बुधवार, १३ मे, २०२६

कोकणातले भोरपी

                                  

                                                  कोकणातले भोरपी

 

                          लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी सकाळ-संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो. ग्रामपंचायतीसमोर एसटीची गाडी वळून जायची तिथे आलो नी बघतो तर काय... उघडे बंब कासष्टी लावणारे चार पाच बापये शंकेश्वराच्या ओवरीबाहेर चिंचेखाली सात आठ बांगर पाडे घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी-कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात तसला पोटावर खिसा असलेला गोल गळ्याचा मांजरपाटाचा गंजीफ्रॉक वजा सद्रा घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तोपर्यंत चिंचेखाली दोन तीन लाकडी खुंट्या ठोकून त्यांना पाडे टांगून बापये चिंचेच्या पाळांवर बूड टेकून बसलेले होते. त्यातला एकजण चिलम ओढीत होता त्याने दोन झुरके मारून चिलम सोबत्याकडे दिली. बापयातला पोरगेलासा होता तो वगळता बाकी सगळ्यांनी झुरके मारले. शेवटच्याने दोन तीन झुरके मारल्यावर चिलीम उलटी करून रिकामी केली, फडका गुंडाळून खिशात ठेवली.

                  तेवढ्यात तीन चार बाईल माणसे नी चार पाच पोरांची फटावळ आली नी डोक्यावरची काचकी बोचकी देवळाच्या तटाजवळ ठेवून बाईल माणसे तिथेच फतकल मारून बसली. ते कोण काय सगळी इत्थंभूत माहिती सहावी सातवीतल्या जाणत्या पोरांनी दिली. ते भोरपी होते. हे भोरपी कमरेला अर्धे अर्धा कुला झाकणारी लंगोटी सदृश कासष्टी लावीत नी बिन हाताची बंडी चकवा कोपरी घालीत. हे लोक शेतकरी व अन्य गुरे ढोरे बाळगणाऱ्या लोकांची म्हातारी, खोड्याळ अवजडपणामुळे हडखडलेली गुरं अल्प स्वल्पात विकत घेत. मृगाच्या टायमाला मुरातून पाडे आणून गावोगाव फिरून विकीत. मुरातले पाडे तल्लख आणि बारदार कामाला लायक असल्यामुळे शेतकरी तिकडचे बैल पाडे चढाओढीने चार पैसे जादा झाले तरी देवून घ्यायला झटत.

                     यांचा दुसरा धंदा म्हणजे हे लोक मच्छीमारीला लागणारी कांडळ, आकी, पाग ही आयदणं विणीत. तो लावणी सुरू व्हायचा समय असल्यामुळे ते मुरातले पाडे विकायलाच आलेले होते. शाळेतली पोरं घरी गेल्यावर भोरपी पाडे घेवून आल्याची वर्दी गावभर झाली. दुपारी वाड्या वाड्यांमधले जाणते लोक तळावर जमले. आणलेले सगळे पाडे चार दाती नी बांगर होते. मुरातले बैल बेतके अटकर, शिंगोटी बेताची नी रंग पांढरा, कबरा, कसरा, नाकपुडी काड्यापेटीतल्या काडीचा गोल असतो तशा फिक्कट तपकिरी रंगाची. क्वचित एखादा पाडा मोरा चकवा काळे पांढरे ठिपके असलेला बाळ असायचा. मुरात दऱ्या दरडींच्या भागात हिंडलेले पाडे काटक नी कामाला न डगणारे. जनावरं बेतखुरी नी किमतीकडून गोरगरीबाला परवडणारी. घाटी पाडे महाग. क्वचित कोणी पैसेवाले हौशी लोक घेत असत.

                      काही गिऱ्हाईकं अदलाबदली करत. म्हणजे आपल्या गोठ्यातली म्हातारी, खोड्याळ, लंगडलेली जनावरं देवून वरचे पैसे देवून नवीन पाडे घेत. अशा लोकांच्या घरी जावून भोरपी ते जनावर बघत. ते पडत्या किमतीला मागत नी सौदा पटला तर व्यवहार व्हायचा. आपल्या पाड्यांच्या किंमतीत पाच दहा रुपयेही कमी न करता किंमत लावून धरीत. खरेदीदारही महाखट. काही लोभी गिऱ्हाईकं चार चार दिवस सकाळ दुपार खेटे घालून दरखेपेला रुपया दोन रुपये बोली वाढवून सांगायचे. काही वेळा त्यांनी टेळलेल्या पाड्याला गावातलं दुसरं कोणी गिऱ्हाईक लागलंच तर मग तानमान बघून अखेरची बोली सांगून जनावर उचलत. अर्थात दरवेळी ही खेळी साधे अशातला भाग नव्हता. पण अशी वेळ येईल तेव्हाच अगदी नाइलाजाने आपली बोली वाढवून बैल पाडा खरेदी करीत.

                    काही जनावरातले दर्दी नी सरळ मार्गी लोक एखादा पाडा पसंतीला उतरला की कसलाही घोळ न घालता नेमका रास्त आकडा बोलून व्यवहार करून मोकळे होत. अशावेळी भोरप्याला लांब एकांतात नेवून सौदा ठरवीत. ते परत आले नी रक्कम द्यायला लागले की, त्या पाड्यावर टक ठेवून असणारे नव्या खरेदीदाराशी, भोरप्याशी हुज्जती घालीत असत. अर्थात भोरपी व्यवहाराला ‘चावून चिकट नी ओढून बळकट’ असले तरी एकदा टाळी मारली की मग त्या जनावराला पाच-दहा रुपये चढ देणारा कोणी आला तरी दिला शब्द मोडीत नसत. वर्षानुवर्षे सवय असल्यामुळे आणि बारागावचं पाणी पिवून आलेल्या गिऱ्हाईकाची अचूक पारख त्यांना असायची. हौशी खरेदीदार तर ते उज्जू ओळखीत. झटून आलेल्या माणसाला बाजूला नेवून दोघे तिघे भोरपी त्या माणसाने सगळ्या जनावरातून नंबरबाज वाण उचलला आहे, अशी तारीफ करून ते जनावर रंग रूपाने नी लक्षणाने कसं उजवं आहे हे त्याला पटवीत.

                       मथवून मथवून त्या माणसाला डफ्यावर चढवलं की, तो मागचा पुढचा विचार न करता चढ्या दराने सौदा करी. अशावेळी जनावर सोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यांपैकी कोणीतरी चौकशी केली की निलंदर भोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना धोर बघितल्यावर त्यांना अचूक अंदाज यायचा. हे जनावर वय झालेलं आहे, लंगडलेलं आहे. आपल्याखेरीज दुसरं कोणीही गिऱ्हाईक हे उचलणार नाही. हे पक्कं हेरून ते ढोराची केंड करीत. “अराऽऽरा, निस्तं कातडं नी हाडं, हाईत शेठ. आमी दहा गाव फिरणारं. वाटेला कुठे गचकलं तर मुदलातच बूड...” नी अगदी पडत्या भावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपी सहसा मानगतल्या शब्दाबाहेर छादामही जादा द्यायला तयार नसे. सौदा मोडला नी भोरपी निघून गेल्यावर घरात बोलणं होई. काहीच न मिळण्यापेक्षा भोरपी देतोय ती चोराच्या हातची लंगोटी म्हणून दुपारी–संध्याकाळी तळावर जावून संबंधित भोरप्याला भेटून व्यवहार ठरवून मोकळा होत असे.

                      हे भोरपी महादेव कोळी या वंशाचे. मारुती चितमपल्ली या प्रख्यात अरण्य ऋषींनी इंडिया डोहावर लिहिलेल्या लेखात त्यांना भेटलेल्या डोमा धीवराचे अतिशय मनोवेधक वर्णन केलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारीला लागणारी आयदणं- पाग, कांडळ, आऊत, आकी, झाबळी ही आयदणं, फळ तोडणीचे झेले विणणे, हा आहे. तसेच काथ्याच्या दोरीची अंबाड्याच्या, तागाच्या क्वचित वाखाच्या नाहीतर कापशी जनावरांची दावी, मोरक्या, मुसकी, वेसणीची रशी, जुंपणं वळण्यातही हे लोक तरबेज असत. तसेच गोड्या नी खाऱ्या पाण्यातली मासेमारी करण्यातही हे लोक वाकबगार असत. माशांचे थवे नेमके कुठे असतील, हे त्यांना उपजतच समजायचे. भरती-सुकतीचा ताण नी तिथी वार यानुसार मासेमारी करायचे अचूक होरे त्यांना परंपरागत ज्ञात असत. म्हावरं नेमकं कुठे नी कधी मिळेल याच नेमकं ज्ञान असल्यामुळे मासेमारीला गेलेला भोरपी काही मिळालं नाही म्हणून हात हलवीत परत येत नसे. कोणत्या जातीचे मासे दिवसाच्या कोणत्या वेळी गावतात हे कसं कोण जाणे पण त्यांना अचूक माहिती पडायची. ते नेमक्या समयाला पाग, कांडळ घेवून जात नी अती वेळ न घालवता टोपल्या भरभरून मासे पकडून आणत. मात्र त्यांचे होरे, आडाखे नी अंदाज यांचा तपशील मात्र ते प्राण गेला तरी कोणाला सांगत नसत. दिवसा, रात्री अवास्तूकपणे ते जेव्हा कधी म्हावरं पकडायला जात त्याचा चकचीत सुगावाही कोणाला लागू देत नसत. कुळवाडी त्यांच्यावर भलताच खार खात. “ह्यांच्या वांगडं जावचा तर माझ्या कदी दडोन  जातात तां कळूक देणार नाय. पक्की अक्करमाशी जात.”

                        वाटेने येता-जातानाही प्रत्येकाच्या खांद्यावर अर्धवट विणलेला पाग म्हणा आऊत म्हणा टाकलेला असे नी त्याचे विणकाम विद्युत गतीने यंत्रवत सुरू असे. त्यासाठी वेगळे लक्ष न देता त्यांचे काम अगदी बिनचूक नी देखणे होत असे. मोठेपणी कुतूहल म्हणून गोपा भोरप्याला हटकले तेव्हा त्याने दिलेले उत्तर ऐकून मी थक्क झालो. तो म्हणाला, “ह्या कामात आमच्या कैक पिढ्या गेल्या मालक, आमी महादेव कोळी. आमच्या रक्तातच हे कसब मुरलेलं राहतंय म्हणा. मायच्या पोटात असताना हे कसब शिकूनच आमचा जन्म होतो की...” विणकामासाठी दोरा गुंडाळलेली त्यांची स्वनिर्मित लांबुडकी नळं असतात. छत्रीच्या गोल घेराला टेकावा देणाऱ्या लांब ताडीला नी मधल्या रहाटाला गुंफवलेल्या चौकोनी ताडीचे तीन ते चार तुकडे करून त्याची दोन्ही टोकं अर्धा इंच दुभाग होतील अशी फोडून घासून गुळगुळीत करून दोरा गुंडाळायची आटी-हूक बनवलेला असतो. त्याला ठराविक लांबीचा दोरा गुंडाळून घेतात, म्हणजे विणकाम करताना जाळीच्या घरातून ओवून घेवून जाळीचे विणकाम वाढवीत जाणं सोपं होतं. प्रत्येक आयदणाच्या जाळीचे घर किती मापाचे पाहिजे ते ही त्या आयदणाचा वापर कोणत्या जातीचे नी आकाराचे मासे पकडायचे हे योजून निश्चित केलेलं असतं. त्या मापाची सुकलेल्या चिव्याची पाठबेळं त्याला ते ‘माप-ज्वॉक’ चकवा ‘घरक्याचं माप’ म्हणतात. कोणत्या आयदणाला किती जाडीचं सूत वापरायचं ते ही नंबर नुसार ठरलेलं असतं.

                 प्रत्येक आयदणाची लांबी-रुंदीची मापही पारंपरिक-ठरीव असतात. पाग पाण्यात फेकल्यावर गोलाकार राहावा म्हणून प्रत्येक घरक्यात सूत ओवता येईल एवढं छिद्र असलेल्या विशिष्ट लांबीच्या पुंगळ्या–नळ्या वापरतात. प्लॅस्टिक वापरात येण्याआधी पाणस्थळाच्या काठावर तसेच विशिष्ट ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यांवर तांबेट, चांभारडी वा तत्सम नावाची गवतं रुजतात. ती पिकल्यावर ठराविक नक्षत्रावर शुक्र उगवती मावळतीचा होरा साधून ती कापून आणत. त्याच्या काड्यांच्या पुंगळ्या वापरीत. या पुंगळ्या पाण्यात न कुजता जाळं शाबूत असेतो टिकत. तसेच पाग बुडण्यासाठी जडपणा यावा म्हणून शिशाच्या ठराविक मापाच्या मध्ये छिद्र पाडलेल्या गोळ्या वापरतात. कांडळ हे पाण्यात उभं करायचं एक प्रकारचं कुंपणच त्याची एक बाजू जड आणि एक बाजू हलकी असावी लागते या साठीही पुंगळ्या नी शिशाच्या गोळ्या वापराव्या लागतात. आयदण संपूर्ण विणून पुरं झालं की मग त्याच्या टोकाच्या घरक्यांमध्ये पुंगळ्या चकवा शिशाच्या गोळ्या वेगळा दोरा वापरून गुंतवाव्या लागतात.

                 एखादं आयदण विणून ते पुंगळ्या नी गोळ्या गुंतवून उजू होईतो प्रचंड खटापट असते. हे अत्यंत किचकट नी वेळमोडं काम असतं. जाळी विणताना आटीचा धागा संपला की त्याच्या टोकाला नव्या आटीतला धागा विशिष्ट पद्धतीची गाठ मारून जोडावा लागतो. कारण वापर करताना ती गाठ नडीला येता कामा नये. नायलॉनचा धागा वापरात येण्याआधी आंबाडी, ताग आणि विशिष्ट प्रक्रिया करून सुती दोरा चिवट करून तो वापरला जायचा. भोरपी आले त्यावेळी वरच्या वाडीत सरवज्याच्या घराजवळ रस्त्यावर बांधलेल्या मोरीच्या विरुद्ध बाजूला पावसाळी पाण्याच्या ओघामुळे पुरुषभर खोल कोंड होती. त्यात वीत भर लांबीचे चपटे रंगाचे मासे दिसायचे. आमचा वाटेकरी, पांडू हेमल्याला अदलाबदलीवर पाडा द्यायचा सौदा ठरल्यावर काळू नी गोमा भोरपी त्याच्याकडे बदली बैल आणायला गेले. परत येताना गोमा भोरप्याने सहज म्हणून कोंडीत नजर टाकली. बैल तिथेच टांगून त्याने काळूला पाग आणायला पिटाळले. काळू पाग नी टोपलं घेवून आला. गोम्याने कोंडीत पाग मारला. दोन वेळा पागून त्याला टोपलीभर सावे मासे मिळाले. निम्मे तिथेच खपले. पांडू हेमल्यानेही दहाबारा मासे घेतले.

                  दुसरे दिवशी पांडू आमच्या घराखाली मळ्यात चिखल करायला आला. त्याचं तोंड सुजून भप्प झालेलं, ओठ सुजून केळ्यासारखे टरटरीत झालेले नी डोळे अक्षरश: सूज ओथंबून हुरलेले होते. काय झाले विचारल्यावर तो म्हणाला, “माका सावे-सावे गोड्या पाण्यातले मासे पटत नाहीत. ते खाल्ल्यावर चेहरा सुजतो. पण साव्या माशाची चव खाऱ्या मच्छीपेक्षा माका लय आवडते. आता म्हणाल तर साव्या माशाला विटाळ लय... माझे दोन्ही पोर साव्या माशाची कढी खात नाहीत, मी, माझी बायको, आई नी पोरं चौघेजणं खातो. भोरपी आठवडाभर मुक्काम ठोकून होते. त्या मुदतीत त्यांनी मळ्यात खांब तळ्यात निवल टाकून सावे मासे मारले होते. लखू परटाच्या घराजवळ मोठं निवल्याचं बेट होतं. भोरपी आल्यावर चार दिवस सलग चार दिवस पावसाने दडी दिली होती नी खामतळं वाहायचे बंद झाले. भोरपिणी कपडा लत्ता धुवायला त्या तळावर जात त्यांनी तळ्यात मोठे मोठे मासे बघितलेले होते.

               पावसाळी मळा पाण्यात बुडाल्यावर खाडीतले मासे ओघाच्या पाण्यात मळाभर पसरायचे. त्यातले काही खाम तळ्यात थांबलेले होते. तळं वाहायचं बंद झाल्यावर भोरप्यांनी परटाच्या घराजवळची निवल तोडून त्याचा भारा बांधून आणला. भोरपिणींनी तळ्याच्या काठावर बसून त्याचे बोट बोट लांबीचे तुकडे तोडून घेतले नी नंतर ते एकत्र पुंजावून तळ्यात ढकलले. हे काम फार जोखमीचं, फार काळजी पूर्वक नी सांभाळून करावं लागतं. निवलीच्या डिंकाचि अगदी बारीकसा थेंब चुकूनमाकून डोळ्यात उडाली तर डोळा फुटला म्हणून समजा. त्याच्या डिकाचा नुसता दर्प हाताला लागला तरी हात फोफावतो. हातापायावर थेंब उडाला तर तिथे फोड पडून तो पुवळायला येतो. जपून काम केलं तरीही भोरपिणींचे हात फोफावले होते. तळ्यात निवल काड्या टाकल्यावर माशांचे डोळे फुटले नी मासे पृष्ठभागावर उपळायला लागले. कोणीतरी ही बातमी दिल्यावर शाळेतल्या पोरांची नुसती झुंबड जमली तळ्यावर. भोरप्यांनी आखी वापरून मासे पकडले नी दोन टोपले भरून मासे मिळाले. काही काही मासे हातभर लांब होते. शंकर परीट मोठी पिशवी घेवून तळावरच होता. त्याने दहाबारा मोठे फडफडीत मासे आणि दोन ओंजळी लहान मासे निवल्याच्या बदल्यात उचलले. भोरपिणी लगेच वडासमोर मासे विकायला बसल्या. आमच्या शाळेतले बांदकर, लोके मास्तर, पोकळे बाई यांनीही त्या दिवशी मासे घेतले. रस्त्या कडेला माजलेल्या रान अळवाची पानं तोडून घेवून लोक त्यात मासे गुंडाळून घेत.

               त्या आठवडाभरात भोरपिणी गावात फिरून गोधड्या शिवून द्यायचं काम करीत. आमची आई त्यांची वाटच बघत होती. दोन दिवसांनी त्या आमच्या वाडीत आल्या. आईने वाडीत कोणाकोणाला सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे दुपारी अकरा वाजायच्या दरम्यान दोघीजणी उज्जू आमच्या घरी आल्या. त्यांच्या सोबत एक लहान पोरगी नी पोरगा होता. पोराच्या अंगात ढुंगणावर फाटलेली चड्डी होती. पोरगेली भोरपीण होती तिची साडी म्हणजे दोन वेगवेगळ्या साड्यांचे धडपे एकत्र जोडून नऊवारीपेक्षा जरा कमी लांबीचा नग उभा केलेला होता. म्हणून काष्टा मारून ढोपरापर्यंत उंची आली होती नी कमरेच्या एका बाजूला एक डिझाइन नी दुसऱ्या बाजूला दुसरे डिझाइन, निऱ्यांच्या घोळातून गोधडी शिवायच्या धाग्याने जोडकाम डोकावत होते. दोन गोधड्या शिवायच्या होत्या. आईने दरादामाची चौकशी करून अस्तरासाठी दोन धडकी साड्या, परकरांचे नी कसले कसले साठलेले धडपे, दोन तीन जुनी धोतरे, आक्का-ताईची दोन जुनी पातळं नी दोन विरलेले बुरणुसाचे तुकडे असा ऐवज दिला. दोन तुकड्याची साडी नेसलेल्या बाईने त्यातली बरीशी साडी उचलून आशाळभूत चेहरा करीत म्हटले, “मावशी, माझं हे कापड–नेसूचं लुगडं अगदी निमित्तापुरतं राहिलंय बघा... हे कापड मी घेतो, माझे दोन मोसम निभतील... नाही म्हणू नको. वाकळीच्या मजुरीतून झालं तरी पैसं कापून घ्यावा ...” त्यावर हसून आई म्हणाली, “अगो तिचा पदर विरला होता म्हणून तो फाडून टाकलाय पुऱ्या लांबीचं नाहीये ते.” क्षणाचीही उसंत न लावता मोठी भोरपीण म्हणाली, “तेला काय करणार...” भण माजी बारकुड्या अंगाची हाय त्याला होईत बरोबर. आता अंगावर हा त्येच्या पक्षा जादा भरतंय ....."

     आई म्हणाली, “मी तुला दुसरं चांगलं लुगडं देत्ये, नी तिने आक्काला खूण केली." आमचा एक मामा देवीच्या देवस्थानात सेवेकरी म्हणून काम करायचा, त्याने देवीला नेसवलेल्या लुगड्यापैकी एक सहावारी हिरवं काठ पदराचं लुगडं आमच्या आक्कासाठी म्हणून आणून दिलेलं होतं. त्यावेळी लग्न झालेल्या मुली असे रंग वापरीत नसत. अक्का ताई दोघीना तिची आली होती. त्यानी ते नवं कोरं लुगडं तिच्या हातात दिल्याल्यावर तिला काय बोलावं सुधरेच ना. हर्शोत्फुल्ल नजरेनी तीने त्या साडीचा वास घेतला सोबतच्या बाईला म्हणाली, "ह्ये अक्षी नवं कोरं हाय आक्का......." नी आनंदाने तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. मोठी बाई बोलली. "ही माजीच भन हाई...... सा म्हैन्या मागे माज्या धकट्या दीराला ही करून घेटलो...... तिला लग्नात पण नवा कापड भेटलेला नाय. मी माजा जरा बरां कापाड तेला दिला म्हनू डोळ्यान पानी काडला तेनी......" त्यानंतर आईने दुसरा दणका दिला.

        आई शिवणकाम करायची. मामा अधून मधून खण पाठवायचा. देवीला दिलेल्या तोकड्या खणात चोळी बसत नसे. पण आई एका खणात आढलक पुढलक (मागचा पुढचा भाग) नी दुसऱ्या खणात हातोपे बसवी.  चोळी – पोलक्याची पाठ नी पुढा एरवी तरी बराचसा पदराखाली झाकला जात असे. अशा चोळ्या पोलकी ती मोफत शिलाईचा पैसाही घेता गरजू बायाना देत असे. तीने अंदाजाने आपली बोचक्यातून भोरपीणीला होईल अशा बेताची नवी चोळी तिला दिली. आता तर ती भलतीच हरखली. आक्का सोबत मागच्या पडवीत जावून ती नवीन साडीचोळी लेऊन आली. तीने सहावारी साडी काष्टा मारून नेसली. नऊवारी साडी इतकी पायघोळ नसली तरी आढीच्या दोन तुकड्याचा साडीपेक्षा लांब ढोपरं झाकून पोटरीपर्यंत लांब पोचली. आल्यावर आईला चार चारदा वाकून नमस्कार केला. आमच्या आईचा अंदाज पक्का होता. चोळी तीला बरोब्बर झाली.

             एरवीही तिच्याकडे बायका चोळ्या पोलकी शिवायला आल्या तर कोणाचंही माप घेता केवळ नजरेच्या अंदाजावर नी नग उभा करी नी तो नीट मापाप्रमाणे बसायचा. क्वचित एखाद्याच माप ती घेई, टेपवरचे इंग्रजी आकडे ती आम्हाला विचारून घेई नी ते लिहून घेता लक्षात ठेवून कपडा शिवीत असे. दोन्ही भोरपिणीनी साडीची दुघडी अंथरून त्याच्या अर्ध्या भागावर एकापुढे एक असे धडपे शिस्तीत जुळवून घेतले. जादाचा भाग त्या कोयती वरच कापणार असत्या पण आईने थांबवून कात्री आणून दिली. गोधडीच्या पोटातलं भरवण घालून झाल्यावर त्यावर दुघडीचं अर्धक घातल्यावर दोघीनी मिळून एकेका गोधडीची कडण मारून घेतली.

        साडेबारा च्या दरम्याने आईने दोन मोठ्या केळीच्या फाळक्यांवर भला खासा भाताचा ढीग, दोन दोन भाकऱ्या, चवळीची आठिळा घातलेली उसळ, मोठ्या वाडग्यातून आमटी नी अल्युमिनीयमच्या कथलीतून ताक, एका फाळक्यावरून चवडाभर खारातल्या मिर्ध्या (कोकणात ओल्या मिर्ध्या मधे दोन भाग करून मोहरी, मेथी, मीठ नी तेल घालून एक प्रकारचं लोणचं घालतात) वाढून आणून ठेवली. पोरं लगेच पुढे धावली. त्याना दटावीत आई म्हणाली, "रे आधी थांबा जरा, जा गो, आधी त्यांचे हात पाय, तोंड धुवून आण" पोराना मागच्या पडवीत नेवून हातपाय धुवून आल्यावर दोघीनी एकेका पोराला आपल्या पानात बसवलं भाताच्या एका कडेला थोडी आमटी ओतून जरा कोलसावल्या सारखं करून पोरं झेलवीत झेलवीत त्याचा चेंडू करून मोठे मोटे घास कोंबीत.

           मग त्यानी अर्धी अर्धी भाकरी खाल्ली त्याना तोंड धुवून आणल्यावर भोरपिणी जेवायला बसल्या. खारातल्या मिर्ध्या घरी न्यायला म्हणून पुरचुंडी बांधून बाजुला ठेवल्या. मग त्यानी लाल तिखट मागून घेवून एक चमचा भातावर नी एक चमचा उसळीर घालून घेतलं. त्यानी आधी भाकरी खाल्ली नी मग भात खायला सुरुवात केली. आई भात घेवून आली. भोरपीण म्हणाली, "भाजीत फणसाच्या घोट्या (आठिळा- बीया) व्हत्या ना मावशी ? लई ब्येस लागत्यात बटाट्या वानी........" त्या नको नको म्हणत होत्या तरी आईने बचक बचक भात वाढला. त्यानी तोडा भात त्यावर ताक ओतून खाल्ला. जेवण झाल्यावर पानं गोठ्या म्हशीच्या तोडात देवून मोठी बाई शेण गोळा घेवून आली. पानं ठेवल्या जागी शेण बोळा फिरवून आल्यावर पोराना भिंतीच्या कडेला गोणपाट अंथरू त्यावर आडवी केल्यावर गोघंही लुक्कन झोपली.

           आता दोघीनी ही खेपेन दहा सुया चालवीत बोट बोट अंतरावर पट्टीने आखल्यासारखी एका रेषेत झरा झर टीप चालवली. त्यांचा प्रत्येक टाका सारख्या लांबीचा. मशिन मारावी इतकी उज्जू टीप नी त्याच गतीने चौकोनी घेर पुरा करीत शिलाई अंतर्भागाकडे जात होती तसतशी लांबी कमी कमी होत चालली. चार वाजता त्याना चहा दिला. पोरं अजून उठलेलीच नव्हती. संध्याकाळला निम्मे काम पुरं झालं दोन्ही गोधड्या मुसळाभोवती घट्ट गुंडालून खुंटीवर ठेवून त्या उठल्या. "आता उद्या सकाळी बेतावारी येवून दोपारच्याला काम फुरं करतू" असं बोलून पोरं काखोटीला मारून त्या निघून गेल्या.

          दुसरे दिवशी दोघीही वेळे वारी आल्या. आईने दिलेली चहा चपाती खावून त्या कामाला लागल्या. पोरं अंगणात रेवे घेवून खेळायला लागली. मी शळेतून आलो तेंव्हा बरच काम पुरतावत आलेलं होतं बारा वाजता गोधड्या पुऱ्या झाल्या. "जुन्या फाट्लेल्या वाकळा थांग़डायच्या असल्या तर दे मावशीपोरगेली भोरपीण आईला म्हणाली. जुन्या दोन तीन गोधड्या एकदोन ठिकाणी विरल्या होत्या. त्याना फाटलेल्या टीच भर वीतभर ढिगळं मारून त्या धडावून झाल्यावर काम संपलं. आजही आईने पुन्हा भाताचे ठाय लावून आणल्यावर भोरपीणी ओशाळून बोलल्या. "मावशी, चा चपाटी रग्गड झालती की. पुना आणी जेवाण कशा पायी....." जेवून झाल्यावर आई हिशोबाची रक्कम बारा रुपये घेवून आली. भोरपिणी म्हणाल्या, "मावशी दिलस त्येच बक्कळ झालं की .... नवीकोरी साडी चोळी दिलासा त्येचच फीटाना..... वर आनी पैसं कसलं........ पुना कदीतरी येतंव तंवर आनिक दोन वाकळांची भर करून ठेव.... " द्यायचच तर माला जुनी पानी चोळी आसली तर द्ये, नी चार कोंजळी भाकरीचं पीट आसलं तर द्ये, नी चिच, आमसोलं लय थोडी नी घोटया देलीस तर लई उपकार झालं. पैसं म्हणशील तर अज्याबात नकूत......." मोठी भोरपीण बोलली.

           आईने तिच्या मापाची दोन खणाच्या जोडाची नवी चोळी नी दोन जुनी सुस्थितीत असलेली पोलकी दिली. दोनेक शेर भाकरीचं पीठ, चिंच गोळा नी चार वाट्या कुळथाचं पीठ, उन्हाळी माती लावून सुकवलेल्या आठिळा पायलीभर दिल्या. गोधड्यांची निम्मी मजूरी सहा आईने तिच्या हातात घातली. ती आईच्या पायाशी ठेवून चिमटीने गळ्याची चामडी पकडित गदगदलेल्या स्वरात भोरपीण म्हणाला, "मावशी, द्येवाचान् सांगतो, तू दिलीस त्ये थोडं म्हनून म्या लाज सोडून चार जिनसा मागितलो की तुज्याकडं ....वर आनी पैसं नकू......." तरीही तरण्या पोरीच्या हातात नोट कोंबून आई म्हणाली, "कोणा रुपाने सवाष्णी आल्यात माझ्या दारात...... ह्याच्या बांगड्या भरा दोघीनी......."

        भोरपिणी गेल्यावर आम्ही भावंडं त्यांच्या टायल्या मारीत होतो. पसे नको म्हणत होत्या पण चार तोंडानी त्याच्या चौपट जिन्नस अगदी योजून योजून मागून न्हेलेनी...... आम्हाला दटावून आई म्हणाली, “द्यायचे ते दिल्यावर असं बोलीन फुकूट घालवू नये. हातावर पोट असणारी जात. त्याना मागितल्या शिवाय कसं मिळणार? परिस्थिती माणसाला निर्लज्ज बनवते. कोणाच्या परिस्थितीच्या टायल्या मारू नये कधी. देव कोणावर कधी नी कशी वेळ आणील सांगता येत नाही आपल्याकडे असलं नी द्यावं वाटलं तर द्यावं नायतर देवू नये, पण कोणाच्या गरिबीला हसू नये. शत दारिद्र्यात असूनही मजूरीचे बारा रुपये सोडायची दानत त्या फाटक्या भोरपीणीनी दाखविली. लांड्या लबाड्या करता बापड्या साडीला ठिगळ लावून अब्रूदारपणे रहाताहेत काय तीळ थेंब दिलं ते लक्ष्मीच्या चरणी रुजू मी देणारी कोण नी त्या घेणाऱ्या कोण" आमच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन पडलं होतं.

      त्या नंतरही भोरपी दर सीझनला नेमाने यायचे त्याना बहुशा बरे दिवस आलेले असावेत, कारण आता पंचवीसेक पाडे असत. एवढी रक्कम उभी करायची ऐपत त्याना आली असणार. आठवडाभर आमच्या गावात मग वाडा असा त्यांचा मुक्काम असे. तिर्लोटीतून सदला बदलीत एक उमेदवार पाडा कोणीतरी दिला होता. त्याची शिंग पाशी नी एक लांब नी एक आखूड हे वैगुण्य ! गावातल्या न्हाव्याने बेताबाताच्या किमतीत तो उचलला. इथला बाजार आटोपून भोरपी वाद्या चांभार घाटी जवळ गेले.

        शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही घरी येत होतो. खाम तळ्याजवळ गर्दी दिसली म्हणून आम्हीही पुढे गेलो. न्हाव्याने तिथे चिखल धरली होती. भोरप्याने दिलेली पाडा जुवासकट बसलेला होता नी सोबतचा पाडा मान खाली घालून उभा होता. भोरप्यानी खोड्याळ बशा बैल फसवून गळ्यात बांधला होता. आजुबाजूला नांगरट करणारे जाणकार आले. ज्याला जे सुचले ते उपाय करून झाले. जनावर असं डॅबीस की पेंडीचा खडा खाण्यासाठी मुस्कर वर करणं दूरच गालोडीत बळे बळे कोंबलेला खडा थुकून टाकी. पाच सहा दांडग्या बापयानी पोटाखाली दांडे घालून वर उचललेनी तरी द्वाड झालेला पाडा पायच टेकिना. मग शेपटी खाली काटेरी निवडूंग सारायचा अघोरी उपाय केला. त्या उपायाने चामडी रक्ताळळी पण पाडा उठला नाही. माळक जू सोडून बाजुला गेला. तासाभराने कंटाळून घरी गेला तरी पाडा बसूनच. सगळं सामसूम झाल्यावर पाडा उठला नी आल्यावाटेने गोठ्यात गेला. पाणी प्याला नी गवत खायला लागला. भोरपी वाड्यात होते म्हणून त्याना वर्दी द्यायला न्हाव्याचा पोरगा वाड्यात गेला. दुपारी तीन वाजता मालकाने पुन्हा प्रयत्न करून बघायचे ठरवले. पाडा काणी काढल्यावर ढिम्म हालेना. मालकाने दोन तीन छमक्या लगावल्यावर पाडा शिकस्तीने गोठ्याबाहेर आला नी तिथेच बसकण मारली.

        त्यानंतर पाचच मिनिटानी न्हाव्याच्या मुलासोबत काळू भोरपी आला पाळंदीतून येताना "त्येच्या मारी तेच्या तेला खाल्ला वागानी "म्हणत काळू पुढे आला. भोरप्यां जवळ दुमती करून पीळ भरलेली लेली वावभर लांब, आंगठ्या एवढी जाड वाखाची रशी असते. काळूने रशी गोल फिरवून झम्मकन त्याच्या पाठभर वादाडा ओढला त्यासरशी पाडा उठून चालायला लागला. काळू निघून गेला. त्यानंतर दोन दिवस खट खट करता त्याने काम केलं नी परत गोठ्या बाहेर येवून बसकण मारली. गावातल्या जाणत्यानी वाड्यात जावून तंडामुंडी केल्यावर घेतल्या किमतीत वीस रुपये कमी करून नव्याने सौदा ठरवून दुसरा बैल दिला. तो मात्र वहिवाटला. त्याच दरम्याने फणशात दहा भांगे जमिन घेवून रुक्म्या भोरपी तिथे स्थाईक झाला. त्याने तो पाडा आपल्याकदे बाळगला. पावसाळी शेती नी उन्हाळी फडक्यांचे माडा पोफळीचे आगर तो अर्धलीने करी. तिथे बैल रहाट ओढायचे काम बैल मुकाट्याने करी. त्याने रुक्म्याकडे वीस वर्षे इमाने इतबारे जोत नी बैल रहाट ओढायचे काम केले. नंतर पुढचे दात ,दाढा पडल्या नी बैल रवथाचे बोळे टाकायला लागल्यावर रुक्म्याने तो राधानगरीच्या बाजारात खाटकाला विकला.

        अकरावी झाल्यावर आम्ही कॉलेज शिक्षणासाठी बाहेर पडलो. गावाशी संपर्क तुटला. भोरपी विस्मरणात गेले. पुढे हायस्कूलला नोकरीला लागल्यावर त्या गावी दिवाळी नंतर शाळे समोरून भोरपी जाताना दिसले. त्यातला म्हातारा काष्टी लावलेला पण सोबतचे दोन तरणे पोरगे दादा कोडके स्टाईल पॅण्ट नी वर कोल्हापुरी पोटावर खिसा गंजी घातलेले होते, म्हातारा काष्टीवाला नसता तर ते भोरपी आहेत हे माझ्या लक्षातही आले नसते. चौकशी केल्यावर समजले की ती गावात रेडे खरेदी करायला आलेले होते. म्हातारे खडेसर झालेले कसले असतील तसले रेडे ते खरेदी करीत. संध्याकाळी जाताना मांडावर चार रेड्यांची जांगळ वडाखाली बांधलेली नी शेजारी जाळ पेटवून पोरगे निखाऱ्यावर मासे हुलपवताना दिसले. म्हातारा गोविंदाच्या हॉटेलात बसलेला होता. मी आत गेलो नी मला आठवलं की याला मी आमच्या गावात बघितलेला आहे. म्हाताऱ्याला हाक मारली. "काय बाबा" डोळ्यावर पंजा धरून निरखीत तो उत्तरला "मी वळाकला नाय तुला......"  मी कोण कुठचा हे सांगितल्यावर तो बोलायला लागला. त्याचे नाव होते सटवा. काळू भोरपी नी रुक्म्या त्याचे जावई असे तो म्हणाला. त्याला लाडू चहा देवून गप्पा मारल्या. त्यातून एक वेगळीच माहिती मला कळली.

         दिवाळी झाल्यावर भोरपी लोक राजापूर पासून रेडे खरेदी सुरू करून हायवेने गोव्याकडे चालत राहतात.  रस्त्याने जाताना अगदी कुडाळ सावंतवाडी पर्यंत मिळेल तिथे जनावरं घेत हायवेने मार्गक्रमणा करतात. एका रशीला चार पाच रेडे टांगलवून अशी दहा वीस रेड्यांची जांगळ घेवून हायवेने चालत चालत आई, दोडामार्ग रस्त्याने ओल्ड गोव्या पर्यंत जातात. वाटोवाट थांबून आतल्या आतल्या गावानी फिरून रेडे खरेदी  करून मजल दरमजल करीत डिसेंबर मध्ये होणाऱ्या सायबाच्या फेस्ता पर्यंत गोवा गाठतात. तिथे ख्रिश्चन लोक मटणासाठी रेडे विकत घेतात. गोव्यात गेल्यावर काही हॉटेल मालकांचे एजंटही चढ्या भावाने जनावरं घेतात. फेस्ताला सहज दोन तीनशे रेडे खपतात म्हणे. त्यावर्षी पंधरा नोव्हेंबर नंतर सातार्ड्यात भावाकडे गेलो होतो. त्यावेळी  वाटेत म्हाताऱ्या सटवाने सांगितल्या प्रमाणे तीन चार ठिकाणी वीस पंचवीस रेड्यांची जांगळ हाकीत निघालेले भोरपी उमगले. रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या दोरीने जनावराचा एक पाय टांगरवल्यामुळे त्याला धावता येत नसे.


                 सातार्ड्या गेल्यावर भावाच्या शेजारी राहणारे गोव्यात नोकरीला असलेले बागकर मास्तर भेटले. त्यांच्याकडे चौकशी केले असता, सेंट झेवियरच्या फेस्ताला हजारोंच्या सख्येने परदेशी पर्यटक येतात. ते सगळे गायी बैलाचे नी रेड्या म्हशींचे मटण खातात. त्या दहा पंधरा दिवसात शेकड्यांच्या संख्येत जनावरं तुटतात. तसे वर्षभरात कधीही दहावीस रेडे गोव्यात सहज खपतात, कारण गोव्यात नॉन व्हेज हॉटेलांमध्ये ढोरांचे मटण राजरोस मिळायचे. नॉनव्हेज खाणारानी चौकशी केल्यावर वेटर ढोराचे मटण डेका  है किंवा 'बफेलोज्' म्हणून सांगत.

         रुक्म्या नी त्याची बाईल मासेमारीची आयदणं, मोरक्या, मुसकी, उन्हाळी आंबे काढायच्या घळाची आकी विणी. दहागावचे लोक त्याच्याकडून आयदणं घेत. आमच्या गावात भास्कर धनावडा पोर्ट ट्रस्ट मधून रिटायरमेंट घेवून आला. तो अट्टल मासे खाणारा. त्याने मुंबईतून गरवारेचा धागा नी पुंगळ्या नी शिशाच्या गोळ्या अशी सगळी सामग्री आणलेली होती. त्याने रुक्म्याकडून पाग़ विणून घेतला. पाग उजू करून झाला. आता आठवडा भराने आमावास्येच्या ताणावर शेवडीत जायचे होते. त्यावेळी नायलॉनचा पाग़ हा कौतुकाचा विषय होता कलोक येवून बघून बघून गेले. दोन दिवसानी सकाळी भिणभिणताना वाडीतला बेवड्या म्हाद्या भेटायला गेला, मग काय चाकरमान्यानूं, हल्ली मूळबांधार गेला हुतास की नाय? " त्याने खडा टाकला. त्याच्या मुलाने मुळबांधावरच्या भंडाऱ्याच्या मुलीशी प्रेम विवाह केलेला होता. पाव्हणा तालेवार होता. तो आजारी आहे अशी बातमी कळली होती. म्हणून तो बोलला "नाय गेलेलो. पण पावण्याक भेटॉक जावचा हा..... का रे..?" म्हाद्या बेरकीपणे म्हणाला "मी गेलं हुतय.... सजावारी भेटॉक गेलय. पावणो शीक हा. तेचो झील माका म्हणालू हेमल्यानो, म्हाताऱ्याक तांबवशीची कडी खायनशी  वासना झालीहा..... तुमच्या बांदार लय मिळतत..... आमच्या पावण्यान नयो पाग काडलान अशी बातमी हा. तुमी तेका माझा नाव सांगोन पाग मागॉन घेवानी चार कालणावाट्यो हाडून देवा. मी नुको म्हणा हुतय तरी गुलामाच्यान पन्नास रुपाये काडून खिशात घतलान माज्या.

                   दोपारी जोरगतीच्या ताणावर माशे पागूक जायन् म्हणा हुतय पाग दिलास तर...." भास्कर चितपट झाला. त्याने म्हाद्याला पाग़ न्यायची परवानगी दिली. म्हाद्या पाग घेवून गेला. संध्याकाळी भास्कर वाट बघीत होता पण म्हाद्या आला नाही. चार दिवस वाट बघून त्याने म्हाद्याच्या घरी तीन चार वेळा माणूस धाडला पण म्हाद्या घरी भेटला नाही. "हे दोन रोज झाले, खय भायर गेलेहत. पाग खय ठेवलानी हा माका खबर नाय" त्याची बायको ठरीव उत्तर देई. दुसरे दिवशी पाव्हणा गेल्याची बातमी आली म्हणून भास्कर प्रेतयात्रेला मूळबांधावर गेला. अग्नि लावल्यावर त्याने सुनेच्या भावाला बाजुला घेवून म्हाद्याची गोष्ट त्याच्या कानावर घातली. म्हाद्या त्याना भेटलेलाच नव्हता पाग मिळवण्यासाठी म्हाद्याने ते बंडल मारलेले होते, नी भास्कर फसला होता. 

            

 



         

                                                       

1 टिप्पणी:

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...