बुधवार, १३ मे, २०२६

चकवा

 




                                      चकवा

 

                              

 

                  परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा घोव मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळा  होता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली  भात नी दोन शेर नाचण्याचा पेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे)  वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ  चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून  तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळीथ, चवळी, कडवे, वरणे अशी कडदणं(कडधान्यं) पेरीत त्या टायमालाही माहेरचे जोतये येवून दोन दिवसात उखळ काढून कडदणाची पेरणी करून देत. भातं कापून झाली तशी कडदण पेरायची वर्दी द्यायला अनशी  माहेरी निघाली होती. माहेरी  वीस बावीस माणसांच मोठं कुटुंब.  

              अनशीच्या आठ कोंबड्या रोवणीवर बसलेल्या, त्यांची चार दिवसांची अंडी साठवून ती टोपलीत शाबूत रहाण्यासाठी  प्रत्येक थराला भाताची करलं ( टरफलं) टाकून  त्यावर दोन  तोवशी ठेवून टोपली सख्याच्या डोईवर चढवून अनशी भिणभिणताना बाहेर पडली. एक वाट अनभवणे वाडीतून मुळवसाच्या घुमटी जवळून टेंबाची  घाटी चढून  सड्यावर जाणारी. वाट  एकवशी  नी   टेंबाची घाटी पण  उभीशूळ दमछाक करणारी . दुसरी वाट वडा सखलातून  बानघाटीने सड्यावर जाणारी जरा लांबची   पण  कायम रहदारी  असणारी. सकाळीच जायचं म्हणून अनशी  बान घाटीने  निघाली.  सडा गाठल्यावर मावळतच्या दिेशेने जितवण्यावरून दत्तवाडी डावी टाकून टेमकराच्या खरीतून खाली उतरणारी वाट तिच्या माहेरी चवानवाडीत जायची. चालसूर माणसाचा अडीच घंट्याचा पल्ला होता.  मोठी मुलगी बायो नी धाकटा तुकाराम  यांच्यावर घराची जबाबदारी टाकून सखरामाला घेवून अनशी बाहेर पडलेली असल्यामुळे दुपारी जेवणं झाल्यावर माहेरी न थांबता ती वापीस येणार होती. अनशी माहेरी पोचली नी भावाच्या पोरानी "मावळण ईली ...." म्हणत एकच गिल्ला  केला. धाकटा भाचा आनंदाने नाचत  "आये, आज सांजवान तोवसोळ्यो (काकडीचे घावन) करशी ना? " म्हणत आयशीला बिलगला. भावजयीनी तोवशाना रशीची टांगणी बांधून  ती  ओटीवरच्या मंडपीला लटकावली. मजवेली भावजय बोलली, "आत्तेबाय, मागच्या हप्त्यात आमची सा कोंबडी बावलानी  आनी कोल्यानी मारून खालानी...... आता फकस धा बारा बारकी पिली , चार तलंगी  नी दोन बियान्यावाटे कोंबे ऱ्हवले हत. पोरा अंड्याचो रस्सो खावक नुस्ती पागाळली हत.....  तुमी येवजून कवटां हानलास तां मतं ब्येस क्येलास....... पोराच कशान .... बापये दुकू  कवटाचो रस्सो खावच्या आशेक इले हत......" 

             दुपारी जेवताना  अनशी भावाना म्हणाली,  " तुमची कोंबडी ढाकुची  डालगी  बदलूक झाली हत...... " त्यावर  मोठा भाऊ  आप्पा म्हणाला, " आमच्या गावात  ही आयदणां करणारो कोण ऱ्हालो नाय......" त्यावर आनशी म्हणाली, " मी चार रोजात पांड्या कडसून  आवती काटयेची चार डालगी मोडून घ्येतय....... तुमच्या येवड्या खटल्यात दोन तरी राकनीचे कुत्रे व्हयेच........ घाडी वाडीत दोन कुत्र्यो वियालेल्यो हत तेतूर दोन चोवीस नखी पिला सोदून ती पाटवून  द्येतय. माज्याहारी नव कोंबे , आट रोवणीवयल्यो  नी  सा  खुडूक तलंगी हत. रोजचे शेरभर नाचणे नी  दोन शेर तांदळाच्यो कणयो लागतत.  उद्या  मळ्यात "कुरी"  सुरु झाल्यो काय म्हटल्या किमतीत माजे कोंबे  उकालणारी गिरायकां हत.  माज्या किराण्याची  खर्ची   कोंब्यात्सून  भागतां हा......  लय थोडी  आंडी  मी आडगिरायकी ईकतंय  नी बाकीची रोजच्या रोज  नळेकर  दुकानदाराक  घालतय......  आता गाव हा थंय  बावल नी कोल्हे  हतच. पण माजे  दोन कुत्रे  राकणीक हत......." आप्पा म्हणाला, " बाय, आमका कुरी  साटना  चार  कोंबे लागतत...... दोन आमच्याहारी हत, तू दोन कोंबे जोतयांबरोबर दी पाटवून....."  जेवणं उरकल्यावर वेळेवारी  बेताच्या टायमाला अनशी माघारी जायला निघाली. भावजयी  भोपळा देत होत्या पण अनशीकडे  गोठ्याच्या कोलव्यावर  चौदा पंधरा भोपळे धरलेले असल्यामुळे ती नको म्हणाली. फक्त  लाल तांदुळाची लुकटी तेवढी घेतली.

           सखारामासोबत अनशी चालसूर निघाली.भात कापणी, झोडणीची  कामं जोराला आल्यामुळे सड्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. माय लेक टेमकराच्या खरीतून पुढे झाल्यावर सख्या म्हणाला," आये आता जाताना टेंबाच्या घाटयेन उतरॉयॉ सकाळी उगाच लांबसून भोवाडो मारून येवक् लागला." अनशीलाही त्याचं म्हणणं  पटलं.  जितवण्याचा टापू  माग़े पडत आला नी  दोघही डावीकडे  टेंबाच्या घाटीच्या दिशेने निघाली. सराईचे दिवस. ढोपरभर  वाढलेली उंच गवतं  पिकून आडवी पडल्यामुळे  पायवाटा  नीट उमगत नव्हत्या. तशात  टेंबाच्या घाटीला वर्दळ फार कमी. त्यामुळे मळलेली वाट घड उमगत नव्हती.  बरंच अंतर चालून गेल्यावरही  घाटीच्या माथावळीवर असलेला  खुणेचा वड दिसेना .तेव्हा अनशी म्हणाली, "अरे सखारामा, आपून वाट चुकलंव सा वाटता. एवढ्यात घाटयेरचो वड दिसॉक व्हयो हुतो......." त्यावर जरा विचार करून सखाराम बोलला,"व्हय व्हय, माकाव तसाच वाटतां ...... लय चल्लाव आपून. येवड्यात  वड दिसॉक हवो हुतो......."

           थोडावेळ विचार करून अनशी म्हणाली, " गवता पिकॉन आडयी पडल्यागुणां  सदीची वाट दिसली नाय बव्हतेक आमकां. आता उजव्या दिशेन फुडे जावया.  म्हंजे निदान बानघाटीसर तरी जावक्  होयत्.....  " मायलेक  उजव्या अंगाने  झप झप चालीला लागले. बराच वेळ चालल्यावर  अनशी दम खायला म्हणून उभी राहिली नी एकदम चकित झाली. जिथे प्रथम वाट चुकल्याची शंका त्याना आली होती त्याच ठिकाणी ती फिरून आली होती. " अरे झिला मगाशी आपून  चुकलाव असा म्हनून उजव्या दिशेन फुडे ग्येलाव पण आता पुना फिरॉन थयच इलाव सा वाटताहा माका." आता सखारामही चपापला. " व्हय आये, ती काय उक्षीची झाळ नी  सकेऱ्याची ढिगोळी ..... मगाशी थय उबी ऱ्हवान आपून उजया दिशेन जावचा ठरवलंव....... ह्या मायझयान पुना भोवडोन  आमका  थयच हानलान ......." नी मायलेक दमून खाली बसली.

 

chakava bw    

                आता उजवीकडे न जाता त्यानी डावी बाजू धरून चालायला सुरुवात केली. अनशी किती वेळा त्या वाटेने माहेरी जावून आलेली......  ती  खाणा खुणा आठवायचा प्रयत्न करीत होती पण सगळ्या दिशानी एकच नजारा दिसे. थोडावेळ चालल्यावर दोघही पुन्हा  फिरून फिरून उक्षीच्या झाळी जवळ आली. आता मात्र सखाराम घबरा घुबरा झाला. " आये ह्या माका भुताटकी सारा कायतरी झाल्यासारखा वाटताहा. " जरा दम खावून अनशीने अंदाज घेतला. दिवस मावळायची वेळ जवळ येत चाललेली. चारी दिशानी कुठेही ओळखीची खूण दिसेना की नजरेच्या टप्प्यात  कोणी माणूस की ढोर वासरूही दिसेना.

                 आता डाव्या उजव्या दिशाना न जाता सरळ मोहरा फिरवून माघारी जायचा निर्णय तिने घेतला. तिने हात जोडून नवलाईला सांगणं केलं. "बाई नवलाई..... आमी हय चकव्यात सापाडलंव..... ह्यो कोन आडमार्गी आमच्या पाटी लागलो  हा नकळे.... तो आमका  फिरवून फिरवून एक्याच जागेक भोवडवता हा...... आमची राकाण आता तू कर...... सांजवासर आमका खयतरी मानसाच्या आसऱ्याक न्ही माज्ये बाये...... चार दिवसान तुजी होटी भरीन......"

                नवलाईला सांगण करून ती निर्धारपूर्वक उलट दिशेने चालायला लागली. घंटा भरात बांगर पाड्याच्या ढुरकण्याचा आवाज आला. नी तिच्या जीवात जीव आला. ती आवाजाच्या रोखाने निघाली. शंभरेक पावलं पुढे गेल्यावर गायरं नी बैल चरताना दिसले. कुठला भाग हे समजायला मार्ग नव्हता पण गुरं दिसताहेत म्हणजे चालण्याच्या टप्प्यात वसती असणार हे नक्की. गुरं परतीला लागली त्यांच्या मागोमाग मायलेकरं चालत निघाली नी थोड्याच वेळात घाटीचं उतरण आलं. ही कुठची वाडी काय त्याची ओळख पटेना. पण थोड्याच वेळात घरं दिसायला लागली. पहिल्यानेच लागले त्या घराकडे अनशी निघाली. घरातला कोणतरी बापया आंगणात उभा होता.मग  अनशीने पुढे जाऊन त्याला हाक मारलीन.                        

             "भावजीनू, मी  चिचेबुडच्या देवू  परटाची मागारीण.... माजा म्हायार चवान वाडीत बाबू हडकराकडे...... परत येताना आमी वाट चुकॉन हय उतरलंव......." त्यांच हे बोलणं सुरु असताना घरातून दागिन्यानी मढलेली गोरी बाई पुढे आली. " तू  चिचे बुडच्या साईत्र्ये परटीणीची सून ना ग्ये? तुजी सासू  येवची आमच्या कडेन. तुजो घोव पण जीवत आसताना कवटां घेवन् येयाचो. मी  सुमा नार्येकरीण ...... दारूवालो ठकसेन नार्येकर आयकॉन म्हायत आसात तुका, मी तेची दुसरी मागारीण......"

        आता ओळख पटली.  दारुवाल्या ठकसेन नार्वेकराला दशक्रोशीतले लोक  ओळखीत. साताठ वर्षामागे त्याने दुसरी देखणी बायको केलीन हे पण अनशीला  माहिती होते. ते तिचे कवठाचे नी  कोंबड्यांचे हुकमी गिऱ्हाईक होते. दर महिन्याला  विठू घाडी  कसेना साठी  मोठ्यात मोठा कोंबडा असेल तो चढ्यादराने रोख रुपये देवून न्हेत असे. दारूवाली असली तरी त्या माणसांची ख्याती चांगली होती. सुमाने तिला हात धरून न्हेवून ओट्यावर बसवले. माहेराहून परत येताना तिला चकवा कसा मिळाला हे ऐकल्यावर  सुमा म्हणाली, " तरी बेतान भागला....... खयतरी आराच्या पारा जावन् पडलास नाय  तुमी..... आमी दार्येचो धंदो करतंव ह्यो अल्लग विषय....पन आमी काय मानसात्सून उटलेली नाय...... हैसून  तुमच्या घरी जायसर नाय म्हटला तरी दीड घंट्याची चाल हा...... आता काळवा पडला...... ह्येच्या फुडे तुका वांगड द्येवन्  पाटवली तरी  रात व्हणार....... मी चाय करतंय . तवसर आमच्ये बापये येती. आमच्याहारी बत्ती आसा...... तशी तुमी वस्त्येक हय ऱ्हवलास नी उजवाड्ल्यार ग्येलास तरी दुकु चलात. पण तुजा चेडू नी झील वाट बगीत ऱ्हवती. मी तुका वांगड द्येवन्  घरी पोचवतय......"

             कोकणात सड्या माळाला विशेषत: घाट्या नी उतरणी सुरु होतात त्या माथावळीना असंख्य ठिकाणी असे चकवे आजही आहेत. ह्या काळेवेळेच्या गोष्टी असतात. पण एकदा माणूस चकव्यात गावला की पायाखालची वाटही परकी होते. मिरगाच्या टायमाला पहिले चार पाच पाऊस झाले की पाण्याच्या व्हावट्यानी नेहेमीच्या पायवाटा उमगेनाशा होतात नी माणसं रानभेरी होतात. तुम्हाला तोंडा समोर दिसणारा नजारा तुम्ही उलटे फिरून दहापावलं गेलात की असा काय बदलतो की आपण याच वाटेने आलो होतो हे ही पटेनासे होते. ऐन पाऊसकाळात  दिशा अंधारून येतात नी झिम्माड पाऊस सुरू होतो त्यावेळी सड्या माळावर फिरताना नेहेमीच्या वाटाही परक्या होतात. दसरा झाल्या झाल्या सराईच्या आरंभी गवतं पिकून आडवी पडली की पायवाटांचा मागमूसही नाहिसा होतो नी माणसं  चकव्यात गावतात .

               कोनशीच्या सड्यावरचे  टेंबलाईचे  देवस्थान  त्या आसमंतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध. गावतले लोक सधन. कोकणात अगदी आरंभी हापूस कलम लागवड सुरू केली कोनशीतल्या बापू ठाकुरानी. त्यानी पहिली चारशे कलमांची बाग उठवली. आपल्याला टेंबलाईच्या कृपेने बरकत आली असा त्यांचा विश्वास! त्यानी बावीस तोळ्याची पुतळ्यांची माळ देवीला घातली. नवरात्रीत नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रुपात सजवीत. त्यावेळी नऊ दिवस रोज वेगळे दागिने घालून शृंगार केला जाई. ते दोन सुपेभरून सोन्या चांदीचे दागिने असत. देवीची प्रभावळही चांदीची होती. हा सगळा ऐवज  मंदिरातच गाभाऱ्या बाहेर लाकडी पेटीत ठेवलेला असे. सणासुदीला मानकरी पुजारी पेटी  खोलून देवीला साज शृंगार चढवीत नी दुसऱ्या दिवशी तो उतरून पेटीत टाकीत. गावातले म्हार बुद्ध झाले, बरेचसे तरणे पोर  मुंबईला म्युनीसीपालिटीत नोकऱ्या मिळवून कुटुंब कबिला घेवून तिथेच स्थाईक झाले. नी दहा बारा-वर्षात  टोपल्या करंड्या, सुपे , रोवळ्या.  तट्ट्ये ही आयदणे मिळेनाशी झाली.

             तालुक्याच्या गावी नुकतेच कर्नाटकातले बुरुड येवून बेळाची आयदणं करून विकायला लागलेले. गावच्या पोलिस पाटलानी तालुक्यातल्या दोन तीन कुटुंबाना कोनशीत बोलावून आणले. इथे आवती मलकी काठ्याही विपुल नी  स्वस्त मिळत. त्यांचा एवढा जम बसला की धंदा आटोपेना. मग त्यानी पाव्हण्याना आवतण दिले, नी पाच वर्षात बुरुडांची  पंचवीस तीस खोपटी उभी राहिली. त्यांची वसाहत वाढली नी गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले. त्यावर्षी नवरात्राच्या उत्सवात देवीच्या पालखीपुढे बुरुडांचे कलाट (क्लॅरिओनेट) नी  ड्रम वाजपी नव्याने रुजू झाले. बुरुडांमधल्या काही बेरकी  लोकानी देवीचे  शेरावारी सोने चांदीचे दागिने नी महिरप काढून न्यायचा बेत आखला. दसरा झाल्यावर आलेल्या पहिल्या अमावास्येपूर्वी त्यानी कर्नाटकातून खास माणसं या कामासाठी  मागवून ठेवलेली होती.  ऐवज लांबवून रातोरात तालुक्याच्या गावी न्यायचा नी तिथून ट्रकात बसून बेळगाव गाठायचा बेत होता. तालुक्याला बुरुड वस्ती जवळ ट्रक उभा करून ठेवलेला होता.

              अवसेच्या रात्री  देवीचे पुजारी संध्याकाळी दिवाबत्ती करून गेल्यावर पाळतीवर राहिलेले चोर देवळात गेले.देवीच्या अंगावरचे दागिने . महिरप नी पेटीचे कुलुप फोडून आतला सगळा ऐवज, देवीच्या समाराधनेला वापरीत ती तांब्या पितळेची भांडी,  सगळा ऐवज तासा दीड तासात चार पाच पोत्यात  भरून  विंचेस्टरच्या चार सेली बॅटऱ्यांच्या उजेडात चोरानी तालुक्याच्या दिशेने चाल धरली. कोनशीतून तालुक्याला जायला अडीच तासाचे मकाण होते. मध्यरात्री पर्यंत तालुका गाठून उजाडण्या पूर्वी  फोंडाघाट चढून  गारगोटी मार्गे कर्नाटक हा तुरळक रहदारी असलेला सुरक्षित मार्ग त्यानी निवडलेला होता.दोनेक तास चाल मारल्यावर आपण कुठपर्यंत आलो याचा अंदाज घेण्यासाठी त्यानी आजुबाजूला बॅटरीचे फोकस मारले. उजव्या बाजुच्या फोकसात देवीच्या मंदिराचे उत्तरेकडचे महाद्वार नी  भिंत दिसली. आपण  गोल गोल फिरून परत मंदिराकडे आलो हे म्होरक्याच्या लक्षात आलं. तो त्या भागात वहिवाटलेला असल्यामुळे आता कोणीही पुढे न जाता सगळ्यानी  आपल्या मागून चालावे असा आदेश देवून तो तालुक्याच्या रोखाने चालु लागला. अवसेची रात्र असल्यामुळे गुडुप अंधारात दिशा उमगत नव्हत्या. दोन अडीच तास मकाण मारल्यावरही रस्ता उमगला नाही तेव्हा काहीतरी घोळ झाला हे म्होरक्याच्या लक्षात आलं. त्याने साथीदाराना थांबण्याची खूण करून चारी दिशानी फोकस मारून पाहिले. या वेळी ते  गावदरीकडून येणारी पाखाडी मंदिरासमोर शेवटते त्या ठिकाणी शेतमळ्यात पोचले होते.

               आता काय करायच? अशा चिंतेत पाचही चोर बुडाले असतानाच  एकेकाच्या बॅटऱ्यांचा मसाला संपत येवून फोकस  मंद व्हायला लागले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. हे म्होरक्याने ओळखले. देवी जागृत आहे म्हणून गेल्या कित्येक पिढ्या देवस्थानचा मौल्यवान ऐवज गावात कोणा मानकऱ्याच्या घरी  न ठेवता   गावदरी पासून लांब एकवशी असलेल्या या देवस्थानात ठेवण्याचा रिवाज होता. धास्तावलेल्या बुरडानी ऐवज भरलेली पोती तिथेच टाकून  पोबारा केला. ऐवज टाकल्यावर मात्र काही आडमेळा न येता  छाती फुटेतो धाव मारीत भिणभिणण्यापूर्वी चोरटे  पालावर पोचले. याबेतात सामिल असणऱ्याना काहीच कळेना. थोड्या वेळाने सावध झाल्यावर आपण रात्रभर मंदिरा भोवती कसे फिरत राहिलो?  नी शेवटी घाबरून ऐवज तिथेच टाकून आपण पळ कसा काढला हे चोरानी सांगितले. त्यांच्यापैकी ज्याने देवीच्या पाषाणाला हात घालून पुतळ्याची माळ, टिक्का, नथ. चौपदरी मंगळसूत्र काढून घेतले होते त्याला थंडी  खावून आली नी सणसणून ताप भरला. पाच पाच वाकळी घालूनही तो थडाथडा उडत होता. दोन तासानी ताप डोक्यात शिरून तो बरळायला लागला.

              सकाळी उशिरा कौल प्रसाद घ्यायला सदू गुरव आणि सातेकजण देवळाकडे निघाले. टेंबावरून पुढे येवून चढण संपल्यावर  चिरेबंदी पाखाडी सुरु झाली. देवीचे देवूळ नजरेच्या टप्प्यात आले त्यावेळी डाव्या हाताला पाच साखर दाबोटे  पडलेले दिसले. मंडळी कुतुहलाने जवळ गेली. पोत्यांचे बंद सोडल्यावर आत  भांडी, सामान दिसले. रात्री बहुतेक देवळात चोरी झाली असा तर्क करून स्वत: सदू गुरव  चोरीची वर्दी द्यायला गावात गेला. तासाभरात एकेक करीत मंडळी जमू लागली. पोलिस पाटील आणि देवस्थानचे मुख्य मानकरी  दत्ताजी भावे यानी तालुक्याला जावून पोलिस स्टेशनला तक्रार करायची, तो पर्यंत कुणीही मुद्देमाल हलवायचा नाही असा निर्णय घेतला. मध्यान्हीपूर्वी पोलिस आले. मग पोती  मंदिरात नेली. पोत्यातल्या सामानाची मोजदाद झाली. त्यानंतर गणूभाऊ  सातवळेकरानी देवीची पूजा केली.देवस्थानच्या रजिस्टरात सामानाची नोंद होती त्यानुसार असलेल्या सामानाची पडताळणी झाली. दरम्याने तारतम्य राखून  मानकऱ्यांपैकी   बापू बोंडाळ्यानी आपल्या घरून वीस लोकांचे जेवण मागवले.

             दुपारनंतर  माणसांची नुसती रीघ लागलेली. सगळे सोपस्कार पुरे व्हायला संध्याकाळ झाली. रजिस्टर प्रमाणे सगळा ऐवज शाबूत होता चोराना एकही वस्तू लांबवता आलेली नव्हती. देवीचे नित्य लेणे वगळता अन्य सोन्या- चांदीचे अलंकार, पंच समक्ष यादी करून ते भाव्यांच्या हवाली करण्यात आले. तो ऐवज कायम त्यांच्या घरी ठेवायचा नी  देवस्थानच्या प्रथे प्रमाणे निर्धारित दिवशी मंदिरात आणायचा असे ठरले. बाकीची सगळी भांडीकुंडी पूर्वापार  रुढीनुसार देवळातच ठेवायची असे सर्वानुमते ठरले. काळवं पडण्याच्या वेळेला दिवाबत्ती करून , आरत्या करून माणसं घरोघर गेली. देवीच्या पाषाणाला हात घालणाराची अवस्था बघून कटात सामिल असलेले सगळेच बुरूड कमालीचे धास्तावले. रात्री कोणालाच अन्न गेले नाही. सकाळी सगळे जण विचार करू लागले. देवीला नारळ मानवून चुक कबूल करायची नी नाक तोंड घासून माफी मागायची असे ठरवून  मंडळी नारळ घेवून गणुभाऊंच्या दारात गेली. गणुभाऊनी  मंदिरात गेल्यावर  विहीरीवर जाऊन  पाणी काढून आंघोळ केली. ओलेत्याने कळशी भरून देवीच्या पाषाणावर ओतली. मग़ गंध उगाळून आवारातल्या तुळशीच्या टिकशा नी जास्वंद , तगरीची फुले काढून आणून यथासांग पुजा केली आणि नंतर बुरुडांसाठी प्रार्थना केली.

            गणूभाऊनी जाबसाल घातली  नी  "तुम्ही नाक तोंड घासून कायती प्रार्थना करा " असे गणुभाऊनी बुरुडाना सांगितल्यावर त्यानी गाभाऱ्या समोर नाकतोंड घाशीत  मनोमन आपण देवीचा ऐवज चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची कबूली देवून यापुढे अशी आगळिक न करण्याची शपथ खाल्ली. मग बाहेर जावून मंदिरा समोर पाळंदीतला धुरळा चिमटीत धरून तोंडात टाकला नी बोटे कपाळावर पुसली. यावेळी देवीच्या उजव्या हातावर वाहिलेले तगरीचे फुल खाली पडलेले गणुकाकाना दिसले. बुरुड आत आल्यावर "पाषाण राजी झाला," असे सांगून त्यानी ठेवलेले नारळ वाढवून पाषाणावर पाणी ओतून सगळ्या कवडींची काठळी काढून थोडे तुकडे बाहेर नेवून तुळशीवृंदावना समोर ठेवले नी  चार दिशानी फेकले. ते आत गेल्यावर  एक वेगळा नारळ ठेवीत म्होरक्या म्हणाला," भटजीकाका आमचा योक सवंगडी, सटवाजी, तापानी फनफनल्याला हाय तेच्यासाटना जाब घाला........"  गणूभाऊनी  गाऱ्हाणं  केलं. यावेळी पाषाणाच्या  डाव्या खांद्यावरची तुळशीची मंजीरी खाली पडली. पाषाण राजी नाही  हे गणुभाऊनी ओळखले. त्यानी नारळ फोडून पाणी पाषाणावर ओतले. सगळ्या नारळांच्या शेंडी कडची अर्धुके प्रसाद म्हणून बुरुडाना परत दिली. बुरुड निघून गेले. बुरूड पालावर पोहोचले तेव्हा पाषाणाला हात घालणारा बुरुड मेलेला होता नी पालावर रडारोय सुरू होती.

            देवीचा ऐवज चोरणाराना मिळालेला चकवा  देवस्थानच्या  जागृतीमुळे मिळालेला, देवीने शिक्षा म्हणून दिलेला  होता. मात्र काही ठिकाणं , विशिष्ठ जागा बाधिक असतात तिथे ठराविक वेळी, ठराविक  दिवशी जो कोण माणूस कचाट्यात गावेल त्याला तिथला कोण  देवचार, समंध असेल तो  भोवडवल्याशिवाय सोडीत नाही. अशावेळी जेव्हा तिथल्या  दुष्ट शक्ती जागृत झालेल्या असतात तेंव्हा गाई ‌- म्हशी, कुत्रे - मांजरे याना त्याची जाणीव होते नी ते प्राणी त्या शक्तीची चतु:सीमा सोडून त्याबाहेरून पुढे जातात . त्यामुळे हे प्राणी सहसा कधी चकव्यात गावत नाहीत. सड्या माळांवर फिरताना सोबत ढोर किंवा कुत्रा मांजर असेल तर  माणूस चकव्यात   गावत नाही. काहीवेळा अशा काही दुष्ट विकृत शक्तींचा फेरा असतो. त्या आपल्या निर्धारित मार्गाने जात असताना वाटेत कोणी माणूस आडवा आला तर त्याला काहीना काही दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यांच्या फेरीचे मार्ग, दिवस, वेळा पूर्वनिश्चित असतात.                    

                गोठीवऱ्याच्या सड्यावर कुंभारांच्या वाडीवरून पुढे गेलं की, कातळी भागात पाच सहा मोठ्या खरी (कातळावरचा खोलगट भाग. त्यात मातीची भर घालून भात नाचणीची लागवड करतात) आहेत. एका खरीत दोन पुरुष खोल डबरा नी एका अंगाला  दरडीसारखा भाग आहे. तिथे पोपटी नी गुलाबी रंगाच्या मातीच्या खणी  त्यांच्या मागच्या बाजुला  धाकू कुंभाराची खरी  आहे. त्या खरीत वाटमार्गी राखणा २४ तास पहाऱ्यावर असतो. त्या खरीतून तुम्ही एक काटूक घेवून निघालेत तरी तो तुम्हाला अडवतो अशी शेकडो वर्षांची  वदंता आहे. हा धाकू नेमका कधी हयात होता ह्याची काही माहिती नाही. सध्याचे  कुंभार हे आपली नववी पिढी असल्याचे सांगतात. पण महसुली कागदपत्रात क्षेत्राचे  नाव धाकुची खरी असेच नोंद आहे. एकूण 22 एकर  क्षेत्र  तीने व्यापलेले असून सभोवार गळाभार उंच पाषाणी बंधारा आहे. कडेनी मिळून सुमारे तीन चतुर्थांश भाग कातळी आहे. वरच्या अंगाने व्हावटीचे पाणी आत यायला नी  सखलवट भागाकडे पाणी निचरून जायला पन्नासेक मुशी आहेत. जोरगतीच्या पावसाच्या पाण्या बरोबर खळमळ व्हावून येते, ती खरीत थावटते नी पाणी निचरून जाते. जोरगतीच्या पावसातही पाऊलभर पेक्षा जादा पाणी तुंबलेले नसते.  मळीचा चांगला खप भात, नाचणीची शेती, आले, हळद नी  तुरी, उडीद , कडवा , वरणा , मूगाच्या पिकाना मिळायचा  नी  जित्रब फळानी शेंगानी  लगडून जायचं .

              दत्त जयंतीच्या जत्रेत धाकुचा  वंशज  रत्नू कुंभार बैलगाडीभर आले विकायचा. अगदी पहिल्या पावसाला काकडी, चिबूड, भोपळे, गवार, भेंडी, पडवळाचे बियाणे घालतात. वेल चढवायला आंजणीची नी चिव्याची पातळ शिरड आंथरून दहा- दहा , वीस- वीस हात लांब तटकी बांधून खरीच्या वरच्या अंगाला कातळात मारलेल्या कायमच्या खड्ड्यात खूट पुरून तटकी बांधून ठेवतात. कातळवटीला वेल अती बेचारत नाहीत. गणेश चतुर्थीच्या दरम्याने जित्रब धरायला लागते. खरीतल्या राखणदाराची ख्याती ठावूक असल्याने वाडीतला कोणीच खरीकडे वळत नाही. वांदर, साळींदर, डुकर यांचाही उपाधी होत नाही. सडावळीला अगदी शेवटी ही खरी असल्यामुळे रंगाची माती न्यायला पंचक्रोशीतली माणसे येवून जातात. पण कोणीच तिकडे फिरकत नाही. त्या दिवशी चतुर्थी आधी आठवडाभर भटवाडीतला बबन गोडबोले वस्ताच्या दुकानातून जिन्नस घेवून घरी जाताना रंगाची माती न्यायला  खणीवर आला. त्याने दोन्ही रंगाच्या मातीचे गोळे करून ते चांदाड्याच्या पानात गुठाळून पिशवीत  ठेवले.  तो हात धुण्यासाठी पाणी शोधायला लागला. आठवडाभर  पाऊस तोंड घेवून नायसा झालेला. खाचरा खोचरात कुठेच टिपूसभरही पाणी  दिसेना.  पाण्याचा शो घेत तो धाकुच्या खरी पर्यंत आला. बेळ्याची तटकी सोडून आत शिरला.  खूप मागे गेल्यावर  एका डुकम्यात (कातळातला छोटासा खड्डा) साठलेले पाणी दिसले. त्याने हात धुतले. ओंजळ भरून तोंडाला लावली. पाणी स्वच्छ नी थंडगार होते. त्याने अधाशासारखे पोटाला तडस लागेतो पाणी प्याले.

                जरा हुषारी आल्यावर त्याने चौफेर नजर फिरवली. तुरीची ढाकं पुरुषभर उंच वाढलेली होती.  तटक्यांवर सोडलेले चवळी, तोवशीचे वेल फुलायला कागले होते. तोवशीच्या वेलावर वीतभर लांब कोवळ्या काकड्या धरलेल्या होत्या.  त्याने दोन काकड्या काढल्या. त्या पिशवीत टाकल्या नी कोवळी शिसं (अगदी छोट्या  काकड्या) चावीत  इकडे तिकडे बारीक नजरेने न्याहाळताना  ओथंबून धरलेला पडवळीचा वेल दिसला.  धाकुची  खरी म्हणतात ती हीच हे त्याच्या लक्षात आले. खरीचा सध्याचा मालक रत्नू कुंभार गेले पंधरा दिवस  तीस चाळीस पडवळांचा भारा बांधून गावात नेवून विकीत असे.बबनने दोन पडवळी मोडून ती पिशवीत भरली. खरीतले जित्रब बघून त्याचे डोळेच फाटले. आता तो माघारी जायला निघाला. तो बेळ्यापर्यंत आला नी चार पावलांवरून पिवळाधम्मक  साप  सरसरत गेला. बबन चरकला. त्याने वाट बदलून डाव्या अंगाने चाल धरली . तिथे गडगा सखल होता त्यावर चढून बाहेर पडायचा त्याचा बेत होता. त्याने सहज खाली नजर केली. पिवळा धम्मक साप फडा उंचावून त्याच्याकडे बघित होता. त्याच्या फडेवरचा आकडा स्पष्ट दिसत होता. बबनने  वाटा बदलून चार पाच वेळा बाहेर पडायचे प्रयत्न केले पण दरवेळी मोक्याच्या क्षणी  साप त्याला आडावून धरीत असे. उन्हाच्या कडाक्यात फिरून फिरून त्याच्या डोळ्यापुढे  रंगाचे ठिपके नाचायला लागळे नी समोरचे काही दिसेनासे झाले. घशाला कोरड पडली. एक पावूलही पुढे टाकायचे त्राण उरले नाही. जाणीवेच्या अखेरच्या क्षणी खरीची ख्याती त्याला अंधूकशी आठवली. त्याच जाग़ी बसकण मारीत त्याने पिशवीतले पडवळ्याचे तुकडे नी काकड्या बाहेर काढून टाकल्या. पण गडबडीत पडवळ्याचा टोकाकडचा  चार आंगळाचा तुकडा पिशवीत मोडून पडलेला होता . पाच मिनीटं इस्वाटा घेतल्यावर तो जीवाच्या कराराने  उठून चालू लागला . आता तीन दिशानी तीन सर्प त्याच्या दिशेने येवू लागले. सत्तरी उलटलेला बबन घाबरून वाट फुटेल तिकडे पळताना ठेचकाळून खाली पडला. तोंडातून फेस यायला लागला. त्याला उर्ध्व लागला नी तासाभरात त्याचे प्राणोत्क्रमण झाले.

           दुपारचे साडेबारा वाजून गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही म्हणताना गडबोलीने देवाची पुजा उरकून घेतली. दीड वाजेतो वा पाहून नवरा आला नाही म्हणताना  तो येताना कदाचित दांडेकरांच्या घराकडून  यायला निघाला असेल तर त्या माणसानी त्याला जेवायला थांबवून घेतले असेल असा तर्क करून वैश्वदेव उरकून तीने जेवून घेतले.  मग तासभर आडवी होवून मागिलदारी बसून ती नवऱ्याची वाट बघित राहिली. साडेतीन पर्यंत तो आला नाही म्हणताना तिने वाडीत जावून विठ्या तांब्याला बोलावून आणले नी वस्ताच्या दुकानापर्यंत जावून चौकशी करून यायला सांगितले. विठ्या वस्ताच्या दुकानावर गेला. बबन सामान घेवून साडेदहाला बाहेर पडला असे कळले.  येताना तो दांडेकरांच्या घरावरून चौकशी करून आला. बबन तिथे गेलेलाच नव्हता. तो कुठे गेला, कोणालाच काही तर्क करता येईना. चतुर्थीत त्याचा मुंबईतला मुलगा येवून गेला. त्याने आपल्या मुक्कामात गावभर सगळ्या घरी जावून  शोध चौकशी केली पण काही धागादोरा लागला नाही.  दसरा झाला नी सराई सुरू झाली. गवतं पिकली. नाचण्याची धाटं सुकली. कुंभाराची माणसं  नाचण्याची पिपळे नी फाटी घेवून कणसं वेटायला खरीत गेली.

             एक दळा वेटून पुरा होता होता  पलिकडच्या दळ्यातून दोन तरस  पाय ओढीत  धावत सुटले. उजव्या अंगाला गडग्याच्या कोपऱ्यावर पुढे आलेल्या खडपावर चढून ते खरी बाहेर गेले. माणसे कुतुहलाने शोध घ्यायला पुढे गेली तो  धोतराचा शेव दिसला. जरा पुढे गेल्यावर दोन अडीच वाव भागात  मळवट घातलेली दिसली. धोतराला मध्ये मध्ये कुरतडल्या सारखे ढोबळे पडलेले होते. बाजुला फाटलेला सदरा, गंजीफ्रॉक नी नाडीची पट्टेरी डिझाईनची चड्डी नी  तपकिरी रंगाची लोकरीची संघिश्ट टोपी होती. बबन गोडबोल्याचा पेहेराव त्याना आठवला. "म्हंज्ये हय येवन् म्येलो  गोडबोलो .... कोणीतरी शिक्कामोर्तब केले. त्यानी गावात वर्दी दिल्यावर तासाभरात गावातली जाणती मंडळी जमली.  सरपंच नी पोलिसपाटील  पोलिसाना घेवून आल्यावर पंचनामा झाला.  फक्त हाडे  शिल्लक होती. मनगटाच्या हाडावर  घड्याळ होते. बोटांच्या हाडात सोन्याची आंगठी, चांदीचे वळे, गळ्यातली चेन नी कानातली भिकबाळी सापडली. शर्टाच्या छातीवरच्या खिशात चष्म्याचे पाकीट त्यात ठेवलेली वस्ताकडेघेतलेल्या सामानाची यादी होती.

                पिशवीत केंडशी आलेली डाळ, चार पाच मोड आलेले  वाळून कोळ झालेले बटाटे , फरसाणाच्या पुडीचा तेलकट कागद,पैशाच्या बटवीत प्लॅस्टिकच्या पाकिटात  तीनशे सहासष्ट रुपये, जुनमध्ये मराठे  डॉक्टरानी दिलेली प्रिस्क्रिप्शन  असा मुद्देमाल हाती  लागला.  कपडे नी अन्य वस्तू यावरून बबन गोडबोल्याची ओळख पटली. सगळ्या सामानाची गठळी बांधून लोकानी ती गोडबोल्याच्या घरी नेवून पावळीत उंच टांगून ठेवली.  कोणीतरी पोस्टमास्तरांकरवी बाबनच्या मुलाला बॅंकेत फोन लावला. तो दुसऱ्या दिवशी दुपारनंतर बायको मुले नी मुंबईतच असलेल्या दोन्ही बहिणीना घेवून आला. संध्याकाळी भटजीनी स्मशान विधी  करून हाडांच्या गाठोळ्याला  अग्नि दिला.  मग  सारी भरणे, बारावे वगैरे सगळे और्ध्वदेहिक विधी उरकून मुले मुंबईला रवाना झाली. पेपरातल्या बातमीमुळे "धाकू कुंभाराची खरी " जिल्हाभर प्रसिद्ध  झाली.

                         कोकाट्याच्या बाबुवर कायम भवानीचं वारं यायचं.  गावातली भवानी ही इनामी देवता. अर्धा गाव देवीला इनाम दिलेला.  पेशव्यांच्या काळापासून देवीला सरकारातून वार्षिक १२५ रुपये  तेलबत्तीसाठी म्हणून मिळत. पुढे पेशवाई गेली तरी सरकारी इनाम पुढे चालूच राहिलं. अगदी आजही  मामलेदाराकडून प्रतिवर्षी  रक्कम  आदा केली जाते. देवीचे मुख्य मानकरी गोडबोले, देवीचा संचार व्हायचा  ती पाटण्यांची घरवड  आणि  पूर्वसत्तेची पुजा देखभाल करणारी गुरवाची  घरवड , देवीसमोर  भोत जाळण्यासाठी तेल काढून द्यायचा मान असलेली रावतांची घरवड त्याखेरीज गेल्या सात पिढ्या वंश परंपरेने देवीची पूजा करणारे  भाऊ मराठे हे देवीचे मुख्य मानकरी.

                मंदिरात मुख्य गाभाऱ्यात दीडहात उंच काळ्या पाषाणाची शाळुंका होती ती स्वयंभू भवानी, तीला राजसत्ता म्हणत. गाभाऱ्यासमोर सभामंडपाच्या एका कोपऱ्यात  चार हात औरस चौरस चबुतरा होता. त्याच्या मध्यभागी दीड वीत उंच शाळुंका होती ती पूर्वसत्ता, आकारी. तिच्या पुजेचा मान गुरवाकडे असायचा. दर शुक्रवारी संध्याकाळी  देवीची आरती व्हायची. तेंव्हा बाबूवर  भवानीचं वारं यायचं. आरत सुरु होण्यापूर्वी देवीच्या बाजुला भितीवर तीन हात लांबीची मोठ्या कवड्यांची माळ लटकवून ठेवलेली असे. ती गळ्यात घालून तो आकारीच्या उजव्या कोपऱ्याहातभर उंच जीता भोंबाडा होता. त्याच्या माथ्याकडची नखभर ओली माती नखलून ती कपाळावर लावी. मग तो घुमायला लागे, पाचेक मिनिटं आकारीच्या पुढ्यात पिंगा घातल्यागत घुमल्या नंतर   आकारीच्या समोर असलेला पाच मणी लोखंडी गोळा  छाती अगळ उचलून दण्णकन खाली टाकी नी मोहरा वळवून धावत पोवळीत जावून मंदिराला प्रदक्षिणा घालून येत असे.

               लोखंडी गोळा दोन दांडग्या गड्यानाही मुष्किलीने   भुईसांड  व्हायचा  इतका जड होता. पण संचार झाल्यावर बाबू तो उचली, ही देवीचा संचार झाल्याची साक्ष मानीत. मंदिराला प्रदक्षिणा घालून बाबु आत आला की,  मानकरी मोरपिसांचा कुंचला आणून त्याच्या हातात देत. त्याने तो भवानीला वारा घालायला लागला की आरत  सुरू होई. आरत्या संपल्यावर पुजारी देवीचा अंगारा लावून त्याच्या हातावर तीर्थ घालीत. तीर्थ घेवून तो परत आकारीच्या समोर जावून गळ्यातली कवडीची माळ काढून खांबाला लटकावी  तेव्हा  कुड  मानव कळेत येई.

           मळ्यात  देवीला इनामत दिलेली जमीन होती.  त्यापैकी पंचवीस एकर मातब्बर तुकडा  त्याला देवीचे भाटले म्हणत. त्यातली दोन एकर पुजेचा मेहनताना म्हणून मराठ्याच्या ताब्यात होती नी उरलेली जमीन देवस्थानचा उत्सव, वार्षिके नी  इतर देखभाली साठी  गोडबोल्यांच्या ताब्यात  होती.  दुसरा  तुकडा  मळ्याच्या  पश्चिम अंगाला होता त्याला मुगडी म्हणत. ती सात एकर जमिन. त्यातली  दोन एकर गुरवाकडे,दोन एकर देवस्थानला  तेल घालायचा मोबदला म्हणून रावताकडे आणि तीन एकर देवीची कुड  असलेल्या कोकाट्यांच्या ताब्यात होती. कोकाट्यांची पिलग़ी वाढून वीस उंबरे झाले होते . पण त्यापैकी पाच मुख्य घरवडींकडे  जमिनीचा ताबा होता.  स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या राज्यात कुळकायदा आला. त्याचा फायदा घेवून मराठ्यांच्या ताब्यात असलेली जमिन जी कुळाना कसायला दिलेली होती ती बरीचशी कुळानी बळकावली. पुजारी मराठ्यांच्या ताब्यातली बरीच जमिनही अशीच कुळानी बळकावली. पण त्यातही काही  पापभीरू कुटुंबानी  आपला ताबा सोडला. गुरव , तेली नी कोकाट्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीही अशाच कसणारानी बळकावल्या. मात्र  बाबूने त्याच्या ताब्यात असलेली एक एकर जमिन  आपल्या नावावर लावून न घेता ती देवीच्या नावे पूर्वापार होती तशीच सोडलेली होती. तो म्हणे , "देवीचो संचार मी सांबाळतंय तवसर मी कसणार नी मी देवीचा वारा बंद केलय्  की  ताबो सोडणार....  माज्या माघारी   कोकाट्याच्या घरवडीत जी कोण कूड उबी ऱ्हवात तेका जमिनीचो ताबो मिळॉने."

                भावकीतल्या लोकानी त्याला मथवायचा बराच प्रयत्न केला पण बाबु बधला नाही. बरं तो वार्षिक सोडायलाही तयार होईना तेंव्हा भावकीतल्या मुंबईवाल्यानी त्याचा काटा काढायचा बेत योजला. दिवाळीनंतर  मुंबईतून  गुंड घेवून मुंबईवाले येणार होते. कोणी ओळखू नये म्हणून ते दाढ्या वाढवून शिखांसारखे पागोटी बांधून येणार होते. रात्री बोट विजयदुर्ग बंदरात आल्यावर  खाली उतरून ते मैलभर अंतरावर  सरकारी गोडावूनपर्यंत जावून थांबणार होते. भावकीतल्या गाडीवाल्याबरोबर पुरळ तिठ्यावर येवून तिथे ते दडून रहाणार होते. संध्याकाळी गावात जावून बाबुला अर्धमेला करून रातोरात परत विजयदूर्ग गाठून तिथे  लपून राहणार होते नी  संध्याकाळी बोटीने मुंबईला परत जाणार होते. बाबुला काहीतरी खायच्या वस्तूतून किंवा पानातून भांगेची गोळी घालून तो बेशुद्ध होईल अशी योजना गावातले दोघेजण करणार होते. मार्गशीर्षातली अवस हा दिवस मुक्रर झाला. त्यावेळी बोटीचे पॅसेंजर आणायला कोकाट्यांच्या गाड्या विजयदुर्गात जायच्या. कटात सामिल असणारा ठरलेल्या दिवशी बैलगाडी घेवून गेला. रात्री बोट आल्यावर पाच शिख पॅसेंजर पडावातून उतरल्यावर गाडीवानाने ओळखले. भावकीतले नित्य परिचयाचे दोघे त्या जथ्यात होते पण शिखांच्या वेषात तो त्याना ओळखू शकला नाही. बंदरावर उतरल्यावर ते चालत सुटले. त्यांच्या मागोमाग कोकाट्याची गाडी सुटली.

                सड्यावर गोडावून च्या पुढे आल्यावर कोकाट्याने शिखाना खूण केली नी गाडीत घेतले. गाडी पुरळ तिठ्यावर आल्यावर ते खाली उतरले. कटात सहभागी असलेल्या गावातल्या भाऊबंदाना  मुंबईवाले आल्याची वर्दी दिली. बाबू वस्तीला घरी न थांबता अर्धा कोस लांब शेतघरात थांबायचा. त्यांची गुरं बारमास तिथेच असायची. सकाळी उठून दुध  काढून  गुराना चरायला सोडल्यावर बाबु दुध पोचवायला घरी जायचा . असा बारमास शिरस्ता होता. बेत ठरला त्या दिवशी कटकरांपैकी दोघानी  बाबुशी संगनमत करून बागेत कोंबडा रांधून खायचा बेत योजलेला होता. ठरल्याप्रमाणे  रात्री  तिघेही पोटभर जेवले. बाबुला मटणातून चिंचोक्या एवढी भांगेची गोळी दिलेली होती. जेवण झाल्यावर पान खाता खाता , "मटाण खावन्  माजा प्वॉट तटी लागला. माका नीज करता......" बाबू म्हणाला.  सवंगडी उठून घरी निघाले नी बाबू  उघड्या पडवीतच   खाटेवर आडवा झाला. मळ्यातल्या वाटेने वाडीत जाताना  साखरेच्या बांधाजवळ जावून एकाने  भालू ओरडते तसा "हुकी हूऽऽऽ......' असा आवाज काढला. लगेच व्हाळाकडून सोबत्यांचा प्रतिसाद आला, खूण पटली  नी खुशीत दोघेही घरी गेले.  

             " हुकी हू ऽऽऽ....." आवाज ऐकल्यावर मुंबईकरानी संकेत ओळखला. जरा रात्र होईपर्यंत तासभर वेळ काढून ते बाबुच्या बागेकडे निघाले. ते कवाडी जवळ पोचतात  एवढ्यात  बाबुचे कुत्रे भुंकत पुढे आले . दोघांच्या हातात गुप्त्या होत्या. तिघांकडे दांडे होते . दांडेवाला पुढे सरसावल्यावर  कुत्रे धावत मागे गेले नी तिथून  वारीक वाडीच्या दिशेला तोंड करून ते जीव खावून भुंकायला लागले. हाकेच्या अंतरावर  वारीक वाडी होती. बाबुच्या कुत्र्याचे भुंकणे कल्यावर दहाबारा कुत्र्यांची फरड जीव खावून भुंकत मांगराच्या रोखाने धावत सुटली. मारेकऱ्यानी पडवीत निसूर झोपलेल्या बाबूला शोधीपर्यंत कुत्रे दात विचकीत त्यांच्या रोखाने दबत दबत पुढे यायला लागले. बॅटरीच्या झोतात  अर्धवर्तुळाकार  घेराव घालीत कुत्रे पुढे येताना दिसल्यावर मात्र मारेकऱ्यानी  बाबुवर हल्ला करण्या  ऐवजी जीव वाचवून पळ काढायचा  बेत योजला.  

                 जथ्यात असलेल्या  भावकीतल्या लोकाना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आले. त्यानी मुंबईकर दोस्ताना सावध सुचना दिली. " अब अलग अलग भागोगे तो ये कुत्ते पिछे दौडकर हमला करेंगे...." तोंडाने हाड हाड करीत जमिनीवरचे दगड गोटे सकेरा जमवून कुत्र्यांच्या दिशेने फेकून त्यानी माघार घ्यायला सुरवात केली.  आता कुत्रे सावध अंतरावरून त्यांच्या मागून भुंकत येत होते. अर्ध्या मळ्यात आल्यावर गावकर वाडीच्या दिशेने पाचसहा कुत्र्यांची फरड  भुंकत त्यांच्या दिशेने येवू लागली. मग मारेकऱ्यानी गवळदेवाकडे जाण्याऐवजी  वस्ती टाळून देवराईतून  मारुतीच्या घाटी कडून चिंचाळ्यावर जावून लांबचा भोवाडा मारून गवळदेवाकडे  जायचा बेत योजला. माणसं माघार घेताहेत हे लक्षात आल्यावर कुत्र्याना जरा अधिक जोर आला. तसेच दरम्याने गावकर वाडीतले कुत्रेही जवळ येवून पोचलेले होते. आता कुत्र्यानी जुपी करून हल्ला करायचा प्रयत्न केला. ते जवळ भिडायला येताना बघितल्यावर जन्या कोकाटे म्हणाला, "आता सकेर, दगड पुंजवून न भियाता कुत्र्यांका पिटाळूया नायतर ते पाट सोडणार नाय. नी एकाम पाचव बेटऱ्यो  पेटवू नुको.... मसालो पुरोक हवो हा " मग पाचही जणानी  उलटा मोहरा वळवून कुत्र्यांच्या दिशेने दगडांचा सडाका सुरू केला . आता कुत्रे उलट दिशेने जीव खावून पळायला लागले.

              तास दोन तास एकाच जाग़ी थांबून  कुत्रे जवळ भिडायला आले की रेवा सडकावायचा, नी कुत्रे लांब गेले की  थोडं मकाण गाठायचं अशी हुलकावणी देत मारेकरी देवराईजवळ पोचले. आता बाबूचे   दोन्ही कुत्रे आणि   अन्य दोन असे  चार कुत्रे मात्र अद्यापी त्यांच्या मागावर होते. बाकीचे बरेचसे कुत्रे निघून गेलेले होते. त्यानी योजून दगडाचा मारा थांबवल्यावर बाबुचा कुत्रा त्याना भिडायला आला. तो साधारण माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर  दोघानी फोकस टाकून त्याला दिपवला  नी  गुप्तीवाल्याने  गुप्ती फेकली. मारेकरी सराईत नेमबाज होता. गुप्ती कुत्र्याचे पोट फाडून आरपार होताच कुत्रा प्राणघातक केकाटत आडवा झाला. आता मात्र बाकीच्या कुत्र्यानी मोहरा वळवून पळ काढला. कुत्रा थंड झाल्यावर गुप्ती उपसून काढून निगडीच्या पाल्याने रक्त पूसून ते वाटेला लागले. मारेकऱ्यांसोबत आलेले मुंबईकरी त्या भागात वहिवाटलेले होते. तरीही दोन तीन तास चाल मारूनही  चिंचाळं येईना. सड्याचा माथावळा आल्यावर त्यानी अंदाज घेतला. लांब क्षितिजाजवळ  दीपगृहाचा फोकस मारलेला दिसायला लागला. "ती बग गडारची बत्ती...... " एकजण म्हणाला नी मग त्यानी बत्तीच्या रोखाने चाल धरली. सडा पार करून उतरणाची घसारी सुरु झाली. आपण नेमके कुठे जाणार याचा काहीच अंदाज लागत नव्हता.

              तासभर दम खावून ते उतरणावरून पुढे निघाले. गावकुसाजव गेल्यावर कोंबड्याची बांग ऐकू आली. आता चांगलं फटफटायला लागलेल होतं. दमा दमाने अंदाज घेत ते पुढे निघाले नी थोड्या अंतरावर वहाळ लागला. एकाने परिसर ओळखला...... ह्यो नाडणचो व्हाळ सो वाटता....... म्हंजे आमी विजेदुर्गाकडे न जाता उलट्या दिशेन नाडणात इलव.... म्हंजे आमका बत्ती दिसली ती गडारची नव्हती..... देवगडची हुती.....अंदाज खरा होता. ते नाडणात आले होते. आता चांगलं दिसत होत. त्यानी चांभारघाटीच्या दिशेने मोहरा वळवला.  तासाभराने परबाचं हॉटेल उघडलं. चुकार माकार माणसं यायला लागली होती. सकाळच्यावेळी हे शिख़ इथे कसे काय आले ? म्हणून माणसं वळून वळून त्यांच्याकडे पहात होती. आता त्यानी बेत बदलला. विजयदुर्गाऐवजी देवगड गाठून तिथून बोटीने मुंबईला रवाना व्हायच ठरवलं. चहा बटर खावून ते वाटेला लागले. तासाभराने वाडातर गाठून तरीने पलिकडे होवून  त्यानी देवगड गाठल.

                  अवेळ  होवून  गेला  तरी  बाबु  दुध घेवून आला नाही म्हणताना त्याचा धाकटा भाऊ बागेत आला. बाबु निसूर झोपलेलाच होता. त्याला ढोसून ढोसून जागा केल्यावर महत् प्रयासाने तो उठून बसला. वासरं नी गायी हंबरत होत्या. गुरानी नाचून नाचून शेणाचा नुसता राडा झालेला होता. भावाने दुभत्या ढोराना एकेक करून पडवीत बांधून दुधं काढली . आता मशेरी लावून तोंड धुवून बाबू  आला. गुरं सोडून दोघानीही गोठा झाडून काढला नी घरची वाट धरली. त्यांच्या मागोमाग कुत्रा निघाला. " बाबु दुसरो कुत्रो खंय दिसत नाय......." भाऊ म्हणाला. त्यावर  बाबु उत्तरला "गेलो असात वाडीत .... राती हुतो.... "  कटात सामिल असणारांपैकी गाडीवाला सकाळची न्हेरी खाल्ल्यावर मुंबईकरांसाठी चटणी भाकरीची शिदोरी घेवून गाडी जुंपून गडावर जायला निघाला. पुरळ तिठ्ठा आल्यावर गवळदेवाजवळ गाडी थांबवून मुंबईकरांची वाट बघायला लागला, अर्धातास वाट बघून त्याने गवळदेवाच्या आजुबाजूला खूप शोध घेतला पण काय मागमूस लागेना. तेंव्हा ते कदाचित रस्त्यात गाठ पडतील म्हणान तो विजयदुर्गापर्यंत गेला. संध्याकाळी बोट सुटून गेली तरी त्यांचा मागमूस लागेना म्हणताना चितागती होत तो गावाकडे निघाला.

             सकाळी  कोणालातरी मळ्यात मरून पडलेला कुत्रा दिसला. त्याचे पोट फाटलेले होते म्हणताना बघणाराला काय उलगडा होईना. कटात सामिल असणाराना बाबु शाबूत आहे, त्याच्या केसालाही धक्का लागलेला नाही हे कळल्यावर  ठरलेला बेत कसा काय बारगळला याचा काहीच अंदाज लागेना. रात्री  विजयदुर्गात गेलेला गाडीवाला आल्यावर तर कटकऱ्यांची बेचैनी भलतीच वाढली. रात्री  उत्तरादाखल त्यानी भालूच्या ओरडण्याचा आवाज काढून इशारत दिली त्याअर्थी ते मळ्यात आलेले  होते हे नक्की...... पुढे त्यानी ठरलेल्या बेताप्रमाणे बाबुवर हल्ला कां केला नाही.....? जात्या बोटीसाठी ते विजयदुर्गात कां आले नाहीत....... बरं अन्य कुठेही त्यांचा मागोवा लागत नाही म्हणताना नेमकं काय घडल असावं कसलाच अंदाज लागेना. चार दिवसानी अकल्पितपणे  चांभार घाटी जवळचा तानाजी परब देवधर दुकानावर कोणाशी तरी बोलताना कटकरांपैकी एकाने ते ऐकलं. त्या दिवशी पाच शिख उजाडताना नाडणाच्या वाटेने चांभार घाटीवर थांबले होते. परबाच्या हॉटेलात चहा बटर खावून ते वाडातरीकडे चालत गेले. हे ऐकल्यावर ऐकणाराला खूण पटली. काही कारणाने बेत बदलून ते देवगडला गेले असा अंदाज त्याने बांधला. म्हणजे बेत पार पडला नाही तरी ते सुखरूप मुंबईला रवाना झाले हे त्याने ओळखले नी सुटकेचा श्वास सोडला.  

                      01 देवी

               शुक्रवारी देवीचा संचार आला. एरव्ही कूड काहीच वदत नसे पण या वेळी देवळाला प्रदक्षिणा घालून देवी समोर आल्यावर कुड बोलायला लागली..... “माजी कुड , तेका मारूक हुंबयचे पाच मारेकरी मान्ताकरून बांदिलकी करून अवसे रोज इलेले हुते ......  तेका मारून इनामत जमिनीवर कब्जो घेव साटना तेच्याच वसातले ल्वॉक फिरून पडले......पूर्व सत्तेन तेका वाचवल्यान..... कुत्र्याचा रगात देवन् मान्ता  पुरी झाली.....” फार तपशिल ऐकणाराना आकळला नाही....... आरत झाल्यावर मराठ्यानी जाबसाल घातली. " भवानी माते तुजी इनामत जमिन , पण ती  कुळानी खाल्लानी....... तु तेंका काय्येक आरेख़ घतलंस नाय.... आमी काय करणार? राज सत्तेपुढे कोणाचाच इलाज चालत नाही. " त्यावर देवीचा संचार वदला, " तुमी ह्येच्या संबंदात माका कदी सांगणा करून जाब घतलास काय? तुमी जाब घाला मगे मी फुडचो विलाज करीन नी माजी इनामत सोडवून घ्येयन......" आरत संपल्यावर जमलेल्या मंडळीनी देवीला जाब घातला." भवानी माते, तुजी इनामत, त्येतूसून तुकाच भायरी करून जे बळकावून बसलेहत तेंका तू धडो शिकव......"  पुढच्या महिनाभरात कशी काय  सूत्रं फिरली देवीच जाणे! पण ज्यानी गैर मार्गाने इनामत जमीन बळकावलेली होती त्यानी बिन बोभाट कबजा सोडून इनामत मोकळी करून दिली.

        शिमग्यात  कटातले  दोघेजण गावी आले नी  त्यानी साथीदारांकडे सगळा उलगडा केला.  येण्यापूर्वी  बंगाली पंचाक्षरी गाठून त्यानी  'मान्ता' केलेली होती म्हणून  ते शाबूत राहिले.  सगळ्यानीच  भवानीला  नारळ ठेवून चुक कबूल करून नाक तोंड घासून माफी मागितली. गावोगाव लोकवार्तांमधून अशी जागृत देवस्थाने  सर्वश्रुत झालेली असतात. त्यांच्या चतु:सिमेत कोणी काही आगळिक केली तर संबंधिताला त्याचे दुष्परिणाम फलस्वरूप भोगावे लागतात. नी हे चक्र हजारो वर्षे अव्याहत सुरु राहून प्रत्यंतर देत रहाते. काही गावात अशा जागृत  देवस्थानांच्या परिसरात असणारा समाज  सहसा  पिढ्यानु पिढ्या  रूढ झालेल्या  संकेतांचा भंग करू धजावत नाही. चुकून माकून अशी आग़ळिक झाली तर  क्षमायाचना  केल्यावर  संबंधिताला  कठोर परिणामांपासून सुटका  मिळते.  म्हणून  रूढ संकेतांच्या विरुद्ध जावून जावून त्या देवस्थानाच्या  जागृतीची प्रचिती घेण्याच्या फंदात सूज्ञ माणूस सहसा पडत नाही. 

              

              

                               End design

            

 

 

1 टिप्पणी:

  1. अस्खलित रहस्यमय कोकणी वातावरणात घेऊन जाणारी, कथा.... याकथेवर सिरियल आली तर प्रेक्षकाच्या उड्या पडतील.... इतकी लर्जेदार कथा..... अशा प्रकारच्या आणखी कथा प्ऋसिध्द करा

    उत्तर द्याहटवा

धन्वंतरीचा वसा

       धन्वंतरीचा वसा   राजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता , वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणा...