शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

रेडिओ भाव विश्वातला


                               रेडिओ भाव विश्वातला 

             मला आठवतं की मी पाचवीत असताना म्हणजे १९६३ साली आमच्या गावात पहिल्यांदा विसूभाऊ देवधरांकडे रेडिओ आला. लगतच्या रविवारी उजाडायच्या टायमाला आम्हा पोरांची फरड रेडिओ बघायला विसूभाऊंच्या अंगणात पोचली. आम्ही गेलो तेंव्हा उपाध्ये वठार, बाणे वाडी, तानवडे वाडी, गावकर वाडी पासूनची चाळीस पन्नास पोरं जमलेली होती. घराच्या छपरा समोर दहा एक हाताच्या अंतरावर दोन उंच आवती चिव्याच्या (बांबूचा एक टिकाऊ प्रकार) काठ्या पुरून त्याच्या वरच्या टोकाला तारेत गुंतवलेली सहा आंगळं रुंदीची बारीक तारेची जाळी असून त्याच्या एका टोकापासून एक वायर खाली आणून ती आत पर्यंत नेलेली होती. आम्ही काही विचारण्या आधीच बाणे वाडीतल्या जाणत्या पोरानी आम्हाला माहिती दिली. त्या जाळीला एरियल म्हणतात. हवेतला आवाज पकडून तो रेडिओत नेऊन सोडल्याशिवाय रेडिओ सुरू होत नाही.... आम्ही दबकत दबकत दरवाज्यासमोर जाऊन थांबलो. आतून 'खेड्या मधले घर कौलारू' हे गाणं ऐकू येत होतं. मग 'रिमझिम पाऊस पडे सारखा' गाणं सुरू झाल्यावर विसू भाऊंचा मुलगा गजा पुढे आला. त्याने आम्हा भटांच्या मुलांना ओटीवर रेडिओसमोर नी कुळवाड्यांच्या पोरांना खाली पडवीत बसायला सांगितलं. ती एक चौकोनी पेटी होती. तिच्यातून अगदी जिवंत मनुष्य समोर उभे राहून बोलावे असा आवाज ऐकायला येत होता. दोन तीन गाणी झाली नी कसलासा आपली शेती नावाचा शेती बद्दलची माहिती देणारा कार्यक्रम सुरू झाल्यावर आबा देवधरांनी रेडिओ बंद केले नी "चला आता घरी जावा" असं फर्मान सोडल्यावर आम्ही उठून घरची वाट धरली. पुढच्या वर्षा दोन वर्षात आणखी चार पाच जणांकडे रेडिओ आले नी आमच्याही रेडिओ बद्दलच्या ज्ञानात बरीच भर पडली. त्यावेळी रेडिओसाठी वर्षाला पाच की सहा रुपये लायसन फी पोस्टात भरावी लागे. रेडिओ सुरू होण्यासाठी त्याला मसाला म्हणजे बॅटरी किंवा तीन ते चार सेल भरावे लागत. त्यावेळी बहुसंख्य घरांमध्ये विंचेस्टरच्या विजेऱ्या असायच्या. त्यातही मसाला म्हणजे सेल भरावे लागत. त्या काळी एव्हरेडी कंपनीचे सेल मिळत. त्यावर डोळे वटारलेल्या पळत्या काळ्या रंगाच्या मांजराचे चित्र असायचे. साधारण चारेक महिन्यांनी सेलची पावर उतरायची नी नवे सेल टाकावे लागत. रेडिओचेही तसेच होते म्हणे. गेलेले सेल घेऊन आम्ही खूप दिवस ते टिकवून गाडी गाडीचा खेळ खेळत असू.



             कुळवाड्यांच्या पोरांना सेल कुठून मिळणार? बाणे वाडीतले पोर टकून राहत असत नी देवधर रेडिओतले सेल उतरल्यावर ते कधी टाकून देतात त्यावर पाळत ठेवून सेल हस्तगत करीत. आमच्या चुलत चुलत्यांकडे रेडिओ आला आणि रेडिओतले असंख्य बारकावे आम्हाला ज्ञात झाले. रेडिओत दोन बँड असतात नी ते बदलायचे बटण असते. ते डावी उजवीकडे फिरवून किंवा खटका पाडून एम. डब्ल्यू. नी एस. डब्ल्यू. असे बँड बदलले की मराठी नी हिंदी रेडिओ स्टेशने लागतात. रेडिओच्या दर्शनी भागावर माथ्याकडे काचेच्या पट्टीमागे फूटपट्टीवर असतात तशा रेघांच्या खुणा नी आकडे असत त्याला मीटर म्हणत. त्यावर एक फिरता तांबडा काटा असे. तबकडीच्या कडेला असलेले गोल बटण फिरवले की तो काटा इकडे तिकडे सरकायचा. तो पट्टीवरच्या विशिष्ट आकड्यावर स्थिर केला की मग ते ते रेडिओ स्टेशन ऐकू यायचे. या शिवाय रेडिओचा आवाज लहान मोठा करायचे व्हॉल्यूम कंट्रोलचे बटण असे. आकाशवाणी मुंबई, पुणे, सांगली ही मराठी नी रेडिओ सिलोन, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ ही हिंदी स्टेशने असत. काही कानडी, मद्रासी, इंग्रजी बी.बी.सी. अशीही स्टेशने असत. इंग्रजी येणारे लोक बी.बी.सी. वरच्या बातम्या ऐकत. रेडिओ केंद्रांना आकाशवाणी किंवा नभोवाणी केंद्र असेही म्हटले जायचे. मराठीत मंगल प्रभात, कामगार सभा, आपली आवड, मराठी संस्कृत बातम्या, नाट्यगीत. पुन्हा प्रपंच, गृहिणी, कीर्तन, सिनेमे, नाटकांची नभोवाणी रूपांतरं, कधी दिल्ली वरून प्रसारित होणारे राष्ट्रीय कार्यक्रम, परिसंवाद लागायचे. श्रोत्यांनी कळविलेली सिने नाट्य गीतं, भावगीतं, अभंग श्रोत्यांच्या नावासह निवेदन करून 'आपली आवड' मध्ये ऐकविली जात. हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम असे. यात गीत रामायणातली लंबी चौडी गाणी असली की आमचे दादा नी काका ज्याम वैतागायचे. ते म्हणत, "हा सुध्या फडका म्हंजे पासल्या आवाजात गाणार, अगदी लोळगा गायक, प्रत्येक ओळ दोन-दोन तीन-तीनदा आळवून आळवून म्हणणार, दर कडव्यानंतर आकण कडवं (ध्रुवपद) म्हणणार नी ते पुन्हा पेटीवर वाजवणार म्हणजे सात आठ मिनिटांची राखण. दर गाण्याची आवड कळविणाऱ्यांची नावं नी गावं निवेदक सांगे त्यातही कालापव्यय व्हायचा. त्यावेळी प्रायः तीन साडेतीन मिनिटं एवढ्या मर्यादेत बहुतांश गाणी असायची. त्यामुळे सुधीर फडक्याचं एखादं लंबचौडं गीत आलं की दोन तीन गाण्यांचा वेळ मोडायचा नी अर्ध्या तासात जेमतेम चार गाणी ऐकायला मिळायची. म्हणून त्यांचा तिळापापड होणं स्वाभाविक होतं. 

              'पुन्हा प्रपंच' ही बाळ कुरतडकर, नीलम प्रभू आणि प्रभाकर जोशी ही तीनच पात्रं असलेली कौटुंबिक संवादाच्या धर्तीवर हलक्या फुलक्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांवर आधारित श्रुतिका त्याकाळी प्रचंड लोकप्रिय होती. हे तीनही कलाकार आपल्या कुटुंबात असलेल्या इरसाल माणसांच्या ढंगात असं काही सादरीकरण करीत की कुटुंबातले सगळे घटक कामधंदे बाजूला सोडून ही श्रुतिका चवीने ऐकत असत. या तिघांचेही आवाज आणि संवादफेक करण्याची ढब म्हणजे श्रुतिका हा प्रकार कसा सादर करावा याचा जणू वस्तुपाठच होता. मुळात श्रुतिका किंवा नभोनाट्य हा नवा साहित्य प्रकार आणि संवादातून अभिनयाचा आविष्कार करणारा नवीनच सादरीकरणाचा प्रकार त्यावेळी रूढ होत होता. नाट्याभिनयात मुद्राविष्कार, हावभाव, हालचाल आणि नेपथ्य याद्वारे प्रसंग उठावदार आणि प्रत्ययकारी करता येतो. नभोनाट्यात केवळ आवाजातले चढ-उतार, विराम आणि उच्चारण स्पष्टता, शुद्धता नी तीव्रता याद्वारे प्रसंगाचा प्रभाव निर्माण करावयाचा असतो. या प्रकारात संहिता लेखन आणि सादरीकरण दोन्ही पातळ्यांवर यत्किंचितही न्यून असेल तरी ती श्रुतिका प्रभावहीन होण्याचा धोका असतो. 'पुन्हा प्रपंच'ची ही दोन्ही बलस्थाने अत्यंत तंत्रशुद्ध असायची. सादरीकरणासाठी निवडलेल्या प्रसंगांचे लेखनही नर्म विनोदी ढंगाने केलेले असायचे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या श्रुतिकेत प्रासंगिक दिन विशेषानुरूप म्हणजे गणेश चतुर्थी, नवरात्र, स्वातंत्र्य दिन या दिवशी काही ना काही समयोचित अन् प्रबोधनात्मक भाष्य केलेले असे. त्यामुळे 'पुन्हा प्रपंच' हा केवळ फुटकळ मनोरंजन करणारा सवंग कार्यक्रम नव्हता तर तो एक दर्जेदार आणि संस्कारक्षम सर्वस्पर्शी कार्यक्रम ठरला होता. म्हणून निरक्षर जानपद - अल्पशिक्षिता पासून तो अगदी उच्चविद्याविभूषित सुसंस्कृत विद्वानांपर्यंत सर्व स्तरीय लोकांमध्ये प्रिय झालेला होता. पुढे कालानुक्रमे यातले कलाकार निवृत्त झाले. नवीन कलाकारांचा भरणा झाला, श्रुतिकेचे लेखक बदलले नी 'आंबट गोड' नावाने तो सादर होऊ लागला. पण विषय, लेखनाचा बाज नी सादरीकरण या पूर्वप्रस्थापित तीन मापन दंडांसमोर तो थिटा पडला नी 'पुन्हा प्रपंच'ची लोकप्रियता मिळवणं दूरच उलट बहुसंख्य लोकांनी म्हणजे नभोवाणी श्रोत्यांनी तो ऐकणंच बंद केलं. अर्थात श्रोत्यांच्या संख्येत होणारी घट संयोजकांच्या चटकन लक्षात येत नाही. म्हणून पुढची काही वर्षं 'आंबट गोड' सुरू राहिला इतकंच. 

            आमच्या वाडीत सार्वजनिक विहिरीवर प्रतिवर्षी सत्यनारायणाची महापूजा मोठ्या धूमधडक्याने आयोजित व्हायची, या निमित्ताने वाडीतली मुंबईत स्थायिक झालेली झाडून सगळी मंडळी पूजेला यायची. त्यावर्षी आलेल्या मंडळींपैकी दोन तीन इसमांनी रेडिओचा नवा अवतार सोबत आणलेला होता. पूर्वीचे रेडिओ म्हणजे मोठी अवजड धुडं असायची. पण मुंबईकरांनी आणलेला रेडिओचा नवा अवतार हा आकाराने लहान, सोबत वागवायला सुटसुटीत आणि त्याचे प्रक्षेपण आणि साऊंड क्वालिटी ही रेडिओ पेक्षा अधिक दर्जेदार होती. या नव्या अवताराला 'ट्रान्झिस्टर' म्हटलं जाई. याला तुकड्या तुकड्याची ओढून लांब करायची स्टेनलेस स्टीलची एरियल आणि गळ्यात अडकवायच्या पट्ट्यासह चकचकीत चामड्याचं कव्हर असायचं. आजच्या तुलनेत त्या काळी या वस्तूंचं मूल्य सर्वसामान्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. दर दीड दोन महिन्यांनी बदलावे लागणारे सेल सुद्धा आजच्या तुलनेत महागच होते. हे वागवणारे सगळेच चाकरमानी पैसेवाले होते अशातलाही भाग नव्हता. गावात जरा आपली वट दाखविण्यासाठी काही जणांनी उसनं अवसान आणलेलं असायचं. पूजेचा कार्यक्रम उरकला. श्रीमंतीचा उसना रुबाब दाखवण्याच्या नादात काहीजण अनाठाई खर्च करून बसले आणि बायकामुलांसह परतीच्या प्रवासाच्या उताराचे म्हणजे तिकीट खर्चाचेही वांधे आले. 

               गावातली मंडळी मुळातच कफल्लक आणि हातावर पोट असलेली. त्यांच्या कडून तांबडा पैसाही मिळायची भ्रान्त! मग एकेकाला प्रवास खर्चाची जुळणी करण्यासाठी कुठे बायकोची नथ बुगडी, हातातली अंगठी, पायातले चांदीचे फेरवे, हातातली घड्याळं (त्यावेळी मनगटी घड्याळ मूल्यवान समजलं जायचं) विक्रीला काढणं भाग पडलं. तर काहीनी गाववाल्यांसाठी आणलेली कापडं-साड्या, शर्ट पॅन्ट सुद्धा विकायला काढले. हे दर वेळचंच होतं. मुंबईचे चाकरमानी आले की गावातले लोक त्यांची चढवणी करून दारू मटण पार्ट्या काढीत. चार पैसे बाळगून असणारा चाकरमानी मागचा पुढचा विचार ना करता हात सैल सोडून सगळी पुंजी सोपवून बसे नी जायचा दिवस जवळ आला की खिसा रिकामा झाल्याचं लक्षात आल्यावर यांच्या पायाखालची वाळू सरकायची. यात ट्रान्झिस्टर वाल्यांपैकी दोघेजण होते. त्यातला एक जण संध्याकाळी आमच्या दादांकडे आला. दादा मराठी शाळा मास्तर, त्यावेळी मास्तरांना अगदी तुटपुंजं वेतन मिळायचं. आलेल्या माणसाने कारण सांगितल्यावर दादा हसून म्हणाले, "बाबू तू चुकीच्या माणसाकडे इलंस........ तू ह्यो रेडवो माका पाच रुपयाक देवक तयार झालंस ना तरी दुकू मी तो घेवक शकणार नाय. ह्यो घेवचो तर दर म्हयन्हाक नये सेल घालूक व्हये तेका पैसे खैसून आनू? माका ही वस्तू फुकट दिलस तरी नुको.... जा तू......" 

             दादांचं म्हणणं सत्य होतं. आमचं कुटुंब गरजा मारून करटीतलं लोणचं पुरवून पुरवून खाऊन आला दिवस अब्रूदारपणे साजरा करणारं... या चैनीच्या वस्तूसाठी कुठून खर्च करणार? आमचा एक चुलत चुलता त्यावेळी गहाणवटीचा नी व्याज बट्ट्याचा धंदा करी. पण तो महाकंजूष आणि त्याच्या भाषेतही "ट्रान्झिस्टर आईकला म्हणजे जेवण करायला नको असे थोडेच होते? आणि नाय आईकला तर मरायला थोडेच होणारे? हा म्हणजे पांढरा हत्ती..... घरातली पोरेबाळे काम धंदा सोडून गाणी नी बजावणी आयकत र्‍हाणार नी दर म्हयन्याला ह्याच्यात मसाला घालायचा आणि खर्च नव्याने वाढणार....... तुझी नड आहे नी हेरी वस्तू तशी मोलाची आहे मी शिकस्त तीस रुपये देईन, बघ जमत असले तर." त्यांचा आकडा ऐकून विकणारा झीट येऊन पडायच्या पाळीला आला. त्याकाळी नाही म्हटलं तरी रेडिओला सव्वाशे ते दीडशे रुपये लागत. तशात विकणाऱ्याची गरज साठ ते सत्तर रुपयाची होती. तिरमिरी सरशी बाबू उठला नी "तुमी धा रुपयाची वस्तू दोन पैशाक मागलास तर कसा जमात?“ असं म्हणून चालत राहिला. चुलत्याला त्याचं काय सोयर सुतकही नव्हतं. बाबू गेल्यावर मोठी बहीण बाबी म्हणाली, "भाऊ, गेला बाजार दीडेकशे रुपयाची ती वस्तू आहे. तू शंभरापावत तरी मागायची होतीस. गावात कोणीही त्याला सहज शंभर रुपये काढून देईल. आम्हाला मात्र नवीन रेडिओ घ्यायचा तर दीडशे रुपये नी रत्नागिरी नायतर कोल्हापूरा पावत जाऊन यायचा तिकीट खर्च चुकला नाय. आयती सोन्या सारखी संधी चालून आलेली तू घालवलीस आपल्या हातात....." मग काकूनेही तोंडाचा पट्टा सोडला, "ह्यांना काय दिखी हौस मौज नाय, नुस्ती कामें नी कामें, आम्ही कामे सोडून आयकत बसू ना रेडिओ, नी ह्यांची कामे होणार नाय म्हणून ह्यांना घ्यायचाच नव्हता रेडिओ...... नुस्त्या पैशाच्या थड्या घालून उब घेत बसा म्हणावे........" काका काही बोलले नाहीत. घरच्यांच्या मनात रेडिओ घ्यायची प्रबळ इच्छा आहे हे त्यांनी ओळखले. गावात खेपेन शंभर रुपये काढून देणारा हरीचा लाल नाही हे ते ओळखून होते. 

            आता सोन्या चांदीची वस्तू असती तर गोष्ट वेगळी पण ही चैनीची खर्चिक वस्तू एवढे पैसे खर्चून कोण घेणार नाय नी विकणारा झक मारीत पुन्हा विचारायला येईल असा त्यांचा होरा होता. त्यांनी केलेला अंदाज खरा ठरला दुसरे दिवशी सकाळी बाबू दारात आला. “डिगू मराटो ऐंशी रुपाये देवक तयार हुतो..... पण मी सव्वाशेच्या खाली देणार नाय. हय नाय तर वाड्या देवगडापावत जावून गिराईक सोदीन. तुमी वाडीतले हास म्हणून इचारताय...... मी दोनशाक घितलो... आज पंधरा दिवस होती... आजून सेल निम्मे दुकू सोपलेले नाय हत........" आता काकांनी साठाचा आकडा फोडला. बाबू गावभर फिरून आलेला होता तिघा चौघांपैकी एकही जण पन्नासच्या पुढे जायला तयार नव्हता. बाबूने घोषाचे मळण घातले. ट्रान्झिस्टर सुरू करून गाणी लावली. आवाज दणदणावून वाढवून दाखवला. आता घरातली माणसे ओसरीवर आली. बाबी थोडी माहितगार. तिने दोन तीन स्टेशने लावून बघितली नी म्हणाली, “भाऊ वस्तू बरी आहे. बघा दहा रुपये चढवून......वैनीला पण आवडला आहे..... " शेवटी ओढाताणी करून नव्वद रुपयाला सौदा तुटला.

    आता दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम ऐकायची आमची सोय झाली. काकांच्या घरी न जाताही घरात बसून आम्हाला सगळे कार्यक्रम अगदी नीट ऐकायला येत. आमची चुलत आज्जी रेडिओवर फक्त कीर्तन किंवा तत्सम देवाधर्माचा काही कार्यक्रम असला तर तेवढाच आवर्जून ऐकत असे. बाकी गाणी बाजवणीविनोदी श्रुतिका वगैरे ऐकणं म्हणजे तिच्या भाषेत ‘छचोर छंद‘ असत. कीर्तन लावून ऐकायचं असलं की आमची चुलत आज्जी आम्हाला तिच्या भाषेत “ढोपरा पासून कोपरापावत हातपाय लख्ख धुवून यायची” तंबी देत असे. त्यावेळी शाळेतून घरी आल्यावर अंगणाच्या कडेला असलेल्या दोणी समोर थांबून हातपाय खसखसून धुवून पाण्याच्या चुळा भरून मग ओटीवर पाय टाकावा लागे. त्या नंतर ओसरीवर च्या दांडीवर टाकलेली धाबळी पालटून शाळेचे घडसे कपडेनी दप्तराची पिशवी काढून तिथे टाकून शाळेत जाताना खुंटाळ्यावर अडकवलेले कपडे घातल्यानंतरच घरात प्रवेश करायची पद्धती काही ब्राह्मण कुटुंबांमध्ये पाळली जायची.

                  आमचे दादा शिक्षक असल्यामुळे आमच्या घरात मात्र शाळेचे घडसे कपडे बदलायची रूढ नव्हती. मात्र महिन्यातून एकदा हजामत करून आल्यावर मात्र न्हावी घडिाने घरभर न वावरता आल्या आल्या न्हाणीत जावून उभं राहावं लागे. मग कोणीतरी ताई किंवा आक्का बादलीत पाणी उपसून घेवून आमचं अंग भिजेतो चार तांबे ओतायची. मग आम्हाला हंड्याला शिवायची मुभा असे. कीर्तन सुरू होण्याआधी आज्जी पाटावर धाबळीची घडी किंवा कांबळ्याचा चौघडी - रट्टा (फाटका -अर्धवट धड असलेला तुकडा ) घालून त्यावर रेडिओ ठेवायला लावी असे. आम्ही हटकलं तर म्हणायचीतो कीर्तनकार बुवांचा मान आहे. बुवानी पुंडलिका वरदा म्हटलं की सर्व ऐकणारांना एकासुरात हारी विठ्ठल म्हणायला लावी. बुवानी नाम जप सांगितला की तोही टाळ्यांच्या गजरात करावा लागायचा. पूर्व रंग झाला म्हणजे संपला नी बुवानी मूळपद सुरु केलेनी कीरेडिओच्या दिशेने कीर्तनकार बुवापेटीवाला नी तबलाजी वर्गासाठी चिमटीने अबीर/बुक्का फेकून एक बोट आपल्या कपाळाला लावी नी मग ऐकायला बसलेल्या सर्वांना अबीर / बुक्का लावला जाई. कीर्तन संपल्यावर हेची दान देगा देवा सुरू झाला की उठून उभं राहण्यावरही तिचा कटाक्ष असायचा.  

                    जोशीण काकूच्या सिंधूचे लग्न ठरले. ती बाबी आत्तेची मैत्रिण म्हणूनतिला केळवणासाठी बोलावलेलेनी. काळ्यानी घेतलेला रेडवो बघाय म्हणून जोशीण काकूही अगत्याने आली होती. सरत्या पावसाचे दिवस होते. त्या दिवशी नुकताच पाऊस पडून गेलेला होता नी आकाशात निळ्या तांबड्या ढगांची गर्दी झालेली होती. सिंधू खळ्यात आली नी तिने सहज वर बघितले. ती हरखून म्हणाली, “आकाश निळे तांबडे दिसते....... ये गो बाबी गंमत बघाय......” वर बघीत चालताना सिंधूचा शेवाळावरून पाय घसरून धबकन् मोधळा आडवा पडला. त्यावेळी रेडिओवर कामगार सभा लागलेली होती. अचंब्याने तोंडावर हात धरीत ट्रान्झिस्टरच्या भोवारी फिरून निरखीत जोशीण   काकू म्हणाली“अद्भूत नगरी होअद्भूत नगरी ......! काय बायो तरी म्हणायचे..... अगदी जिथे जाणते माणूस समोर बसून बोलतेहेसे वाटते.  “ हा मुंबईत सुरू असलेला कार्यक्रम इथे ऐकायला येतो आहे असे बाबीने सांगितल्यावर तर जोशीण काकूला आश्चर्याचा धक्काच बसला. “ ही बायो पिशागतीच्या वरताणच म्हणायस् हवी........ कुठे मुंबई....... कुठे पडेलमाझे डोके भिरमिटल्यासारखे झाले हे ऐकून.....”  

                  जेवताना सिंधूच्या लग्नाचा विषय निघाला. तिला सडयात सावकाराच्या घरून मागणी आलेले म्हणून जोशणीची मान काट्यावर सावरत नव्हती. लग्न कसे ठरले त्याचे रसभरीत वर्णन जोशीण करायला लागली. “आमचे शिंदू सगळ्यात गोरे नी दिखाव......... खरे तर त्यास्नी अगोदर दिक्षितांची   कुंदा दाखवलेली होती मध्यस्थानी ....... पण जावयानी शिंदूला बघितलेली नी त्यांच्या अगदी मनातच भरली शिंदू ...... बसल्या बैठकीत होकार दिलेली आणि चार दिवसांनी आम्हासनी बैठकीला सडयात यायचे आमंत्रण दिलेली. ठरावात पण काय ओढाताणी नाय हो केलेली. त्यांचे आजे हयात आहेतम्हणून लग्न त्यांच्या नदरे समोर सडयातच करणार. आम्ही शंभर माणसाचे व्हराड घेवून जाणार नी उक्ते अडीज हजार खर्चाचे म्हणून देणार नी आयत्या पानावर जावून बसणार. जावई म्हणाल तर लाखात एक देखणे...... हायस्कूलात सर आहेत....... लेंगेवाले आहेत होघरात दिकी पंचा नेसत नाय. पट्ट्या पट्ट्याची पाटलोण घालतात. नायतरी शिंदूस आमच्या  धोतरवाले नकोच होते हो ........” त्याकाळी बहुसंख्य पुरुष बाहेर धोतर नी घरात पंचा नेसत. लेंगा सदरा हा त्यावेळी चैनीचा पोषाक समजला जायचा.  

                 लग्न झाल्यावर दोन महिन्यांनी जोशीण सडयात सिंधूकडे जावून आल्यावर आमच्या घरी लेकीचे वैभव सांगाय येवून गेली. “ सडयात शिंदूच्या शेजारीच पाध्यांकडे तिच्या सासवेची सख्खी बहिण दिलेली. बहिणी बहिणींचे चांगले मेतकूट. त्यांच्याकडे रेडिओवर ‘गृहिणी’ कार्यक्रम ऐकायला बारा वाजता जेवण आटपून मी शिंदू ना तिची सासू-विरिहणी शेजारी पाध्यांकडे जायचो. आम्ही येईपर्यंत शिंदूचा दीर नी सासरा दोघे बापलेक आजोबांचे ताट वाढून देत. शिंदूचा नवरा सर आहेना ते शाळेत गेलेले असत. बापलेक आपली जेवणां वाढून घेऊन जेवून शेण बोळा फिरवून (त्या काळी जेवण झाल्यावर शेणाचा गोळा फिरवून खरकटं  टिपून घ्यायची पद्धत होती) आपापली ताटां दिकी घासून पुसून उपडी घालून ठेवून आम्ही यायची वाट बघीत झोपाळेवर बसून असायचे. आम्ही रेडिओ ऐकाय कां जातोम्हणून एका शब्दान कधी विचारलेनी नाय हो बापलेकानी....... त्यांच्या जागी आमचे पुरुष असते तर जेवण वाढणार कोण म्हणू सगळें घर डोकीवर घितलेनी  असते हो......... नी कोण थयथयाट केलेनी असता.......... पाध्यांची माणसां पण गोड हो........ गृहिणी लागायची वेळ झाली की त्यांच्या बनीस निरोप देवून पाठवीत आम्हास आठवण कराय……… कीआवरा लवकरगृहिणी लागाय झाली............  

                 सकाळी सहा वाजता रेडिओ स्टेशन सुरू होण्यापूर्वी एक विशिष्ट धून लागायची. आम्ही अंथरुणात मुरगुशी मारून झोपलेलो असताना अर्धवट जागृतावस्थेत ती धून कानात पडायची. मला ती भलतीच आवडायची. म्हणून कधी लहर लागली की मी आईला सकाळी लवकर उठवायला सांगे......... “तूं तुरुरु तूं तुरुरु तुरुरुरु “ अशी ती धून मिनिटभर वाजायला लागे नी मिनिटभरात वंदे मातरम सुरू होई. मग पिक पिक अशा आवाज येवून मुंबई आकाशवाणी दिल्ली केंद्राशी जोडला जावून हिंदी समाचार सुरू होत. मग भक्ती गीतांचा कार्यक्रम लागे. कार्यक्रमात शेवटी बरेच वेळा रात्रकाळी घागर काळी हे गीत लागे नी बहुधा कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे ‘विष्णुदास नाम्याची भामिनी काळी ’ या ओळीवर गीत थांबवले जायचे. भक्तीगीतं संपली की “इयं आकाशवाणी, संप्रती वार्ता: श्रूयन्ताम” या निवेदनाने संस्कृत बातम्या लागत. त्या ओ की ठो काही कळत नसत पण ऐकून ऐकून सुरुवातीचां निवेदन मात्र पाठ झालं. मग सदाशिव दीक्षित आपल्याला बातम्या देत आहेत म्हणत दमदार आवाजात स्पष्ट उच्चारणासह ते बातम्या सादर करीत असत. आम्ही सोप्यातल्या कोनाड्यात एक रफ वही नी पेन्सिल कायमची ठेवून दिलेली असे. एखादं नवीन गाणं लागलं की झटकन् वही सरसावून घेवून ते गाणं टिपून घेत असू. शाळेत सी. ए.च्या  तासाला नाहीतर शंकरेश्वराच्या देवळात पालखीच्या भोवत्या सुरु झाल्या की ते नवीन, कोणी फारसं न ऐकलेले गाणं म्हणून भाव खात येत असे. बहुसंख्य मुलं  रेडिओ वरची गाणी ऐकून पाठ करून म्हणायचा सराव करीत.  

                      नादातला मधू काकिर्डे   रेडिओवरची गाणी ऐकून अगदी तशीच्या  तशी आलापासह म्हणून दाखवायचा. अर्थातच ऐकिव ज्ञानावर गाणी म्हणून दाखवताना तालाची पडझड व्हायची. ताल चुकला की तबलाजी वाजवायचं थांबून मग योग्य सुरावरून पुन्हा ताल पकडी. मधू तसा भोळसट होता. आपली चूक त्याच्या लक्षात येत नसे. तो होता पण हौशी . कोणीही कुठेही गाणं म्हण अशी फर्माईश केली की बसल्या जागी झोपाळ्यावर नाहीतर बाकड्याच्या फळीवर बोटानी टक टक वाजवून त्या तालावर गावून दाखवायचा. त्याचा आवाज चांगला होता नी न फाटता चढायचा. स्मरण पक्के होते. मोठमोठ्या गायकांची असंख्य गाणी अगदी ताना पलट्यांसकट माना डोलावून डोलावून न लाजता म्हणायचा बापडा. उत्सवाला मानकरी बोडस त्याला आवर्जून बोलावून घेत. पाच दिवस पालखीच्या भोवत्या सुरु असताना गाणी म्हणणारे गायक कमी पडले तर ती उणीव मधू भरून काढी.  

                     पाच दिवस रात्री गायचे असे म्हणून तो कमी जेवी. कोणी हटकलेच तर तो भाबडेपणे म्हणायचा. “ होय आज तीनच भात घितले........ रात्री गाणे म्हणताना पोट जड झाले तर आवाज चढायचा नाय.....” बोलण्याचा सरळ अर्थ असा होता की त्याचा आहार दमदार होता. त्याला दीड शेराचा ओयरा लागतो असे त्याची आई सुद्धा सांगायची. तो जेवायला बसला की ताटात मावेल एवढा भाग घेई. अशी चार वाढपे झाली की त्याचे पोट भरे नी तो उठे . पण उत्सवात गाणी म्हणायची तर हलक्या पोटान राहायचे म्हणून तो चौथ्यांदाचा भाग घेत नसे. एखादे वेळी माणसे कमी जमलेली असली तर  पालखीच्या तीन भोवत्याना दर भोवतीला पाच ठिकाणी पालखी थांबली की गाणी म्हणायची असत. एकट्या मधूवर भार पडे नी त्याचे घामटे निघे. मग शेवटी शेवटी तान पलटे न घेता तो थोडक्यात गाणे म्हणून मोकळा होई. त्यावेळी कीर्तनकार बुवा भोवत्या संपल्यावर हसून म्हणायचे, “ मधूशेठआज तुमचे नव नवल नयनोत्सवा काय नीट वठले नाही हो......” मधू भावरथीपणे उत्तर देई. “ खरे आहे तुम्ही म्हणता तें. आज  गाणी  म्हणून म्हणून जरा  दमल्यासारखे झाले म्हणू आज हेळा (आलाप ) नाय ओढल्या. “

                   कॉलेजला जायला लागल्यावर हिंदी चित्रपट गीतांची नवल नगरी ज्ञात झाली. मग विविध भारतीऑल इंडिया रेडिओवर अवेळ रात्रीपर्यंत आम्ही हिंदी गाणी ऐकत रहात असू. रेडिओ सिलोनवर बिनाका गीत मालेत पहिल्या पायदानावर कोणतं गीत येतं हा मोठ्या कुतुहलाचा विषय असे. मी एस. वाय. ला असताना प्राण जाये पर वचन न जाये मधलं ‘चैनसे हमको कभी’ हे आशाचं गीत बिनाका सरताज झाल्याचं आठवतं. पुढे कधीतरी तो सिनेमा थिएटरमध्ये बघितला तर त्यात नेमकं हे गाणं कट झालेलं होतं . असच ‘तलत’ चं  ‘ऐ प्यार तेरा शुक्रिया शुक्रिया’ हे गाणं दोन तीन वेळा फक्त शेवटच्या चार ओळीच ऐकायला मिळाल्यामुळे मनाला हुर हुर लावून गेलेलं. शिकस्त करूनही हे पूर्ण गाणं काही खूप वर्ष मला ऐकायला मिळालं नव्हतं. पुढे कांदिवलीत बी.एड. करायला गेलो तेंव्हा माझा मित्र प्रभू याच्या सोबत प्रथमच इराण्याच्या हॉटेलात चहा प्यायला गेलो होतो. तिथे ग्रामोफोन ठेवलेला असे नी चार आणे देवून जुनी गाणी ऐकायला मिळत.  कुतुहल म्हणून यादी बघितली तर त्यात ‘तलत’चं ‘ऐ प्यार तेरा शुक्रिया’ हे गाणं सापडलं. मग काय विचारता......... त्यावेळी झालेला आनंद .... त्याचं शब्दात  वर्णन नाही करता येणार.

               रेडिओ संदर्भात काही कटू आठवणीही  आहेत. १९६०/७० च्या दशकात आकाशवाणीवर गाजत असलेल्या तीन गाण्यांवर  काही विचारवंतानी  गंभीर आक्षेप घेतले होते. त्यातलं पहिलं  गीत रम्य ही स्वर्गाहून लंका. या गीतातील एका कडव्यात  या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का’ ही ओळ आहे. रावण भले  दुष्ट घमेंडखोर असला तरी तो वेदवेत्ता होता   आणि लक्ष्मी मातेचा परम भक्त होता. तीला लंकेचे दासीपद  घ्यायची अश्लाघ्य  पृच्छा तो करू धजावला नसता. कवीचा हा अतिरेकी कल्पना विलास म्हणजे आदिमातेचा अधिक्षेप आहे . दुसरे एक गीत  ज्यात वेदानाही नाही कळला अंत पार ज्याचा  तो कानडा विठ्ठल  असे  शब्द आहेत. ज्येष्ठ समीक्षक रा.चिं. ढेरे  यानी  विठोबा या  लोक दैवताचा  उद्गम  सहाव्या शतकात झाल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. म्हणजे वेदकाला नंतर सुमारे अडीज हजार वर्षांनी   विठोबा हे दैवत जनमानसात स्थिरपद झाले. मग त्याचा उल्लेख  वेदांमध्ये कसा असेलआणि त्याचा उल्लेख वेदांमध्ये  नाही  यावर  आक्षेप  तरी कां असावाअसा अट्टाहास तरी  कशालापण  वारकरी संप्रदाय आणि विठ्ठ्ल भक्तांची  भलावण आणि खुशामत  करून लोकप्रियता  मिळवण्याच्या धुंदीत  वेदाना थिटे ’ ठरवण्याचा  प्रमाद कवीने  केला आहे. तिसरे गीत आहे गंगा मेरी माँ का नाम बापका नाम हिमाला .’ गंगायमुना, सिंधू   आदि नद्या हिमालयात उगम पावतात म्हणून हिमालय हा त्यांचा जनक  मानला जातो. पण कविने  तारतम्य सोडून पिता पुत्रीचे पवित्र नाते कलंकित केले.अर्थात बॉलिवूडवर मुस्लिम संस्कृतीचे  जबरदस्त वर्चस्व  आहे. आणि  इस्लाम पिता पुत्रीचा शरीर संबंध जायज  मानतो त्याचे ही हे फलित असू शकते . महाविद्यालीन काळात तीन गीतांवरील  हे  आक्षेप वाचल्यावर ते मला पटले  म्हणून  ही गाणी  ऐकायची नाहीत असं मी ठरवलं. पुढे  कधी रेडिओवर ही गाणी लागली तर मी धावत जावून तात्काळ रेडिओ बंद करीत असे.

                 आकाशवाणीची एक गंमतीदार आठवण अजूनही आठवली की मला हसू येतं. सिने संगीतबेला के फूलभुले बिसरे गीत अशा अनेक फर्माईशी कार्यक्रमांमध्ये सिलोनऑल इंडिया रेडिओविविध भारती, आकाशवाणी दिल्ली अशा तद्दन सगळ्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात एक निवेदन कायम ऐकू यायच “अब सुनिये भागम भाग फिल्मका ये गीतइसे गाया है महम्मद रफी और गीता दत्तने गीत के बोल है दर्शन कब दोगे बोलोना मनहर सांवरिया गीत के बोल लिखे है मजरूह सुलतान पुरीने इसके फनकार है ओ.पी. नय्यरइस गीतको सुनना चाहते है झुमरी तलैयासे मीना,अनिता,सरिता,गीता, सतीश,  मोहन. अरुण,  प्रमोद, सुनंदा, बीना, साहू और उनके बहोत सारे साथी........ निवेदन पूर्ण होईतो निवेदकेचा आवाज अक्षरशः क्षीण होत जात असे........ प्रत्येक रेडिओ केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या फर्माईशीत झुमरीतलैया मधल्या  कुणा ना कुणाची अशी लांबी चौडी नामावली हटकून असायची. माझा एक मावस भाऊ विजय म्हणायचा, “हे झुमरीतलैयातले लोक दिवसातले चोवीस तास वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्राना फर्माईशीची पत्रच पाठवीत बसलेले असणार की काय कोण जाणे धन्य आहे यांची......”  

                         त्याकाळी पानपट्टीच्या ठेल्यावर सकाळपासून तो रात्री ठेला बंद होईतो हमखास ट्रान्झिस्टर वाजत असायचा. त्यातही क्रिकेट मॅच सुरु असल्या की ठेल्यांसमोर कॉमेंट्री ऐकण्यासाठी राडीराड गर्दी जमलेली असायची. ठेल्यासमोर हटकून एक पत्र्याचा बोर्ड ठेवलेला असे नी त्यावर खेळाडू नी स्कोअर याच्या नोंदी हौशी श्रोते करीत रहात असत. भक्ती गीतांच्या कार्यक्रमात सोमवार ते शनिवार त्या त्या वारानुसार निर्धारित देवतेचं एखादं तरी गाणं हमखास लागत असे. ‘देहाची तिजोरी” आणि “आरती उतारू रे संतोषी मातेकी” या गाण्यांनी रेडिओ केंद्रांवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत रोज गीत रामायणातली गाणी आवर्जून प्रसारित केली जात. दिवाळीच्या पर्वात अगदी भल्या पहाटेला  प्रसारित होणारी कीर्तनं ही सुद्धा आकाशवाणीच्या इतिहासात उल्लेखनीय बाब म्हणून नोंदली गेली आहेत.

                       १९७८/ ७९ दरम्यान मी कुंभवडे हायस्कूलला रुजू झालो. त्यावेळी गावात जेमतेम चार पाच लोकांकडे रेडिओ होते. आमच्या शेजारच्या एका गृहस्थांकडे जुना पुराणा रेडिओ होता. ते आवर्जून “गाणीबातम्या ऐकाय  या मास्तर” म्हणून बोलवायचे. पण त्यांच्या रेडिओवर गाण्यांपेक्षा घुर्रर्र ठर्र र्र   फटर्र  ठो ठो  असे चित्र विचित्र आवाज यायचे. क्वचित कधी वातावरण निवळलेलं असेल त्यावेळी मात्र छान आणि स्पष्ट ऐकू येई. एरिअल वरून आलेली वायर ओटीवर तांब्याच्या ताम्हनात पंचपात्रीत   ठेवून त्यात पाणी ओतून तिच्या दडपणाखाली वायरचे टोक ठेवलेले होते. हे काय विचारल्यावर ते बोलले,  हे आपले मी डोके चालवून प्रयोग करून बघतोहे..... त्यास अर्थिंग मिळायस् लागते ना....” अंगणात दोन काठ्यांना बांधलेली त्याची एरिअलची जाळी तुटली होती. ती सुंभाच्या बंदानी थांगडलेली होती.ते पाहिल्यावर मी त्याना सांगितलं कीध्वनी लहरींच वहन सुंभातून  होणार नाही. त्यासाठी तुटलेली जाळी तांब्याच्या तारेने जोडली पाहिजे. मग त्यांनी राजापूरातून पाच मीटर अर्थिंगची तांब्याची तार आणवून सुताराकडून एरिअलच्या वरच्या कडेने गुंफवून घेतली. या प्रयोगाचा मात्र परिणाम झाला नी घुर्रर्र ठर्र र्र   आवाज बंद झाले. जुन्या रेडिओना एरिअल लावायचीच.  

                 कुंभवडे ग्रामपंचायतीचे तीन रेडिओ नादुरुस्त झाले त्यांचा लिलाव सरपंचांनी प्रत्येकी ७५ रुपयाना केला. त्यातला एक रेडिओ मी घेतला होता. त्या रेडिओना जाड लोखंडी पत्र्याची भक्कम आणि जड बॉडी होती. बरीच वर्षे गंजत पडल्यामुळे रंग नी कंपनीचा लोगो दिसेनासा झालेला होता. त्या रेडिओना इन बिल्ट स्पीकर ऐवजी आवाजासाठी बाहेरून मोठे कर्णे जोडावे लागत.    ते रेडिओ सहा व्होल्टच्या एव्हरेडी बॅटरीवर चालत. लोंढ्यातले विलास देसाई यांचा लाऊड स्पीकरचा व्यवसाय होता. त्याना माझ्याकडचा कर्णा हवा होता. तो घेऊन त्यांनी मला छोटा स्पीकर बॉक्स दिला. माझा रेडिओही त्यांनीच दुरुस्त करून आणून दिला.त्यावेळी दुरुस्तीला तीस रुपये लागलेमी तो रेडिओ तीन वर्षे वापरला. पुढे ते जुनाट एमडण हायस्कूलमध्ये कार्यानुभवात रेडिओ दुरुस्ती देखभाल ट्रेड मध्ये मॉडेल दाखवण्यासाठी म्हणून शाळेला मोफत देवून टाकले. तो रेडिओ बरीच वर्षे सुस्थितीत होता.  

                    कोणतंही नव्याने ध्वनीमुद्रित झालेलं भावगीतअभंग. भक्ती गीतसिने गीत नाट्य गीत घराघरात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका रेडिओ केंद्रांनी बजावलेली आहे. त्यावेळचे मराठी मधले मंगल प्रभातप्रभात वंदन आणि हिंदीतले सांझधाराबेलाके फूलएकही फिल्म के गाने प्रेक्षकांनी शब्दशः डोक्यावर घेतलेले होते. या रेडिओ केंद्राची मला भावलेली सर्वोत्तम कामगिरी म्हणजे आकाशवाणी केंद्रावरील कर्मचारी वृदांने सादर केलेली देशभक्तीपर गीते. “अजिंक्य भारत अजिंक्य जनता गर्जा गर्जा रे ध्वज विजयाचा उंच धरा रे”  हे आणि अशी असंख्य ही गीते म्हणजे एक सांगितिक आणि मूल्य संस्करणाचा अमोल ठेवा आहे. त्यावेळी रेडिओ केंद्रांनी साधनशुचितेचे निर्बंध पाळून देशाच्या संस्कृती संवर्धनात बजावलेली कामगिरी अत्यंत स्पृहणीय आहे. म्हणूनच आज यु ट्यूबफेसबुकइंस्टाग्राम या मास मीडियाच्या भाऊगर्दीतही पन्नाशी पार केलेल्या लोकांच्या भावविश्वात रेडिओ केंद्रांसाठी एक मानाचा नी हळवा कोपरा अद्यापीही जपलेला आहे.     




1 टिप्पणी:

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...