सोमवार, ८ जून, २०२६

कोकणातले सांस्कृतिक संदर्भ -भाग 1 ( कासारांची जीवन शैली व त्यांची पोतडी)



कोकणातले सांस्कृतिक संदर्भ -कासारमामांची जीवनशैली आणि त्यांची सांबळ- धोकटी- लेख

 

        या लेखात कोकणात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा, शब्द प्रयोग यांचे नेमके स्वरूप वाचकाना कळावे या साठी तपशीलवार माहिती देत आहे.

 

.कासारमामांची जीवन शैली  आणि त्यांची सांबळ :

     कासारमामाची धोकटी म्हणजे सांबळ ही दीड हात रुंद आणि वीतभर उंच चिव्याच्या बेळांचे किंवा वेताच्या दोराचे  बारीक विणीचे दोन करंडे असत. करंडे दीड हात लां, दोन वीती रुंद आणि वीतभर खोल, मापाचे बनवीत.त्यांच्या कडा व टोके गोलाकार असत.करंडे टिकावू व्हावेत यासाठी वेताच्या जून काठ्या तोडून त्याचे दोर काढून ते वापरीत.वेता ऐवजी आवती  चिव्याच्या जून पिकाऊ काठ्या  तोडून त्या   दोन महिन्याने खाडीच्या खाऱ्या पाण्यात बुडवून ठेवून नंतर वापरीत. करंडे  विणायचे काम महार लोक करीत. ते करंडे ठेवण्यासाठी पांढऱ्या कापडाची  विशिष्ट प्रकारची दोन टोकाना  दोन पिशव्या  असलेलं कापडी खोळी सारखं पोतं  (कापडी खोळ चित्रात दाखविल्या प्रमाणे) बनवून त्यात ते करंडे ठेवीत. ही धोकटी डाव्या उजव्या कुठच्याही खांद्यावर ठेवली की एक करंडा पुढे नी दुसरा मागे लटकत राही. धोकटी खांद्यावर घेतली की सावचितपणे दोन्हीकडे अभंड करून सांबळ सारखी केली की मग चालताना मोकळ्या हाताने वावरता येत असे.


 सांबळीत ठेवावयाचे करंडे  आणि  पोतडीचे चित्र

           सगळे कासार कुर्ली, पियाळी, घोणसरी या फोंडाघाट जवळच्या गावातले असायचे.  त्यांची आडनावे भोकरे, हजारे, येण्डे, एकावडे, कासार, साळवी नी राटकड असल्याचे ते सांगत. या मंडळींचा व्यवसाय म्हणजे काचेची आणि कचकड्याची काकणे म्हणजे बांगड्या  विकणे हा असे. त्या जोडाला सेफ्टी पिना नी बायका केसांना लावीत त्या पत्र्याच्या पिना आकडे असत. कासार मामाच्या घोकटीत  गळ्यात घालायच्या रंगीत मण्यांच्या माळा कुंकू, पातळ गंधाच्या बाटल्या, कचकड्याची शिट्ट्या, रबरी चेंडू, रबरीफुगे लहान पोरांनी तोंडात घालायची लाकडी  रिंगणी  नी  खुळखुळा, सात-नऊ भोकांचाकचकड्याचा बाज्या म्हणजे माऊथ ऑर्गन, वीत दीड वीतीच्या बासऱ्या  नी टीचभर लांबीचेफों फों  वाजणारे कचकड्याचे कर्णे यापैकी एखाद दुसरी चीज सटी सहामाशी  (क्वचितकधीतरी) विशेषत: जत्रा-यात्रा - सप्ते, उत्सव असे वार्षिक उत्सव व्हायचे त्या सम्यालाअसायची.

             बांगड्या ठेवण्यासाठी कासार खाकी कागद नी रद्दी पेपर एकाभोवती एक घट्टमुट्ट गुंडाळून त्याचा दंडाएवढा जाड नी मुंडाहात लांब गोल गुंडाळा बनवून त्यावर बांगड्या चढवून ठेवीत. बांगड्या ज्या साईजच्या असतील त्या बेताने ह्या गुंडाळ्यांचा घेर कमीजास्त गोलाईचा ठेवीत असत. अशा कागदी गुंडाळ्यांमुळे बांगड्या सुरक्षित रहात असत. सोबतच्या चित्रावरून कल्पना येईल एका करंड्यात काकणं, पिना, कचकड्याची खेळणी वगैरे विक्रीच्या वस्तू नी दुसऱ्या करंड्यात आठवडाभर पुरेसा डाळ तांदूळ, तेल मीठ असा शिधा असे. तसेच जेवण रांधायला लागणारी चालचलाऊ भांडीकुंडी नी पंचा, धोतर, सदरा असे कपडे असायचे.

            बायका माणसांशी सतत्याने संपर्क असल्याने कासार मामांची भाषा मृदू नी गोड असायची. क्वचित हसरा चेहरा करून नजरेत मादक नी लाघवी आणून काका, मामा, वडील, आजोबा घरातल्या नी नात्यागोत्यातल्या पोरीबाळांशी बोलतात तसे जिव्हाळ्याने बोलायचे. महिलांकडे लंपट, लोचट कटाक्ष टाकणारा किंबहुन चेहरा न्याहाळत रोखून निरखून पहात बोलणारा अगदी तरणाताठा कासारही औषधाला सुद्धा सापडला नसता. 

                 या कासारमामांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे हातलासेपणा बिलकुल असायचा. काकणं वगैरे भरताना बायका बोटातल्या अंगठ्या, वळे, सोन्याच्या बंगड्या पाटल्या वगैरे काढून बाजूला ठेवतात. क्वचित काकणं भरल्यावर उठताना एखादी चीज वस्तू चुकून तिथेच राहिली तरी ती लांबवायचे कृत्य कासारमामा करीत नसत. उलट बांगड्या भरून झाल्यावर सामान आवरून धोकटीत भरताना. असला एखादा ऐवज राहिलेला दिसलाच तर कासारमामा त्या ताई माईला हाकारून, ग्ये तुजी आंगठी हयच टाकून ग्येलसं ग्ये बाय....... दुसरो येकादो आसतो नी उकलनू न्हलान आस्ती म्हंजे..... इतको विसारभोळे पना आसता नये बाईल् मान्सा कडे.....” असे सुनावित असत.

                कासारमामा काकणं विकीत गावंदी मारताना बहुसंख्य गावांमध्ये दुपारी नी रात्री मुक्काम करायची ठिकाणं ठरलेली असत. दुवक्त मुक्कामी गेल्यावर आपलं जेवण ते स्वतः रांधून खात. कासारांच्या पडशीत आठवडाभर पुरेल इतका शिधा म्हणजे तूर डाळ, चण्याचं नी कुळथाचं पीठ, मीठ, तेल, तिखट, दहाबारा कांदे असत. भात, पिठलं किंवा आमटी बनवण्यासाठी नेमस्त दोन पातेल्या, एक झाकणी नी एक खोलगट ताटली, एक डाऊल नी काविलथा, बेताची कुळणी नायतर कथली, बारीक कोयती अशी आवश्यक आयदणं असायची. मुक्कामी गेल्यावर नेहेमीच्या शिरस्त्या प्रमाणे ठरलेल्या ठिकाणी सांबळ उतरीत. प्राय: जिथे कोणे जात त्या घराच्या मागीलदारी मोकळ्या पडवीत सांबळ ठेवली मग बाहेर मोकळ्यावर तीन धोंड्यांची चूल मांडीत. हे नेहेमी वापरायचे त्यांच दगडसुद्धा विशिष्ट ठरल्या जागी ठेवलेले असत. वाटेने येताना, विस्तव पेटवायला सुकी काटकं आणलेली असत. ती पेटवून मोठ्या पातेलीला मातीचं लेवण लावून पाण्याचं आधण ठेवून कासारमामा आंघोळीला जात.

                     आंघोळ उरकून धोतर बंडी किंवा गंजीफ्रॉक पिळून सुकत घालून पंचा नेसून ते येईतो आधण तयार असे. मग तीन ते साडेतीन मुठी तांदूळ ओयरून घेऊन ते धुवून शिजायला लावीत. त्या भातात चिमूटभर मीठ घालीत असत. भात शिजेतो एखाद दुसरा बटाटा कापून घेत. एक कांदा अर्धा बारीक फोडी करून फोडणीला नी अर्धा भाताबरोबर खायला ठेवीत. तोवर भातातलं पाणी आटत आलेलं असे. चुलीतले निखारे बाहेर ओढून त्यावर भाताची पातेली ठेवून कालणाचा टोप चुलीवर चढे. त्यात दोन चमचे तेल टाकून फोडणीसाठी हळद नी मोहरी टाकून कांद्याच्या फोडी टाकून परतून घेत. फोडणी झाल्यावर त्यात डाळ नी पाणी ओतीत. अर्ध्या तासात डाळीला उकळी येई नी आमटीचा मस्त वास दरवळायला लागे. आमटी शिजत येईतो काटकं पुरी पेटून गेलेली असत. आमटीवर झाकण ठेवून कासारमामा जरा उसंत घेत असत. मग जेवायच्या ताटलीत भात उसपून घेऊन त्यावर सगळी आमटी ओतून वर केळीचा फाळका झाकून कासारमामा दोन्ही पातेल्या नी काविलथा घासून उपडा ठेवल्यावर ताटली नी पाण्याच्या तांब्या घेऊन ओसरीवर एका बाजूला बसून शांतपणे जेवण उरकीत असत .

                   असनयच्या (परिचित) घरातली घरधनीण मामाला केळीच्या फाळक्यावरून चार लोणच्याचा फोडी किंवा खारातली मिची असं तोंडी लावणं, एखादे ठिकाणी भाजीही दिली जाई. काही ठिकाणी भाकरी पोळीही दिली जायची. अशावेळी तिथली गृहिणी मामाला आगाऊ तसे सांगत असे. मग त्या वेळी मामा रोजच्या अंदाजापेक्षा दोन मुठी तांदूळ कमी ओयरीत असत. जेवून झाल की ताटली घासून झाल्यार चुलीवर पाण्याचा हबका मारून राख भरून टाकून धोंडे ठरल्याजागी ठेवून देत. मग मामा पागोट्याचा पिळा काखेत मारून पुढील दारी जाऊन घरच्या बाप्यांशी (पुरुषांशी) अर्धा घंटा गप्पा मारीत नी तिथेच हात डोक्याखाली घेऊन पागोट्याची दुघडी पांघरून घंटाभर जरा चुटका काढीत.

               पावणे तीनच्या सुमाराला कासारमामा उठत. तोंडावर पाणी मारून वाळत घातलेले धोतर घेऊन ओटीवर जात. धोतर नेसून झाल्यावर भांडी धोकटीत भरून झाल्यावर घरधणीला हाकारून, काकणां भरतंस काय ग्ये? हाकारीत. घरातली कोणी ना कोणी बाई किंवा चेडू बांगड्या भरून घ्यायला येई. ती आली की कासारमामा धोकटीचं तोंड उघडून तिच्या विडाच्या म्हणजे मापाच्या बांगड्या अचूक काढीत असत. दोन चार प्रकारच्या डिझाईनमधून आपल्या पसंतीचा वाण बाईमाणूस निवडी. मग कासारमामा तिचा हात पकडून आपल्या हाताच्या पकडीने तिचा पंजा जुळवून चेपून चेपून नरम  करून घेत असत. मग जुन्या बांगड्या उतरवून तिने निवडलेल्या बांगड्या कागदाच्या गुंडाळ्यावरून एकेक जुळी बाहेर ओढून अंगठा नी मधलं बोट याचा दाब देऊन गर्रर्रकन फिरवून पहात. यामुळे पिचकी बांगडी अचूक उमगत असे. दोन्ही हातात बांगड्या भरून झाल्या की बाई माणूस मग ती अगदी म्हातारी कोतारी बाई असली तरीही  कासार मामाला वाकून नमस्कार करीत असे आणि  कासारमामा तिला तोंडभर आशीर्वाद देत असे .


                    दहा गाव फिरून वेगवेगळ्या माणसांमध्ये वावरल्यामुळे समोर आलेल्या माणसाची अचूक पारख कासारमामा करीत असे. कासारमामा हे त्याकाळचं चालतं बोलतं वर्तमान पत्रही असे, कुठे काय झालं त्या घटना कासारमामांकडून कळत असत. काही ठिकाणची माणसं त्यांच्या मार्फत आपल्या आप्त स्वकीयाना निरोप, चिठ्ठ्या धाडीत. गाई, म्हशी, बैलपाडे वगैरे विकाऊ असतील तर ती माहिती कासारमामांकडे मिळे. लग्न सराईत सोयरगत पहाण्या आधी संबंधित मुलामुलीची त्यांच्या चालचलणुकीची बारीक चौकशी कासार मामांकडे केली जायची. यातही गंमत अशी होती की, मामानी विचारल्या क्षणी खात्रीशीर उत्तर दिलं तर पृच्छा करणारा निःशंक होत असे. उलट पक्षी एखादा मुलगा किंवा मुलगी चालचलणुकीने बरी नसेल तर, नायबा, मी वळखूक नाय तेंका, आपला तेंच्याकडे जाना नाय येणां...... उगाच ख्येका कायतरी सांगा..... तुमी हेर कोणाकडेतरी हटका” म्हणत संबंधितावर टीका टिप्पणी करणे कासारमामा मोठ्या खुबीने टाळीत असे.

                   उलट एखाद्या घरी घसण असेल तर त्यानी न विचारताही सहज बोलण्यात विषय फुटला तर अंदरकी बात, त्या कोणा मुला मुलीत काय खसखोड असेल तर ती मोकळे पणी सांगून कासारमामा त्याना सावध करीत असे. पाऊस काळ उरकल्यावर दसरा झाल्या नंतर मोकळा सीजन सुरू झाली की अगदी मृगापर्यंत कासार मामांची भटकंती सुरू असते. पण पाऊस काळातही श्रावणात, गणेश चतुर्थीच्या समयालाही नेमस्त ठिकाणी त्यांची फिरती असते. अशा वेळी मोठी बारा किंवा सोळा ताड्यांची रुंद घेरेदार छत्री घेऊन आपली धोकटी भिजू न देता कासारमामा नेमस्त गावा गावानी फिरून धंदा करतात. काही गावानी दीड दोन दिवसाचे नामजप सप्ते असत त्यावेळी कासार हटकून हजेरी लावीत. कारण यावेळी मोठा धंदा होई. पाऊसकाळात नवख्या अनोळखी ठिकाणी फिरणं ते टाळायचे. त्यांची फिरतीची ठिकाणं म्हणजे त्याना हुकुमी आसरा देणारी, हक्काची ठरलेली घरं नी कुटुंबं असत त्यांच्या आश्रयाने कासारांची फिरती योजलेली असायची.

                                                                          ---------- भाग   पूर्ण

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...