रविवार, १४ जून, २०२६

कोकणातले सांस्कृतिक संदर्भ भाग 2 - फिरस्ते कासार

 



 

कोकणातले सांस्कृतिक संदर्भ भाग - फिरस्ते कासार               

 - लेखक श्री. वसंत विनायक  काळे,पडेलकर ( मोबाईल -9422998516)

                   थोरल्या दिवाळीची पुरळच्या वीरभद्रेश्वराची छोटी ग्रामजत्रा ही बालपणी आमची 'पंढरपूर यात्रा' असे. गिर्यातली चौंडेश्वरीची जत्रा त्याच दिवशी असते. पण ती खूप लांब. गाडीने जायचं तर येतंजातं तिकीट म्हणजे आवाक्याबाहेरचं काम आणि चालत जायचं तर सात मैलांवरचं मकाण एकूण चौदा मैलांची चाल. म्हणून तिकडे जायला घरची परवानगी नसे. 'देवदिवाळी' हा आमच्या कोंकणातल्या सुगीनंतरचा देवांचा व वार्षिक पोळ्यासारखा शेतक-यांच्या गुरावासरांचा सणाचा दिवस. दुपारपर्यंत गुरं धुणं, त्यांचे खांदे आणि खुरांपायांसह ढोपरं, कान व शेपटीकडे कडूतेल लावणं, हळदपिंजर वाहून त्यांची पूजा करणं, सकाळपासून फुलं काढून तयार केलेल्या कात्र्या जास्वंदी व कर्णटकाच्या लालपिवळ्या  फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालणं हे आमचं खूप हौशीचं काम असे.  

               उजाडल्यापासून आईची गोठ्यासह घरभर धांदल चालू असे. इतर जेवण उतरून झालं की आई चुलीवरच्या भिडावर केळीच्या चेचलेल्या दांडा-याने तेल लावून चारचूर आवाज करणारे  घावन घाली. मोठ्या पितळीत घावनांच्या चवडी पडत. आटोपलं की ती विस्तव मागे ओढून ठेवी. गूळखोब-यासह आईच्या हाती घावन्यांची पितळी व आमच्या हाती पाण्याच्या तांब्यासह सर्व पूजासाहित्य घेऊन आम्ही गोठ्यात जात असू. गुरावासरांचे पाय धुवून त्यांच्या कपाळी हळद, पिंजर लावून त्यांची पूजा झाली की आम्ही त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालीत असू. मग आई त्यांना दिव्यांनी ओवाळून वाकून नमस्कार करी. त्यांना घावन खाऊ घालण्यात आम्हा भावंडांना मजा वाटे. दुपारच्या जेवणात फार गुंतून न पडता आम्ही भराभर आटोपतं घेत असू. माझ्या डोळ्यांसमोर पुरळची फुललेली जत्रा दिसत असे. त्यात बांगड्या, फुगे, शिट्ट्या विकणा-या दरवर्षीच्या कासारमामांना दिवास्वप्नात माझी नजर शोधीत राही!

                थोरली दिवाळी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा.  बलिप्रतिपदेच्या पाडवा दिवाळीपासून पुढे बरोबर महिन्यानंतरची मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा.  पाऊस जाऊन हंगाम हडकलेला असे. आगरं, बागांतून गवत काढणीचे पण बेभरवशी आडाळ्या पावसाचे दिवस असत.. क्वचित पाऊस पडणारे! झोंबरा थंड तडया वारा असलेले, सरासरी अकरा तासांच्या दिनमानाचे दिवस आणि माध्याह्नीचा सूर्य तिरपा कलून झुकला की संध्याकाळची पटकन् थंडगार काळोखी दाटणारे! दोन प्रहरच्या लखलखीत उन्हातून आम्ही चार दोन बाळसोबती जत्रेला जाण्यासाठी घराजवळची पश्चिमी पाणंद उतरून दुडकत मळ्यातले सुके व्हाळ ओलांडीत मळ्यापलिकडच्या घाटीने सड्याला लागत असू. घाटीमाथ्यावर कललेली भगभगीत उन्हं तोंडावर येत. पण सड्याच्या सततच्या भणाण वा-याने घाम सुकून गारवा जाणवे. मस्त गोंडेरी गवतं अजून भुईसपाट झालेली नसत. त्यांचा खरपूस वास नाकात भरे. वेगाने घुसळणारी करडी गवतं पोट-यांना गुदगुल्या करीत. आम्ही उड्या मारीत रानपाखरांसारखे दामल्यांच्या दोन गडग्यांतून पडेलची सीमा ओलांडताना भीतीने शीवदेवाचं नाव घेत पुरळ हद्दीतलं कातळ पार करीत असू. पुढच्या उताराखालच्या उघड्याओल्या दुपिकी मळ्यापलिकडच्या झुडुपी कातळी कोंडांब्याच्या सड्यापल्याड क्षितिजाकडे समुद्रलाटांनी घोंघावणा-या फणशाच्या गर्द डोंगरावरचा दुतर्फा हिरवा झाडझाडोरा असलेला तांबडा रस्ता दिसे.  

       




  
कातळावरून चालताना मध्येच पायांना कोचं लागत. आंजणी, हसोळी, तोरणी, करवंदींच्या  कातळझुडुपी गवतवाटेच्या उतारवळणा पलिकडे तेल्यांच्या गोठ्यांजवळच्या पाऊसभर भरलेल्या गायरांमधून गाईगुरांच्या आमसुक्या शेणमुताचा गंध दरवळे. पाणंदीतून पुरळ कसब्यातल्या दुपिकी मळ्यातल्या व्हाळाजवळ वीरभद्रेश्वराच्या देवळाकडे जत्रेला जाणारी माणसं दिसू लागत. देवळाच्या मुख्य  प्रवेशद्वाराबाहेर बाजूनी थोडी पातळ गोणपाटं लावलेला जत्रेपुरताच ऊसाचा रगाडा असे. जत्रा लहानशीच पण प्रवेशद्वारातून आत जाताच देवळासभोवती गच्च भरलेल्या गर्दीचा लोट दिसे. शेंगदाणे, चुरमुरे, लाडू, खाजाची दुकानं, गोसावणी, खेळण्यांची दुकानं, दाणेचणेबर्फी/आलेपाकाची दुकानं, भजा- शेवेच्या तळण्यांचा तळकट वास येणारी बारदानी आडोसे केलेली हटेलं असं मोजकंच बघीत गर्दीतून पुढे होताना मध्येच कुठेतरी चार आण्यांचे चणेचुरमुरे छोट्या पिशवीत घेऊन आमचं पुढे जाणं सुरू असे. सभोवती मुलांच्या पिपाण्यांचे, तोंडातल्या शिट्यांचे कर्कश आवाज, विक्रेत्यांची ओरड, लोटालोटीच्या गर्दीत मध्येच उठणा-या हुलीने होणारी चेगराचेंगरी सांभाळताना आपोआप पुढे लोटलं जाई.

      देवळाकडेने भिंतींशी कानात मुदी घातलेले गोसावी, काही गोसावणी बांगड्या, कानातले डूल, रंगीत आंगठ्या, कडी, रंगीत मण्यांचे हार, माळा, गंडे, दोरे इ.च्या चपट्या चौकोनी काचपेट्या ठेवून बसलेले असत. गांधीटोपी व पांढरी पागोटी-फेटेवाल्या कासारमामांच्या बांगड्यांच्या वेतसांबळींच्या पोतड्या, काकणांच्या गाथणी, पोतड्यांबाहेर छोट्या बारदानी तुकड्यांवरून फुगे, पत्र्याच्या शिट्या, फेपेरी, मुलींनी केसात माळायची कचकडीची फुलं, पंढरीनाथ लाल गंधबाटल्या, पितळेच्या अंगठ्या, हातपिना, रंगीत केसपिना, देवस्की बाधू नये म्हणून बोटा/करदोट्यात कमरेशी घालायच्या अंगठीएवढ्या काचेच्या हिरव्या बांगड्या, साईबाबाचे गंडे, असा आमचा अलिबाबाचा खजिना असे. जत्रेत उगाच हूल उठली की कासारमामा बांगड्या ठेवलेल्या  सांबळीच्या पोतड्यांवर दोन हात पसरून चक्क ओणवे होऊन पाठीवर गर्दी थोपवीत. चुकून बांगड्यांची फुटाफूट झाली तर भलतंच नुकसान होऊन त्यांचा चेहरा उतरे.

             माझी नजर ओळखीच्या कासारमामांना शोधीत भिरभिरत राही. आयाबाया बांगड्या भरीत. कासारमामांचं तेच मुख्य गि-हाईक असे. बांगड्या भरून त्या मनोभावे पाया पडत. इथे भावनांचं नातं हळवं होई. प्रत्येक सासुरवाशीण लेकीबहिणीसारखी म्हणून तो 'कासारमामा!'  फारच जिव्हाळ्याचं घरगुती मायाओढीचं नातं. बायामाणसांच्या गर्दीत त्यांच्या पसंतीला जो उतरेल त्या लांबड्या घट्ट गुंडाळलेल्या कागदी दंडगोली वीडावरच्या सुंदर रंगांच्या चुड्यातली काकणजोडी हातात घेऊन गोल पकडून ती टिचवून पिचकी नसल्याची खात्री करून हळुवारपणे लेकी- बाळींच्या हाताला बांगडी न लागता हळू हळू तिची बोटं, हात चेपीत जोड बांगड्या भरणारा कासार हा काळीजप्रेम असलेला 'मामा' असे. इथलं कासारमामांचं दर्शन बालमनाला चिरविश्वासाच्या आजोळजगात  घेऊन जाई. बाळूमामा, मालूमामा, कृष्णामामा, शिवाजी ह्या बंधूंपैकी कुणीतरी, महादूमामा, राममामा व त्याचा मुलगा मनोहर(मनूमामा) असा कुणी ओळखीचा चेहरा दिसला की हायसं वाटे. ते आमच्या  घरच्या सर्वांची प्रेमाने चौकशी करून जत्रेनंतर घरी येण्याचं आश्वासन देत. पैसा-दोन पैसे, आणेलीत फुगा, शिट्टी घेईपर्यंत सूर्य मावळतीला पोचलेला असे. घराचं भान जागं होई. बरोबरचा सोबती मेळ काहीना काही घेत घेत देवळाच्या पोवळीबाहेर होऊन परतीच्या वाटेला लागून धावतपळत सडा ओलांडून तिन्हिसांजा घर गाठलं जाई. धुळीने भरलेले पाय धुवून ताज्या दुधाचा चहा घेता घेता जत्रेत ओळखीचं कोण कोण भेटलं? कोणते कासारमामा भेटले? ते काय काय  बोलले हे घरच्यांना सांगताना प्रेमाने ऊर भरून येई. दादाआईही कौतुकाने ऐकत राहत. चालून  दमलेले पाय हुळहुळत असत. भाकरी खाऊन अंथरुणावर पाठ आडवी करताच पुन्हा भरलेली रंगीबेरंगी जत्रेची भिरभिर गजबजू  लागे.

               थोरल्या दिवाळीनंतर पाठीपुढे कासारमामांच्या ठराविक फिरती परिसरातल्या व मोठ्या प्रसिद्ध जत्रांना कासारमामा हमखास हजेरी लावीत. त्या दरम्याने त्यांची फेरी गावागावातूनही होई. पुठ्ठेकागद गुंडाळलेल्या मनगटासारख्या लांबट दंडगोलांवर चढवलेले काचेचे चुडे ठेवण्यासाठी    वेताचे सुंदर विणलेले लांबट गोलाकार टिकावू करंडे असत. त्यांना 'सांबळी' म्हणत. सांबळीला बाहेरूर पांढ-या जाडसर कापडाची ऐसपैस पोत्यासारखी मोठी पिशवी असे. तिच्यातला  सांबळीचा भाग पाठीवर व खांद्यावरून पुढे येणारा तांदूळासह इतर सहिसामान वगैरे ठेवलेला भाग पुढच्या बाजूला लावलेला मालूमामा, राम कासारमामा शाळेसमोरच्या रस्त्यावरून आमच्या वाडी दिशेला चाललेला बघितला की खात्री होई की आज दुपारला कासारमामा घरी येणार. शाळा सुटताच उंडारत घरी येताना डोळ्यांसमोर त्याची पाठमोरी मूर्ती दिसत राही. तो चालला की गाव वस्तीतून कुणी आयाबाया हाका मारून बोलावून काकणं भरून घेत. हिरव्या जाडसर दणकट चुड्यांची निवड जास्ती असे. मग काही वेळा मामा आमच्या घरी उशिरा दाखल होई. तो नक्की आमच्या घरीच येणार असा एक अलिखित संकेत असे. कारण आमचं घर हे बहुतेक कासारमामांचं दुपारीरात्री उतरण्याचं ठरलेलं घर असे. कासारमामांची गावोगाव त्यांचे लागेबांधे राखलेली घरं असत. कासारमामा आल्याची वर्दी दिली की आई लगेच तांब्याच्या दुशेरीत दुपारचा भात लावी.  


         गावोगाव महिनोन्महिने पायपीट करीत फिरणा-या कासारमामांच्या ठरीव परिसरातलं पायी व एसटी प्रवासाच्या टप्प्यांसह त्यांचं नेमकं  अचूक नियोजन असे. राममामा फार वृद्ध व हसतमुख होता. त्याचं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी जाळिदार झालेला होता. राममामाचा मुलगा मनूमामा तरणा झाल्यावर एकदोनदा त्याला सोबत फिरतीला घेऊन राममामा त्याच्या फिरती परिसरातल्या सगळ्या ओळखीच्या घरी येऊन गेलेला मला आठवतो. राममामा डोईला रुमाल म्हणजे पागोटं गुंडाळी. त्याच्या गळ्यात जाड जानव्याची निविती असे. नव्या पिढीतला मनूमामा गांधी टोपी वापरी. पुढच्या काळात आमचं घर हे मनूमामाचं हक्काच्या वस्तीचं झालं. पुढे कित्येक वर्षं तो आमच्या घरी येत असे. उन्हाळ्यात पडवीतली आंब्यांची आढी धुंडाळून पिके आंबे काढून पडवीबाहेरच्या पायरीवर बसून खात असे. नंतरच्या काळात त्याचा मुलगा प्रदीप बांगड्यांसह स्टेशनरी दुकान घालून खाडीकोंकणातल्या आमच्या शेजारगावी भाडेघरी राहू लागला. अधेमधे व सणासुदीला तो घोणसरीला आपल्या घरी जातो. अजूनही तो आमच्यासह अनेक घरीं तीन पिढ्यांचे घरगुती संबंध राखून आहे.

          कासारमामा दुपारनंतर पुढची गावमजल मारून सांजच्याला कुण्या ओळखीवगीच्या घरी जेवीत. तिथे टेकताच सूप मागून त्यात पोतडीतले दोन मुठी तांदूळ टाकून भिंतीशी ठेवीत. ते मोफतचं जेवण सहसा घेत नसत. विशेष जोपासलेल्या घरी तिथल्या आग्रही आतिथ्यात मन सोडून राहत. तिथे अंगी कामाची थोडी मदतही करीत. कधी रात्रीच्या वस्तीला कासारमामा असला की त्याचं जेवण आमच्या घरीच असे. जेवणानंतर सोप्याच्या कोप-यात ताडीला टांगलेल्या कंदिलाच्या उजेडात दादा व त्याच्या भरपूर गप्पागोष्टी चालत. एकदा  दिवसभर माझी पोकळ दाढ ठणकत असता रात्री जेवल्यावर मालूमामाने मायफळ भाजून त्याची पूड करून ती मोगली एरंडाच्या डिंकात घट्ट गोळी करून माझ्या दुख-या पोकळ दाढेत चेपून भरायला दिली. काही वेळाने माझा ठणका बंद होऊन मला गडद  झोप लागली.

             आमच्या घरी काखेतून पाठीवर खूप मोठं अवजड कापडाचं ओझं घेऊन गावभर लुगडी, धोतरं, कापडं  विकणारे कोष्टी गिरिधरकाका पुरोहित, मोतिलालकाका, ओसवालकाका  कधीतरी आमच्या घरी वस्तीला असत. त्यांचा व कासार मामांचा आमच्या घरी फार आदर असे. रामा महादू हजारे,  मालूमामा, कृष्णामामा, शिवामामा हे तिघेही 'मालुसरे' बंधू स्वतंत्रपणे येत. वृद्ध बाळूमामा येई. देवघेव अशी काही खास नसे. फक्त ऋणानुबंध असत! त्यांच्या अल्पकाळच्या बोलण्यातून गाठीभेटी उलगडत. येणारे बहुतेक कासारमामा हे सह्याद्रीलगत पायथ्याच्या फोंडाघाट- जवळपासच्या घोणसरी, कुर्लीकडचे असत. काही फिरस्ते जैन कासारही असत. बहुधा जैन कासारांची बाजारपेठांतून बांगड्यांची मोठी दुकानं असत. कधीतरी आमच्या घरातून  वाकेरीचं भातं, सप्तरंगी, कापूरभेंडी पाळं, मधाचा शिसा फोंडाघाट बाजारातल्या आपट्यांच्या प्रसिद्ध दुकानातून  कासारमामाला विकत आणायला सांगितला तर मागेपुढे पोतडीतून जपून ते हमखास आणीत. तेव्हा त्याचे पैसे दिले जात.

        कासारमामांच्या चटपटीत जेवणाची पद्धत कामचलावू असे. कासारमामा जोडीने अगदी  क्वचित फिरत. दुपारच्या वेळी कोणीही कासारमामा आमच्या घरामागच्या ठरीव तुळशीच्या खळ्यात उतरला की 'वैनी' अशी हाक मारी. तुळशीच्या खळ्यातल्या चिकूंच्या गर्दगार झाडांखाली  भिंतीकडेच्या बाकड्यावर तो पाठीवरच्या सांबळीचं ओझं ठेवी. त्यावरती हातातल्या बांगड्यांची लोंबती गाथण ठेवी. आईने गुळाची थाटी व पाण्याचा पितळी तांब्या आणून दरवाजाशी ठेवला की थाटीतला गुळाचा खडा चघळून तोंड वरती करून उघड्या तोंडात हातच्या तांब्याची धार ओतून गळ्याचा हरडा मागेपुढे करीत घटाघटा आवाज करीत पाणी पिऊन तो ताजातवाना होई. भिंतीच्या खुंटीवर डोईचं पागोटं ठेवी. धोतर अर्धं वरती गुंडाळून पांढरा हाफ शर्ट व आतली पुढच्या खिशाची बंडी खुंटीला अडकवून त्याच्या जेवणाच्या तयारीला लागे. समोर विहिरीवरच्या सुरमाडाच्या पन्हळाखालील दोणीत तिथलीच पत्र्याची बादली लावून तो रहाटाच्या फळीवर बसून दोन्ही हातांपायांनी पायरहाट ओढीत पाणी लाटी. दोणीत पन्हळाशी लावलेल्या बादलीत पाण्याची धार पडून ती वतून पाणी दोणीत साठे. पाणी लाटून बादली आणून तो पाण्याचा तांब्या घेऊन भरून ठेवी. जवळच्या केळीचं एखादं पान नखलून आणी. जरा पुढे होऊन तो तिथलेच बचक्याएवढे तीन धोंडे आणून चूल लावी. त्याच्या पोतडीतून पातेली, झाकणी, लहान चमचा काढी. पातेरा, काटक्या लावून एक काडी ओढून विस्तव पेटवी आणि पितळी किंवा अलिमेनच्या पातेलीला मातीचं लेवण घेऊन चुलीवर पाण्याची पातेली चढवी. पाण्याला कढ येईपर्यंत बोचक्यातली तांदूळ- पिशवी काढून ते छोट्या ताटलीत मुठीने काढून पिशवीचं तोंड गुंडाळून बोचक्यात ठेवी. मग ताटलीतच पाणी ओतून तांदूळ धुवीपर्यंत चुलीवरचं पाणी चिणचिणू लागे. त्यात धुतलेले तांबडे तांदूळ ओतून त्यावर ताटली ठेवी. कडाचं पाणी वतू लागे. ते आटू लागून भात खदखदू लागला की चुलीतलं रसाणं बाहेर ओढून त्यावर भाताची पातेली झाकून ठेवी. थोड्या वेळात भात तडतडू लागला की वरचं झाकण काढून तो सगळा भात केळीच्या पानावर काढून त्याच पातेलीत पाणी ओतून जाळ पुढे करून त्यात थोडी डाळ टाकून कधी मुळा, वांगं, बटाटा, शेवगा शेंगा असलं काहीबाही असलं तर त्याचे चार तुकडे डाळीतच टाकून ती चुलीवर चढवून पोतडीतून जुना टाॅवेल व चुरगळलेल्या पेपर कागदात गुंडाळलेली साबणबाराच्या एका भागाची वडी काढून दोणीतल्या पाण्याने आंघोळ उरकून घेई. धोतर चुबकून वईला लावून अंगपुसता टाॅवेल लावून परते. पोतडीतल्या मीठ, तिखट, कोकमं इ.पुड्या काढून ते चिमटीने शिजत्या डाळीत टाकून त्यात टीचभर बाटलीतलं थोडं खोबरेल ओती. खोबरेलाची बाटली, पुड्या पोतडीत ठेवी. क्वचित पोतडीतली छोटीशी पियाळी नारळवाटी काढून हातखवण्याने जरासं खोबरं खोवून आमटीत टाकी. त्या कढत्या आमटीचा वास घमघमे. कडावरची आमटी उतरून ती पानावर उपसून ठेवलेल्या भातावर ओतून पाणी मारून तो चूल मोडी. पातेली, चमचा, थाळी, राखेने घासून उपड्या पातेलीला थाळी उभी करून मग जेवायला बसे. आमच्या घरातून भाजी, लोणचं, चटणी असं काहीतरी त्याला दिलं जाई. जेवून होताच तो वईवरचं धोतर आणून नेसे आणि सांबळीवर डोकं ठेवून कुशीवर अंगाचा कोका करून वामकुक्षी करी. भराभरा पुढ्यात हाताला  मिळतील त्या चीजवस्तूंनी घाईघाईत केलेल्या  भागवाभागवी व काटकसरीच्या जेवणाला  'कासारजेवण' असा खास शब्दप्रयोग आमच्या कोंकणात रूढ होता. कासारमामा थोडीशी वामकुक्षी करून दोन चुळा मारून आमच्या घरचा पितळेच्या फुलपात्रभर चहा घेई. कधीतरी आई, बहिणी, आजूबाजूची माणसं वगैरे चुडा भरीत. बांगड्या भरता भरता तिथे येऊन टेकलेल्या काही पुरुषमंडळींशी मामाच्या शेतीवाडी, गुराढोरं व बाजारच्या गप्पागोष्टी होत. आम्ही पोरं शिट्टी, फुगा,  पिपाणी वगैरे काहीतरी घेऊ. वेळेवर आटोपतं घेऊन त्याचा पोतडीतला संसार खांद्याच्या पाठीपुढे घेऊन व हातात बांगड्यांची एक गाथण घेऊन कासारमामा त्याच्या पुढच्या मकाणाकडे चालू लागे. तो जाऊ लागला की माझ्या अंतरंगी कालवाकालव होई. ती दडवीत तो गेलेल्या त्या दिशेकडे मी बघीत राही.

          


     
कासारमामा चैत्राअखेरपर्यंत फिरत. पण अध्येमध्ये सह्यपट्ट्यातलं आपलं गावगावंदं जवळ करीत. फोंडाघाटच्या बाजारातील दुकानदार मांगल्यांकडून बांगड्या, रबरी/पत्र्याची/कचकडीची खेळणी इ. संपलेला माल आणणं अगर अन्य घरगुती कामकाजासाठी गावी जाऊन काही घरगुती व शेतीपूर्व कामं ते उन्हाळभर करीत. त्यांची सह्यपट्ट्यातल्या गावांतून थोडीफार शेतीवाडी असे. ते भात, नागली, वरी पिकवीत. गरजेची गुरंढोरं बाळगीत. भरीला सराई ते मृगापर्यंत वलाट, खालाटीत ठराविक एसटीने व बरंचसं ठरीव एका गावाहून दुज्या गावी पायी फिरून त्यांचा परंपरागत बांगड्यांचा व्यवसाय करीत. त्यांचं जीवन फार कष्टाचं असे. त्यांचे गावोगाव अतिशय प्रेमजिव्हाळ्याचे वर्षानुवर्षांचे घरगुती संबंध असत. पण कासारमामांकडून कधी कुठेही फसवाफसवी, गैरवर्तन अगर बेईमानी केल्याची एखादीही घटना ऐकिवात नाही. उलट अनेक लेकीबहिणींचे त्यांच्या माहेर गावंद्यांनी निरोप, वस्तू कासारमामाच्या हातून अगत्याने पोच केलं जाई व परतीचे सांगावेही आणले जात.      

           फिरतीतल्या गावोगावचे अनेक नातेसंबंध, ओळखीपाळखी इ.ची त्यांना घरगुती माहिती असे. परंतु कासारमामांकडून त्याची कधीही गैरवाजवी चुगलीचहाडी घडलेल्याचं कुठेही  ऐकिवात अगर लोकवदंतेत नाही. लगीन सराईतफिरतीच्या परिसरातली ओळखीपाळखीतल्या लेका व्हकलांची ते माहिती देत. लेकीबाळींना हिरवेगार लग्नचुडे व करवल्यांच्या रंगीबेरंगी चुड्यांसाठी अगोदरच कासारमामाना महिना, तारीखवार अगत्याने येण्याबद्दलचं आग्रही निमंत्रण दिलं जाई. त्याचा आदर राखून कासारमामा सोबत्यासह हळदपूर्व ठरल्या दिवशी जडशीळ पोतडी व बांगड्यांच्या गाथणी घेऊन हजर होत. लग्नघरच्या मंडपात त्यांचं घरालगतच एक मानाचं स्थान असे. रांगोळी वगैरे घालून पाटावर बसलेल्या मामांना टिळा लावून आरती ओवाळून नंतर वधूचुडा व  करवल्यांसह, शेजारी वा इतर पाहुणेमंडळीतील भगिनींना चुडा भरण्याचं पवित्र काम खूप वेळ चालत असे. सोबत छोट्या मुलींना हौशीने कचकडी बांगड्या भरल्या जात.

          'काचेची काकणं' ही हिंदूधर्मात अग्रहक्काने सौभाग्यालंकारात 'वज्रचुडेमंडित' अशा पवित्र आदरयुक्त  विशेषणांनी वंदनीय असल्यामुळे आसेतू हिमालय कासारबंधूंची वस्तीस्थानं देशभर सगळीकडे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातलं 'कासारवेली' हे गावाचं नाव कासारवस्तीवरून पडलेलं आहे. सध्या तिथे जवळच्या सडुरे गावात कासारबंधू आहेत. कासारसडा, कासार भाटले अशा स्थळनामातून कासार बंधूंचा उल्लेख खाडकोंकणात आढळतो. काही स्थानी वार्षिक गूळखोबरं, हळदपिंजर वाहून स्मृतिप्रार्थना जागवल्या जातात.सिंधुदुर्गात फोंडा घोणसरी, बोर्डवे- कणकवली, सावंतवाडीजवळ कोलगाव, माजगाव वगैरे कित्येक गावांतून कासारवस्ती आहे. बोर्डव्याची 'श्रीकालिका माता' अनेक कासार घराण्यांचं कुलदैवत आहे. कासार ह्या आडनावांसोबत साप्ते, साळवी, हजारे, बुकम, एकावडे, येंडे इ. नावं रूढ आहेत.

                शिवकाळातल्या हिंदवी स्वराज्याच्या मराठी राजवटीतले महत्वाचे गुप्त मनसुबे नियोजित माणसांना गुप्तपणे पोचवण्याची फार जोखीम, जबाबदारीची कितीतरी कामं कासारमामा व अन्य फिरस्त्या देशबांधवांनी जीवावर उदार होऊन केली असतील. गावोगावी कासारमामांचं असं हे एक अनोखं अतूट घरगुती नातं कित्येक पिढ्यानुपिढ्या जोपासलं गेलं.  कालमानानुसार जगरहाटी बदलत गेली.  यांत्रिकयुग व प्लॅस्टिक काळाने काचेच्या बांगड्यां-सोबत लहानमोठ्या सर्वच नित्य गरजेच्या वस्तूंवर आक्रमण केलं.  गावचे अनेक धंदेउद्योग कमी होऊन त्यावर अवलंबीत माणसं शहरबाजारी पांगली. आता कोष्टी, कासारमामा बदललेल्या नव्या जगात गावोगाव फिरताना आढळत नाहीत. त्यांचे उपजीविकेचे मार्ग बदलले. काहीनी शहरं जवळ करून नोक-या धरल्या. अनेक बाजापेठांतून बांगड्यांसह त्यांनी  सौंदर्यप्रसाधनं व इतर वस्तूंची दुकान थाटली. अग्रहक्काने स्त्रिया बांगड्यांची दुकानं व जत्रांतल्या अल्पकालीन दुकानांतून बांगड्यांसह सौंदर्यप्रसाधनं विकू लागल्या. बदललेल्या काळात कोंकणातल्या गावोगावी दरवर्षी उघड्या विशिष्ट ठरीव हंगामात येणारे महादेव कोळी, कुडमुडे जोशी, शाहीर, बहुरुपे, पांगुळ बैलवाले, जात्यांना टाकी लावणारे, छत्री दुरुस्तीवाले, भांडीविके, गारुडी, कल्हईवाले, निळावंती, गाढववाले, दरवेशी, डोंबारीघोरीप, माकडवाले,अस्वलवाले इ.आमचे दरवर्षीचे  गावपाहुणे बदलत्या काळात कुठे गडप झाले?... कळलं नाही. पूर्वापार समाजात सहज विणली जाणारी समाजनात्यांची एक सुबक ऐतिहासीक रंगीबेरंगी घट्ट वीण कालौघात सैल सैल होत उलगडत जाऊन हृद्य आठवणींचा उरलेला असा एखादा थरथरता धागा आपल्या हाती शिल्लक राहतो. तो आपण पुढच्यांच्या हाती देऊन पिढीजात ऋणानुबंध जपण्याचा अल्प प्रयत्न जरूर करायला हवा.  

(हा लेख श्री. वसंत विनायक काळे  यानी लिहिला आहे )

                         ️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...