राजपुत्राची स्पष्टोक्ती ऐकल्यावर पुढे काही बोलण्यासारखे उरलेच नव्हते. आपण त्याला पारखण्यात उणे पडलो याची खात्री पटून कोल्हाट्याची नजर शरमेने खाली झुकली.

                               नाडे घोरपाचा खेळ ही शिव-शक्तीची लीला आहे असेही मानणारा एक मतप्रवाह आहे. अशा आशयाची काही गीते लाख्या कोल्हाट्याचे चरित्र मांडताना कीर्तनकार गाऊन दाखवतात. डोंबारी नी त्याची पत्नी ही शिव आणि शक्ती यांची रूपे असून दोघेही अवघड कसरत करताना परस्परांसाठी प्रेरणा स्रोत बनत असतात. तसेच जीवावर बेतणारा अवघड कलाविष्कार यशस्वीपणे साकार करण्यासाठी अवधानावर चित्त केंद्रित करण्यासाठी एकाग्रता टिकवून धरायला ढोलकीचा प्रोत्साहनपर नादध्वनी साथीदार निर्माण करीत असतो. त्या दृष्टीने विचार करता नाडे घोरीप हा शिव आणि शक्तीचा संगम आहे ही उपपत्ती मला अधिक संयुक्तिक वाटते.         

                                                       

1 टिप्पणी:

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...