गुरुवार, ४ जून, २०२६

वकिली डाव


                                              वकिली डाव

 

         कोर्टाचा बेलिफ, ठाणे अंमलदार, पोलिस पाटील अन् दाजी बामण हे लटांबर भाऊ भिड्यांच्या घरावर जप्तीची डिक्री बजावण्यासाठी निघाले. स्वतःला मोठा हुषार आणि निःस्पृह समजणारे भाऊ,तालुक्यात घडणाऱ्या असंख्य घडामोडी त्यांच्या 'मर्मभेद 'साप्ताहिकामध्ये छापून यायच्या.एवढेच नव्हे तर घटनांमागचे पडद्याआडचे सूत्रधार,त्यांच्या कृष्ण कारवाया यांच्या बित्तबातम्या त्यांच्या संपादकीय अग्रलेखात असायच्या. जिल्ह्य बाहेर पार मुंबई, पुणे, सुरत इकडे स्थायिक झालेली दशक्रोशीतील कुटुंबे त्यांच्या साप्ताहिकाचे वर्गणीदार ! साप्ताहिक हातात पडले की आजच्या अग्रलेखात कोणाचे कुलंगडे बाहेर पडलेय या उत्सुकतेपोटी अग्रलेखाची पारायणे व्हायची. साप्ताहिक आणि इतर छपाईची कामे असायची. छापखाना व्यवसाय म्हणून चांगला चाललेला. भाऊंच्या  वडिलानी सुरू केलेला प्रेस आणि साप्ताहिक मुखपत्र.त्यानी वानप्रस्थ स्वीकारून व्यवसाय मुलाकडे सूपूर्द केला अन् धंद्याला उर्जितावस्था आली अन लौकिकही वाढला.

              समाज प्रबोधनाच्या वेडाने झपाटलेले भाऊ कुणाचीही  भीड मुर्वत न बाळगता अन्यायाला वाचा फोडायचे! अन्याय कर्त्याचा घणाघाती समाचार घ्यायचे. स्थानिक पातळीवरच्या सावकार, जमीनदार मंडळी पासून तो तालुका पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यत सगळे भाऊना वचकून असायचे.  पण त्या बरोबर अशा प्रकरणात दुखावलेले हितशत्रुही भाऊना सतावायचे.  मामलेदार कचेरीतले सालिना दोन अडीचशे रूपयांचे काम,सहा महिन्यापूर्वी भाऊनी कसल्याशाा संदर्भात मामलेदारावर ताशेरे ओढले अन्  ते काम बंद झाले.  याशिवाय काही पैसेवाली मंडळी  भाऊंवर अब्रु नुकसानीचे खटले दाखल करायची.

            भाऊंच्या साप्ताहिकातले अग्रलेख,त्यात नावनिशीवर संदर्भ असल्यामुळे काहीवेळा भाऊ हुकूमी कचाट्यात सापडायचे अन पाच रूपये दहा रूपये दंडही व्हायचा. दाजी बामण गावतला खोत, महार, भंडारी याना त्याच्या कडे वेठबिगारी करायला लागे. गावातल्या देवस्थानाचाही दाजी मोठा मानकरी. वास्ताविक दात्ये हे वेतोबाचे पुजारी, त्याना देवस्थानची इनामतही मिळालेली. पण मध्यंतरीच्या पडत्या काळात दाजी बामणाने ते ताब्यात घेतले.  भाऊ भिडे प्रेस-साप्ताहिक स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळायला लागल्यानंतरची  गोष्ट.  शिमग्यातल्या मानपानावरून दाजी बामणाने भर सभेत जमलेल्या ग्रामस्थांना फटकारले. सगळे अपमान  गिळून गप्प राहिले. पण भाऊ मात्र इरेला पेटले. सखाराम दात्यांच्या मुलाशी जवळीक करून त्याना विश्वासात घेतले. गावातल्या जुन्या जाणत्या मंडळीशी चर्चा करून यापूर्वीच्या प्रथा परंपरा यांची चर्चा केली.  अन् या खटाटोपात दात्यांच्या बळदात काही जुने कागदपत्र हाती आले.  पेशवाईच्या काळातला एक जुना दस्तऐवज हाती आला.

              सखाराम दात्यांच्या पणजोबाचे नाव त्या दस्त ऐवजात होते.  मग भाऊ कामाला लागले.  दात्यांची वंशावळ शोधून काढली अन् एका साप्ताहिकात मुळ दस्तऐवजासह सगळे प्रकरण प्रसिध्द केले.  साप्ताहिक प्रसिध्द झाले अन् दुसऱ्ाच दिवी गावात राजरोस चर्चा व्हायला लागल्या.  आठ दहा दिवसांनी मुंबई, पुण्याकडच्या ग्रामस्थांची पत्रे यायला लागली.  गुढी पाडव्या दिवशी गाव देवाच्या देवळात सभा झाली. चार जाणत्यांनी दाजीची चूक त्याच्या पदरात घातली अन् वेतोबा बामणाच्या कब्जातून सुटला, कोर्ट कचेऱ्या न करता! त्यानंतर वेतोबा अजगराच्या जबड्यातून सुटला’ हा भाऊंचा अग्रलेख फार गाजला. बोरूने मोठ्या अक्षरात त्या अग्रलेखाची नक्कल काढून गावातल्या पोरानी गाडीतळा जवळच्या पिंपळावर लटकावली.

             झालेच तर गावात नव्याने सुरू झालेल्या हायस्कूलच्या इमारत बांधकामाचे प्रकरण. दाजी बामणाने त्यावेळी केलेले गटबाजीचे राजाकारण,  भाऊनी खुमासदारपणे रंगवलेले. दाजी बामण भाऊना पाण्यात बघायचा. त्यांच्यावर एकदा मारेकरी घालण्या पर्यंत ही त्याची मजल गेली. पण भाऊंचा लोकसंग्रह अफाट.रात्री  प्रेसमध्ये काठ्या लाठ्या घेऊन मारेकरी  शिरले.  त्याना बघताच नोकरानी आरडाओरडा सुरू केला अन् प्रेस जवळच्या गावडे वाडीतले पाच पन्नास झिलगे धावले.  मारेकऱ्यानी रागरंग बघून पळ काढला.त्या घटनेपासून रोजा संध्याकाळी गावडे वाडीतली  पाच सहा मंडळी नित्यनेमाने प्रेस समोर गप्पा मारायला जमू लागली. प्रेस बंद होईपर्यत कुणी  ना कुणी डिंबी देऊन बसून रहायचा.

         गहाणवटीच्या एका व्यवहारात दाजी बामणाने हरी चोडणकराच्या घरावर जप्ती आणली . वास्तविक दोनशे रूपये मुद्दलापोटी चोडणकराने साडेतीनशे रूपये जमा केलेले. पण दिलेल्या रकमेची पावती त्याने घेतलेली नव्हती. कर्ज फिटले असेल म्हणून तो गाफिल ऱ्हायला. बामणानेही  काही विचारणा केली नाही अन्  प्रॉमिसरी नोटची मुदत संपायला महिनाभर राहिलेला असताना बामणाने कोर्टात केस गुदरली. पुरावा चोडणकराच्या विरोधात ! भाऊ भिड्यानी सल्ला दिला कोर्टा पुढे हात जोडून एवढेच सांग.  मी  घेतलेल्या रकमेची परतफेड म्हणून एक पै सुध्दा घेतली नाही असे बामणाने वेतोबाची  शप्पथ घेऊन कबूल करावे.’ वेतोबा जागृत! बामण वेतोबाची खोटी शप्पथ घ्यायला कचरेल असा भाऊंना अंदाज !

    बामणाने वेतोबाची  शप्पथ घ्यायला नकार दिला. पण चोडकराने आपल्या वतीने हा एकमेव पुरावा असल्याचे सांगितले म्हणून कोर्टाने तसा हूकूम केला.  बामणाने खोटी शपथ घेतली. केस त्याने जिंकली.  चोडणकराच्या घरावर जप्ती आली. घरातले हांडे-भांडे,धान्य-कडधान्य, अगदी माळ्याच्या फळ्या, घराच्या गल्लीत डाळलेले  शिवार, जवळ जवळ हजार -दीड हजाराचा ऐवज बामणाने हडपला.  चोडणकर देशोधडीला लागला.  घर उघडेच टाकून तो सासुरवाडीला रहायला गेला.  भाऊ अस्वस्थ झाले. पुढच्या साप्ताहिकात ‘सावकारी पाशह्या  शिर्षकाखाली त्यानी इत्यंभूत वृत्त छापले.  अगदी स्वार्थी बामणाने वेतोबाची खोटी शपथ घेतली इथपासून ते चोडणकराच्या घरातून जप्त केलेल्या सामानाची बाजारभावे होणारी किंमत तपशीलवार दिली. हा न्याय वेतोबाच्या दरबारात मिटेल. देवस्थान जागृत आहे.  केल्या कृत्याची फळे दाजी याची देही याची डोळा भोगील असे ठणकावून लिहिले.

       

             लेख प्रसिध्द झाला. पंचक्रोशीत या घटनेची चर्चा झाली. लोक हळहळले. गावातल्या काही जणानी वेतोबाला जाबसाल घातली. आठवडाभरात दाजी बामणाचादगडासारखा पोर, त्याला सर्पदंश झाला. उपचार करण्यापूर्वीच त्याने डोळे फिरवले. लोक उघड उघड बोलायला लागले. बामण चिडला अन भाऊविरूध्द त्याने भाऊंच्या  'सावकारी पाशह्या  लेखा विरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा गुदरला. समन्स आले अन् भाऊ कोर्टासमोर उभे राहिले. त्याना वकिल लागत नसे. केसची व्यवस्थित टिपणे काढून आपले प्रतिपादन ते मुददेसूदपणे करीत. त्यांच्यावर ठेवलेल्या दोषारोपांचे त्यानी तर्कशुध्द खंडन केले. आपण प्रसिध्द केले ते वृत्त सत्य आहे. प्रत्येक सत्य सिध्द करण्यासाठी कोर्टाला दिसतील, कोर्टाला ला ग्राह्य वाटतील  असे पुरावे देता येतीलच हे वास्तवात शक्य नसते. प्रस्तुत घटना तशीच आहे असे समर्थन भाऊनी केले.

            दाजी बामणाने ग्राम दैवताची खोटी  शप्पथ घेतली त्याचे प्रत्यंतर त्याला आले की नाही? असे खडसावून विचारले. आपण प्रसिध्द केलेले वृत्त  खोटे आहे हे बामणाने ग्रामदैवत वेतोबाचा बेलभंडारा उचलून सांगावे असे आव्हान दिले. आपल्या लेखात आपण कोर्टाची,कोर्टाने दिलेल्या न्यायदानाची बेअदबी होईल असे अक्षरही लिहीलेले नाही.  किंबहूना बामणाची बेअब्रू व्हावी असाही आपला उद्देश नाही. आपण फक्त वस्तुस्थिती मांडली आहे. असा बचाव भाऊनी  केला.  अर्थात हे समर्थन कोर्टापुढे कसे टिकावे ? कोर्टाची बेअदबी लेखामुळे झाली एवढ्या आरोपाचे खंडन कोर्टाने ग्राह्य मानले.  खेरीज एकदा  शपथ घेऊन बामणाने सत्य प्रतिपादन केले.  त्यास सामनेवाला चोडणकर यानेही आक्षेप घेतला नव्हता. सबब झालेल्या निर्णयासंदर्भात बामणाने पुनःश्च बेलभंडार उचलून सांगणे ही मात्र कोर्टाच्या आदेशाची बेअदबी होईल असे प्रतिपादन बामणाचा वकिल गवाणकर याने केले. परिणामी भाऊंच्या लेखामुळे बामणाची अब्रु गेली हे सिध्द झाले. कोर्टाने भाऊना सव्वापाचशे रूपये एवढा जबर दंड ठोठावला.

              छापखान्याच्या वार्षिक उलाढालीतून तीनशे -साडेतीनशे रूपये भाऊना मिळायचे असा तो काळ.  दंडाची रक्कम जबर होती.  प्रेस विकून सुध्दा भरपाई होणारी नव्हती. भाऊनी मुदतीत दंड भरला नाही. मग त्यांच्या रहात्या घरातील चीज वस्तूंची जप्ती करून रकमेची परतफेड करून घेण्याची कोर्टाची  डिक्री झाली. लोक हळहळले. या पडत्या काळात ज्याना भाऊंविषयी सहानुभूती होती अशा लोकानी दशक्रोशीतले उंबरे झिजवून काही रक्कम उभी केली ती भरली फक्त बावीस रूपये! अर्थात भाऊ मात्र विचलीत झाले नव्हते. “मी जे छापले  ते सत्य आहे. माझा जज्ज म्हणजे ग्रामदैवत वेतोबा, मला तो न्याय देईल. मी देशोधडीला लागावे अशी त्याची इच्छा असेल तर तसे होईल. मला परिणामांची भिती नाही.” भाऊ भेटणाऱ्यांना ठासून सांगत.  मदत म्हणून  जमलेले पैसेही त्यांनी स्वीकारले नाहीत.

            ही घटना आई वडिलांच्या कानी जाण्यापूर्वीच भाऊनी त्या दोघाना हवापालटासाठी मिरजेला बहिणीकडे धाडून दिले अन्  शांत मनाने ते कामात गर्क झाले. त्यांचा त्या दरम्यानचा अग्रलेखही चर्चेचा ठरला. लेखात त्यानी लिहिले होते कि, ‘सत्याचा धोंडा पाण्यात तरतो .मी तर नगण्य.पण जे लिहीले ते सत्यच होते. त्याच्यावर काही  भाष्य पक्षकाराने केलेले नाही  अथवा बेलभंडार उचलण्याचे आव्हानही स्वीकारले नाही  अर्थात विजय माझाच झाला. कोर्टाचा दंड ही नगण्य बाब! भले माझे घरदार मोकळे होईल पण हे अन्याय्य आहे हे प्रत्येकजण कबूल करील, हेच माझे संचित आहे.’ हा अग्रलेख पंचक्रोशित खूपच गाजला .

              गावातले काही जाणते दाजाी बामणाला भेटले. लोकवर्गणीतून जमवलेल्या बावीस रुपयात भर घालून नगद पन्नास रुपये  घेवून बामणाने हा विषय मिटवा  नी जप्तीचा हुकूम रद्द करावा अशी  विनंती केली. वेतोबाचा कोप त्याने एकदा अनुभवलेला आहे याचीही जाणीव करून दिली.  पण बामणाने  जुमानले नाही. ''माझा फडशा झाला तरी चालेल पण भाऊ भिड्याला नंगा फकीर करून त्याच्या घरादारावरून नांगर फिरवीन तरच मी नावाचा दाजाी बामण!'' त्याने ठणकावून सांगितले. लोक गप्प बसले. या घटनेपूर्वी वर्षभर अगोदर सुरतला भांड्याचा व्यापार करणारे हरजी गावडे, सुरतचे दुकान मुलांवर सोपवून कायम वास्तव्यासाठी गावात आलेले.  चार पैसे बाळगणारा माणूस. भाऊंच्या बऱ्याचा! दंडाची रक्कम भरण्यासाठी भाऊना बिनव्याजू पैसे द्यायची तयारी त्याने दर्शवली  पण भाऊनी नकार दिला. अगदी निर्वाणीचा उपाय म्हणून जप्तीपूर्वी दोन दिवस तो बामणाला भेटला. आपण भाऊंच्या वतीने दंडाची रक्कम देतो असेही सांगितले. पण बामणाने मान्य केले नाही. “ मी पैशासाटना दावो घातलेलो नाय. माज्या मनात त्येका रस्त्यावर हाडूचो हा.” दात ओठ खात बामण म्हणाला.

             जप्तीच्या वेळी ढोल ताशाचे वाजप बामणाने सांगितले. गावातल्या म्हारानी नकार दिला म्हणून चार कोसावरच्या गावातले वाजपी दुप्पट सुपारी देऊन त्याने ठरविले.  गावात काही खाटखूट होईल, भाऊच्या बऱ्याचे लोक विघ्न आणतील म्हणून पैसे भरून संरक्षणासाठी पोलिस बोलावले. कोर्टाचा बेलिफ, शिरस्तेदार, पोलिस पाटील, दाजी बामण आणि ठाणे अंमलदार असे लटांबर ढोल ताशाच्या गजरात भिड्यांच्या घराकडे निघाले. भिड्यांचे घर एकवशी, आड बाजुला. रस्त्यावर दुतर्फा गावातले शहाणे सुरते आणि पोरेबाळे जमलेली. मोठी माणसे मनात हळहळ करीत बसली. जप्तीचा देखावा बघायला मात्र एकही गावकरी जाणार नव्हता. या प्रसंगी धीर देण्यासाठी, दंड भरून तडजोड करायला बेलिफाने परवानगी दिलीच तर बघायचे ह्या धोरणाने रक्कम बांधून हरजी गावडे भिड्यांच्या घराकडे निघाला. पाळंदिच्या तोंडाशीच भाऊ भिडे हसत उभे असलेले दिसले. ह्या माणसाची हिंमत अचाटच म्हणायची. हरजी मनात म्हणाले. हाती पायी पडून रक्कम भरूया आणि जप्ती टाळूया असा सल्लाही त्यानी  पुन्हा एकदा  भाऊना दिला.  भाऊ म्हणाले, “मी म्हणालो होतो ना? मी न्याय म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानतो. परमेश्वराचा न्याय खरा. माझे मन मला अजुन सांगते आहे  की, जप्ती होणार नाही.” हरजींचा हात धरून दरड चढल्यावर त्यानी घराच्या दिशेने अंगुली निर्देश केला. हरजी चाट झाले.

             ढोल ताशांचा आवाज  जवळ येऊ लागला. बेड्यात कांबळे टाकून त्यावर बैठक जमवीत हरजी गावडे आणि भाऊ पाळंदीकडे पहात राहिले. वाजपाच्या गजरात सगळे लटांबर मुंगीच्या पावलानी दरड चढून वर येऊ लागले. एरवी  दरडीची चढण सोपी जावी म्हणून पायऱ्या खोदलेल्या असायच्या पण आज मंडळीची दमछाक करण्यासाठी  पायऱ्या  उचकटून टाकून आडतिड खणून चढ अधिक कठीण केलेला.मोठ्या कष्टाने दम टाकीत आलेल्या माणसांच्या स्वागतासाठी  भाऊ हात जोडून पुढे झाले.  "या मंडळी ऽऽऽ! सरकारी कामात सहाय्य करायचे म्हणून मुददाम कामाचा खाडा करून  मी  आज थांबलो आहे मी. चला सुरू करा जप्ती..... दाजीने घराकडे नजर टाकली मात्र....समोरचे दृष्य बघून त्याचे अवसानच गळले.चारी मुंड्या चीत झालेल्या बामणाने तिथे मातीतच बसकण मारली.

            भिड्यांच्या घराचे छप्पर पूर्ण उतरलेले,पडव्यांचे वासे, सऱ्या,खांड बारेसुध्दा काढून टाकलेली.फक्त मधल्या चौकातली दोन बारे काढायला अवजड म्हणून तशीच शिल्लक . घराचे सगळे दरवाजे,खिडक्या,झडपे काढून सताड उघडी.घरातले यच्चयावत सामान घरभाटाचा सर्वे नंबर संपतो त्या हद्दीबाहेर नेऊन व्यवस्थित डाळून ठेवलेले. जप्तीदार मंडळी आ ऽऽऽ करून बघितच राहिली. उघड्या दारातून भाऊंची दोन मुले एका परातीतून गूळ आणि पाणी भरलेली कळशी तांब्या घेऊन आली. घसा साफ करीत भाऊ म्हणाले, “आधी सगळ्यानी गूळपाणी घ्या. मग  शिस्तीत जप्ती करा नी  घराला सील मारा. .. . सगळे सोपस्कार अगदी यथासांग करा.  बाहेरचे वाजप कमी पडेल म्हणून मी गावातले वाजपी सुद्धा बोलावून ठेवलेत. जप्ती पूर्ण झाली की त्यांचे वाजप सुरू होईल.

           दाजी बामणाचे तोंड कांडेचोरासारखे काळे ठिक्कर पडले. त्याच्या कानाशी लागत बेलिफ म्हणाला, “दाजी ऽऽऽ हे भलतेच झाले.  आता जप्त काय करायचे? आणि सील कशाला लावायचे? पुढे काय करायचे ते आता तुम्हीच सांगा. खाली मान घालून दाजी म्हणाला, “आता आणखी काय करण्यासारखे शिल्लकच राहिले नाही.  मी जप्ती रद्द करा असा कबुली जबाब देतो. चला परत.” वाजप्याना ढोल ताशे बंद करायला सांगून सगळे लटांबर परतीच्या वाटेला लागले.  आता भाऊनी गावातल्या वाजप्याना साद घातली.“अरे वाजप्यानो,जप्तीदार मंडळीना ढोल ताशाच्या गजरात रस्त्यापर्यत पोचवून या.”  भाऊनी फर्मान सोडले. भाऊनी बोलावलेले गावातले  वाजपी चांगलेच चेकाळलेले,ते जीव खावून ढोल ताशे बडवित त्या लटांबराला पोचवायला निघाले. जप्तीचा कसा फज्जा उडाला ही बातमी गावभर पसरली आणि हरखलेले गावकरी भिड्यांच्या घराकडे निघाले.

             संध्याकाळी उघड्या पडवीत गावडे मंडळीनी जोरदार भजनाची बारी केली. अनायसे छप्पर उतरलेले आहेच, जप्तीचे खेकटे निकाली लागले आहे, तर मधल्या  चौकावर टोलेजंग माडी उठवा असा सल्ला लोकानी दिला. भाऊंच्या वकिली डोक्याची तारीफ दशक्रोशीत झाली. त्यानंतर प्रसिध्द झालेला   विधात्याचा न्यायहा भाऊंचा अग्रलेख खूप गाजला. हरजी गावड्यानी साप्ताहिकाच्या दोनशे  जादा प्रती काढायला सांगून त्या स्वखर्चाने तालुका भर जाणकारांकडे पाठविल्या. साधारण देव दिवाळीच्या दरम्याने घडलेली ही घटना. शिमग्यापर्यत जुळवाजुळवी करून भाऊनी माडी उठविली. गृहप्रवेशाच्या प्रयोजनाला हजार पान उठले. भाऊंच्या कर्तबगारीची साक्ष देत आजही त्यांची माडी दिमाखात उभी आहे आणि त्यांच्या मुला-नातवानी भाऊंचे साप्ताहिक अद्यापही सुरू ठेवलेले आहे.

 

                             ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙

 लेखक  परिचय :  Mobile  8766764641

     गेली ४० वर्षे लेखन सुरू. सुमारे १२५कथा, रुजवातीच्या गोष्टी, पाखरांची भाषा, बॅड कमांड, रानभूल ४ छापिल वई साहित्य प्रतिष्ठानवर ९ई  कथा संग्रह  व शारिरीक शिक्षण महाविद्यालय , कांदिवली ही कादंबरी प्रसिद्ध. मातृभारती वेब पोर्टलवर 85 कथा व धारावाही मालिका प्रसिद्ध असून चार लाख़ वाचक आहेत.       

1 टिप्पणी:

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...