शनिवार, ३० मे, २०२६

नाणारचा टॉवर

                   

            नाणारचा टॉवर

 

      १९६० ते ७० च्या दशकात संदेश वहनाची माध्यमं बिनतारी तारायंत्र, टेलिफोन, रेडिओ एवढीच उपलब्ध होती. टेलिफोन आणि तारायंत्र फक्त सब पोस्ट ऑफिस मध्येच उपलब्ध होती. असंख्य खेडेगावांमध्ये या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र सरकारने प्रत्येक ग्राम पंचायतीला रेडिओ संच दिलेले होते. पंयायत कार्यालयाजवळ राहणारी पांढरपेशी मंडळी सकाळ सायंकाळच्षा बातम्या, कामगार सभा हे रेडीओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकत असत.  या दशकात केंद्र सरकारने सरकारी आणि लष्करी गुप्त संदेश वहना साठी देशातील महत्वाच्या भागांमध्ये सूक्ष्म तरंग केंद्रे निर्माण करण्याचा देशव्यापी कार्यक्रम राबविला. त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान नव्हते. संदेश प्रक्षेपणात अंतर ही मोठी समस्या होती. म्हणून विशिष्ठ अंतरावर टॉवर उभारून रिले सेंटर्सचे नेटवर्क उभारण्यात आले.

      विशिष्ठ रेखावृत्तीय स्थानावर, विशिष्ठ अंतरावर आणि  समुद्र सपाटीपासून विशिष्ठ उंचीवरची ठिकाणे निर्धारित करून त्या ठिकाणी रिले टॉवर उभारण्यात आले. या सर्वेमध्ये ना़णार कुंभवडे हद्दीवर भिंताडवाडीतला टेंब निवडण्यात आला. हा टेंब नाणार गावच्या महसूली क्षेत्रात येत असल्याने या स्पॉट जवळ डोंगरतिठा ते कुंभवडे रस्यावर “नानर सूक्ष्म तरंग केंद्र”अशी पाटी लावण्यात आली. या  स्पॉटपासून कुंभवडे धुमाळवाडी अर्धा तास चालीच्या अंतरावर नाणार मधली धनगर वाडी पाऊण तास चालिच्या अंतरावर होती. तिथून दहा मिनीटाच्या चालीवर “ जितवणी” बारमाही पाण्याचे ठिव होते. नाणार आणि कुंभवडे हे दोन्ही गाव टेंबापासून तास -दीड तास चालीवर इतके लांब. शासकिय संदेश वहनासाठी ही यंत्रणा उभारलेली असल्या मुळे या सूक्ष्म तरंग केंद्रांची माहिती टॉप कॉन्फिडेंशियल सदरा खाली गुप्त ठेवण्यात आलेली असून आजही गुगलवर यासंदर्भात कोणताही तपशिल उपलब्ध होणार नाही. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असे असंख्य रिले टॉवर कार्यरत असून ते पोस्टल टेली कम्युनिकेशनला  जोडलेले आहेत. या टॉवर वरून कुठेही विना विलंब  फोन लावता येतो.

             केंद्र सरकारची टीम सर्वे करून नाणार टेंबाचा स्पॉट निश्चित करून गेल्यावर पाच सहा महिन्यानी म्हणजे साधारण ऑक्टोबर १९७२ च्या दरम्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. एका दिवशी सर्वे प्रमाणे टेंबाबर निर्धारित जाग्यावर टॉवर आणि  कार्यालय, स्ट्रॉंग रूम, स्टोअर रूम यांचा एरिया निश्चित करण्यासाठी त्या विभागाचा कोणी उच्चपदस्त इंजिनिअर शेट्टी साहेब जीप घेवून आला. त्याच्या सोबत सामानाचे दोन ट्रक आणि वीसेक बेलदार लेबरही आले. कुंभवडे तिठ्याच्या जवळ सर्वे टीमने लावलेल्या‘नानरसूक्ष्म तरंग केंद्र’ पाटीजवळ जथा थांबला. टेंबाच्या  माथ्यापर्यंत जाण्यासाठी गच्च वाढलेल्या झाळी – झाडकळ छाटून काढायला हवी होती. माथ्यावरचा टॉवर उभारायचा स्पॉट  पायथ्यापासून सुमारे पन्नास – साठ फूट उंचीवर असून तीव्र चढाव  असल्यामुळे   पायथ्या पासून माथ्यापर्यंतचा भाग बेणून  कामचलावू रस्ता बनावला हवा होता. तसेच जवळपास कुठे पाण्याची उपलब्धी पहायला हवी होती.  यासाठी काही स्थानिक कामगारांची मदत पाहिजे होती. इथून कुंभवडे धुमाळ वाडीतली घरे दिसत होती. शेट्टी साहेबाचा ड्रायव्हर मिशाळ बेलदारांचा मुकादम यल्लाप्पा  ह्याला सोबत घेवून निघाला. जथ्यातले  लेबर  तात्पुरत्या निवासासाठी टेण्ट उभारायच्या कामाला लागले.

      मुख्य रस्त्यापासून धुमाळ वाडीकडे जाणारा पक्का रस्ता नसला तरी सगळा कातळी भाग असल्यामुळे  ट्रक, टेम्पो जाऊन जाऊन  चाकोरी पडलेली होती. जीप धुमाळ वाडीकडे वळलेली दिसल्यावर वाडीतली पोरे-टोरे  वाडीच्या तोंडाशी धकटुच्या  घरासमोर जमा झाली.  जीप थांबवून मिशाळ ड्रायव्हर खाली उतरला. जाणत्या मंडळीना रामराम करून तो म्हणाला,“थितं तिकटी पाशी बोरड लावल्याला हाय न्हवं, ततं टावर बांदायच काम कराया गोव्यास्न मोटं सायब आल्यात.”मागे सर्व्हे झाल्यावर तिथे पाटी ठोकल्यावर गावात चर्चा झाली होती.गव्हर्मेंट  कसलासा टॉवर बांधणार आहेही गोष्ट कुंभवडे,नाणार, तारळ, सागवे,गोठिवरेया गावानी  कर्णोपकर्णी प्रसृत झालेली होती. अशिक्षित गावंढ्या जनतेला टॉवर म्हणजे काय याची माहिती नव्हती. मुंबईला गिरण्यांच्या उंच चिमण्या असतात तसलं कायतरी होणार आहे नी तिथून मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापुर या शहरांमध्ये फोन करायची सोय होणार आहे इतपत महिती लोकाना होती. “असा व्हय..... चला धकटुच्या लोट्यावर बसॉया..... वयच् पानी-बीनी  खावा...... ” मिशाळ नी यल्लाप्पा धकटुच्या लोट्यावर जावून टेकले.  पाणी प्याल्यावर मिशाळ म्हणाला, “तितं  लय गचवन हाय त्ये साफ कराया होवं.... टावराच  काम   कराय साटणं  तथं मात्याव जाईस्तोवर रस्ता बांदायचा हाय. तुमच्या वस्तीवरलं  म्हाईतगार कामदार असत्याल धा पाच तर इचराय आल्तो.... ”

     आडगावचे असले तरी धुमाळवाडकरी मोठे धोरणी होते. त्यानी मुद्द्याची गोष्ट विचारली.“तशे मिळती म्हना... पन रोज काय भेटात..... ?”  बेलदार अडचून रोज घेतात हे सर्वश्रुत असल्यामुळे  बेरकी पांडु धुमाळ  यल्लापाला  म्हणाला, “ तुमी  किती रोज घेतास?” त्यावर यल्लाप्पा म्हणाला, “ आता आमी  नव्वद -शंभर पावत घेतु की . पर आमचं  काम बी तसंच आस्तया.....”  मान डोलावीत बेरकी हसत पांडुम्हणाला, “ तुमी म्हंस्तास ता  बरोबर.... पन तुमी दोन हातानीच  काम करतास ना? आमी बी तसाच करताव ..... आता येकाद्रो  जास्त कमी करीत  तां येगळां. आता हाताची पाचव बोटा काय सारकी नाय. आमकाव   नव्वद  रुपाये रोज भेटात  तर येव आमी....!” त्यावेळी  त्या आडवळणी गावानी कुठेच पन्नस ते साठ रुपयाच्या वर मजुरी मिळत नसे. आंबा सिझन मध्ये कोणी  कोणी अडल्यावेळी दहा रुपये जादा रोज  देई. मिशाळाने नव्वद रुपये रोज द्यायचे कबूल करून लगेच साताठ लोकाना जीप मध्ये घालून सोबत नेले. सायबा साठी  अंडी आणि एक कोंबडा  घेतला.

         धुमाळ वाडीतले कामगार टेंबा जवळ पोचले तेंव्हा  शेट्टी सायबाचा टेण्ट  उभा झालेला होता. बेलदारानी त्यांच्या जथ्यासाठी  मांडव  घालायचे काम सुरु केले होते. जीप मधून उतरल्या उतरल्या धुमाळ वाडकरी गडी  कामाला लागले. दोघानी कुंबयाचे बंद काढायला घेतले.बाबु नी सख्याहधुमाळ  जितवण्यावरून पाणी आणायला निघाले. त्यांच्या सोबत  दोन दोन कळशांच्या कावडी घेवून दहाबारा बेलदारही निघाले. जितवण्यावर  दोन तीन ठिकाणी  चिव्याची बेटे होती. सख्याने दहाबारा काठ्या तोडून घेतल्या. धुमाळ वाडकराना  मांडवाच्या कामाची हदन होती.चार जणानी संध्याकाळ होईपर्यंत लांब रुंद  मांडव पुरा केला. कामगारानी तीन धोंड्यांच्या  चुली मांडल्या. मिशाळाने किराणा दुकानाची चौकशी केली.  जवळ म्हणजे पार खाली खाडी किनारी  कुंभवड्यात मांडाजवळ सदानंदभाऊ देसायांचे एकमेव दुकान होते. बाबु धुमाळाला सोबत घेवून मिशाळ आणि कल्लाप्पा  कुंभवड्यात गेले.  बेलदाराने मोठी खरेदी केली म्हणताना  सदानंद भाऊनी त्याना रेशनवरच्या स्वस्तदराने गहू, तांदूळ, जोंधळे दिले. साखरही  रेशनच्या दरापेक्षा दीड रुपया चढ घेवून  दिली. भाऊ मिशाळाला म्हणाले, “मी इथला सरपंच आहे. तुज्या सायबाला  भेटायला घेवून ये. तुम्हाला काय लागेल ती मदत देवू.     

          सामानातून दोन  हेवी  कपॅसिटीच्या बॅटऱ्या आणलेल्या  होत्या.  त्याना  जोडून  जोडून चार बल्ब लावून लख्ख उजेडाची सोय केली होती. संध्याकाळी  कामगाराना सोडायला जावून  मिशाळाने  सायबाला चहासाठी दूध घेतले  नी  कामगाराना दुसरे दिवशी येताना आणखी  चार गडी व  पाच सहा बायल् माणसे  आणायची  वर्दी देवून मिशाळ गेला.  दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवारी कामगार टेंबाकडे रवाना झाले. ते पोचल्यावर  चहा करून झाल्यावर मिशाळाने शेट्टी साहेबाला उठवले. सायबासाठी  पडदे लावून बाथरूम, संडासची सोय केलेली होती.सायबाचा तंबू  हे  धुमाळवाडीकर कामगारांसाठी अप्रूप होते. आंघोळ  उरकून साहेब  राजापुरला रवाना झाला. कामगारानी  टेंबाच्या  पायथ्यापासून  माथावळी पर्यंत  जायची वाट बेणायला सुरवात केली.

            साहेबाने  राजापूरला  तहसिलदार, एलेक्ट्रीसिटी बोर्ड  याना वर्दी दिली. केंद्र शासनाचा महनीय प्रकल्प असल्यामुळे  सब स्टेशन पासून नियोजीत टॉवरपर्यंत  अतिउच्च दाबाच्या विद्युत् वाहिन्या टाकायच्या होत्या. शेट्टी साहेबाने वर्दी दिल्यावर युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू झाली. पुढच्या तीन दिवसात  टेंबाच्या  माथ्यावर नियोजीत  रिले सेंटरपर्यंत  पोल टाकून लाईन ओढूनही झाल्या. अर्थात अगोदर टेंबाजवळून  लाईन गेलेल्या होत्याच. टेंबासमोरच्या पोलवरून  माथ्यापर्यंत  दहा-बारा पोल टाकून  केबल ओढाव्या लागल्या. या ठिकाणी  कायम  उच्च दाबाने  वीज पुरवठा  व्हायला हवा या साठी  काही  केबल जोडण्या फिरवण्याचे  काम  करावे लागले. पुढे नाणार  कुंभवडे गावातल्या लोकांसाठी कमी व्होल्टेज, वीज पुरवठा खंडित होणे आणि लाईट जाणे   या अडचणींचे  कायमस्वरूपी  निराकरण या निमित्ताने  झाले.

        शेट्टी साहेब आणि त्याच्या सोबत आलेले टेक्निशियन्स   यानी  सर्व्हेमध्ये निश्चित केल्या जागी  टॉवरचा  स्पॉट फिक्स केला. त्या पासून शंभर दीडशे फुटावर रिले सेंटर, स्ट्रॉंग रूम, स्टोअर रूम वगैरे इमारतींचे  एरिया ठरवून  दिले.  शेट्टी सायबाला रोज कोंबडा लागे. मिशाळ रोज गावात जावून चढ्यादराने अंडी  कोंबडे  विकत  घेई.  बेलदार हप्त्यात बुधवार रविवारी नाणार तिठ्ठ्यावरच्या धनगर वाडीतून बकरा आणीत. जवळ जवळ पंधरा दिवसानी  प्रारंभिक कामे पुरी झाली नी रस्त्याचे  कामही  पुरे झाले  नी  शेट्टी साहेब  निघून गेला.  टॉवरचे फौंडेशन  आणि इमारतीचे काम स्थानिक कंत्राटदाराला दिलेले होते.  शेट्टी साहेबाने  दाखवलेल्या मार्किंगवर  बांधकाम सुरू झाले.  अधून मधून शेट्टी साहेब विजिट करून  कंत्राटदार नीट काम करतो आहे की नाही  याची पहाणी  करून जाई. दरम्यानच्या काळात  सिमेंट व अन्य सामान ठेवायची  शेड  बांधून झाल्यावर  सायबाने  धुमाळ वाडीतला बाजी, गणू  आणि सोन्या या तिघाना दररोज आठ तासाच्या शिफ्ट बेसवर  वॉचमन म्हणून  टेंपररी नेमून घेतले. त्यावेळी 89 रुपये  डेली वेजीस तत्वावर रोज मिळे. काम म्हणजे  फक्त बसून लक्ष ठेवणे  एवढेच. हा भाग निर्मनुष्य  एकवशी  असल्याने   रात्री  एकट्याने  राहण्याचा प्रश्न होता. त्यावर त्या तिघानी तोडगा काढला. उजाडल्या पासून संध्याकाळपर्यंत एकाने थांबायचे आणि रात्री  दोघानी जोडीने थांबायचे. दर पंधरा  दिवसानी पाळी नी  जोडी बदलायची . आजही  तीन  वॉचमन नियमित  वेतनावर सेवेत आहेत. ते  सुद्धा  दिवसा एकजण आणि रात्री  जोडीने थांबायचे याच पद्धतीने    ड्युटी करतात.

           रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर  टॉवरचे फाउंडेशन  आणि  इमारतीचे काम सुरू झाले. त्यावेळी  सिमेंट  ओपन मार्केटला  मिळत नसे.  त्या कालखंडात  महाराष्ट्रभर  सिमेंटचे  दुर्भिक्ष्य  होते. बरीच बांधकामे सिमेंट अभावी  रखडलेली होती.  पण हे  शासनाचे काम असल्यामुळे  सरकारी कोट्यातून मुबलक सिमेंट मिळायचे. कंत्राटदार  मिळालेल्या स्टॉक मधली पोती  जादा पैसे घेवून गरजूना विकीत असे. त्या दीड दोन वर्षाच्या काळात  नाणार कुंभवडे  पंच क्रोशीत झालेली बांधकामे  टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टरकडून  काळ्या बाजाराने सिमेंट नेवून  केलेली आहेत. पाऊस  काळापर्यंत  टॉवरचे  फौंडेशन आणि ऑफिसच्या इमारतीचे निम्मे  बांधकाम  पुरे होत आले. टेंबावर  कायम  जोराचा वारा असतो. पावसात  चार महिने  हा स्पॉट  उंचावर असल्यामुळे  वाऱ्याचा  जोरही  भलताच असायचा. म्हणून पाऊस काळात काम बंद  ठेवावे लागले. मात्र  चोवीस तास कायम वॉचमन असायचा.

        धुमाळ वाडीत  गंगाराम धुमाळ बर्कनदार होता. त्याची ठासणीची बंदूक होती. टॉवरच काम सुरू होवून हाय टेन्शन केबल टाकून लाईट सुरू   झाला.  शेट्टी साहेबाने मोठा सर्च लाईट  आणलेला होता. रात्री त्याचा फोकस टाकला की ससे, डुकर, भेकरी  यांची हुकुमी शिकार मिळायची.  जवळ असलेल्या  जितवण्यावर रात्री  पाणी  प्यायला  आलेली जनावरे  टॉवरकडून फोकस टाकला  की स्पष्ट  दिसत. गंगाराम  धुमाळ, नाणार मोंडेवाडीतला दुसनकर तसेच  आजुबाजुच्या काही गावातले  बर्कनदार  कुणी ना कुणी   दर चार दोन दिवसानी रात्रीचे टॉवरजवळ  शिकारीला जायचे.  पुढे  पुढे  राजापुर, रत्नागिरीहून  काही सरकारी अधिकारीसुद्धा  स्पेशल  जीप काढून  खास शिकारीसाठी  नाणार टॉवरकडे येत. अगदी  आजही  महिन्यातून  चार पाच वेळा  कुणी ना  कुणी  शिकारीसाठी हटकून  टॉवरकडे  खेप करण्याचा प्रघात आहे. एकतर नाणारात  देवानेच पारध करायला  बंदी घातलेली आहे. त्यामुळे  स्थानिक  लोक  शिकार करीत नाहीत. दुसरे म्हणजे   टॉवर जवळून हातिवले जैतापूर  पर्यंतचा परिसर दिसतो. त्यामुळे रात्री  कस्टम किंवा पोलिस यांची   टीम जीप घेवून  गस्त घालायला आलीच तरी  लांबून  हेडलाईटचे फोकस  दिसतात. त्यामुळे  बेसावध  रेड मध्ये सापडायची भीती नाही. तिथे घातलेली खेप सहसा वाया जात नाही . काही ना काही शिकार नक्की मिळते. मुंबईतले  शिवसेनेचे  एक कार्पोरेटर  त्या  दशकात  मित्रमंडळ घेवून  वर्षातून दोन तीन वेळेला शिकारीसाठी  नाणार टॉवरकडे  यायचे.

          पावसाळा संपला नी दसऱ्यानंतर  धूमधडाक्याने कामाला सुरुवात झाली.  रिले सेंटरच्या मुख्य कक्षाला स्लॅब घातलेला  आहे. त्याकाळी  नाणार पंचक्रोशीतल्या खेडे गावानी  ते मोठे अप्रूप होते. गावातली हौशी मंडळी मुद्दाम बघायला येत असत. टॉवर उभारण्या साठी  मटेरियल येवून पडल्यावर शेट्टी साहेब  टेक्निशियन्सची  वेगळी टीम घेवून आला.  दिसामाशी   काम उठायला  लागले  तेंव्हा तर स्थानिक माणसे  आश्चर्य चकित झाली. लांबून पहाणारे म्हणत “ह्यां म्हंजे  चार चार  शिडयो बांधलानी हत....... टेंबार  वारो म्हणशा तर  काय  निस्तो भनभनता ....  एक कावटी  इली आस्ली तर मानुस दुकू  उडॉन जायत........ ह्या काय टिकताना कटिण  हा......” मात्र  त्याची मजबूती नी भव्यता  त्या स्पॉटवर  जावून  बघितलं  तरच  लक्षात  येईल . टॉवरचं  काम सुरू झालं नी पुन्हा  कोंबड्यांचा जसा रतीब सुरू झाला. कुंभवड्यात कोंबडी मिळेनाशी झाल्यावर नाणार, हरचली, तारळ, गोठिवरे , उपळे, प्रिंदावन,  सागवे   ते पार जुवाठी  माडबनपर्यंत  जीप दामटून मिशाळ कोंबडी पैदा करी. लोक अजूनही टॉवरचा विषय निघाला की हटकून सांगतात. “त्ये टायमाक  टॉवर बांदनारो  सायब् इलो व्हतो ना , तेना  नानार कुंबवड्या सकट धा   गावात  औषदाक म्हनशा  तर कोंबडा शिल्लक ठ्येवलान्  नाय.........अक्ख्या दुनियेतली कोंबडी खावन्  हगोन ग्येलो भडवो ...... ”

            टॉवरचं  काम पुरं झालं. शेवटच्या  टप्प्यात तीन फुटी हेवी ड्युटी   अ‍ॅसिडच्या   पन्नास साठ बॅटऱ्या  आल्या. एकेक बॅटरी  एवढी  जडशीळ की  केबलचे लवंग़ण  करून त्यात चिव्याचे मजबूत दांडे घालून  चार  खांदकरी ती वाहून नेत.  स्ट्रॉंग रुममध्ये  एमर्जन्सी साठी  बॅटरी  सप्लाय बारा महिने बत्तिस काळ कायम जय्यत ठेवलेला असतो. आरंभी  नेमलेले  वॉचमन नियमित वेतनावर  सेवेत रुजू झाले. त्याना दैनंदिन  काम म्हणजे सकाळ संध्याकाळ बॅटऱ्या आणि अन्य मशिनरीची रिडिंग घेवून ती रजिस्टरला नोंद करणे.  रोज  एकदा पणजीला रिपोर्ट करणे. काही तांत्रिक अडचण असेल तर पणजीमधिल ऑपरेटर सुचना देईल त्याप्रमाणे किरकोळ सेटिंग्ज करणे एवढेच काम असते. महिन्यातून एकदा पणजीवरून कोणीतरी टेक्निशियन येवून सगळी यंत्रणा तपासून जातो. असा मनुष्य येण्यापूर्वी पणजीहून सुचना येते आणि कोडवर्ड दिला जातो. दरमहा पाच तारखे पूर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते.

           टॉवर  जोडून झाल्यावर सड्यावर गवत कापायला, कवळ तोडायला गेलेल्या लोकांच्या  नजरेत भरायला लागला. लोकं कुतुहलाने टेंबाकडे मुद्दाम  खेप   करायला लागली. टॉवरच्या पायथ्याशी गेल्यावर त्याची भव्यता बघून लोक चक्रावून जात. गावदरीत खाडीच्या कडेला आकाशावेरी उंच गेलेले जुनाट  माड  लोकानी बघितलेले.  टॉवरची  उंची वर्णन करताना  “दोन तीन माडांइतको उच हा .... इतके उच जावन् कसो काय बांदलानी  कोन जाना”  पुढे स्थानिक लोकाना अगदी अल्प फी मध्ये टॉवरकडे जावून फोन करण्याची मुभा आहे हे कळल्यावर काही जण तिथे जावून मुंबईतल्या  चाकरमान्याला फोन लावीत. तुम्ही नंबर दिलात की तिथला वॉचमन तत्काळ तुम्हाला संबंधित नंबर जोडून देतो. अक्षरश: मिनिटभरात कॉल लागतो.वॉचमन रजिस्टरला कॉल  नोंदून त्याची अल्प फी जमा करून सही घेतो. त्यावेळी तार करायला राजापुर गाठावे लागे. टॉवर झाला नी तो फेरसा कमी झाला. बायो गुरवीणीचा झिल मुंबईला  सिंडिकेट बॅंकेत नोकरीला होता. बायो महिनाभरातून एकदा त्याला फोन करी. “बाय माज्ये लय अजाब वाटता माका......आता हुंबय खय नी कुंबावडा खय.....  बाबु अगदी सामनी बसॉन बोलताहा असा वाटता .......”

        हायस्कूलच्या कामासंदर्भात मी चार- पाच वेळेला टॉवरवरून फोन केलेले आहेत. तुम्हाला रिसिव्हर वरून बोलता येते किंवा पॅनेल समोर उभे राहून स्पीकरद्वारा संभाषण करता येते. येथे हॉट लाईन असल्यामुळे  विना त्रास विनाव्यत्यय फोन करता येतो. अलिकडे  मोबाईल सुरु  झाल्यानंतर नाणार टॉवरची  बी. एस्. एन्. एल्. ची फुल्ल  रेंज  पंधरावीस कि.मी. च्या एरियात  मिळू लागली.  खाडी पलिकडे फणसगाव ते  विजयदुर्ग  या पट्ट्यातल्या सगळ्या गावांमध्ये  नाणार टॉवरची पावरफुल रेंज मिळते. आरंभ काळी  सेवेत असलेल्यांपैकी बाजी धुमाळ आजही हयात आहे. टॉवरच्या बांधकामाच्या वेळी घडलेल्या आणि नंतरच्या काळातल्या शिकारीच्या गंमती तो मोठ्या हौशीने सांगतो.

                                         *******

·         


1 टिप्पणी:

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...